मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा बिगुल फुंकला आहे म्हणायचे की पिपाणी? सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी आपला पक्ष निवडणूकपूर्व युती करणार नाही, भाजपविरोधी समविचारी पक्षांशी युती करण्याबाबत विचार केला जाईल, पक्षांतर्गत निवडणुका येत्या जानेवारीत घेतल्या जातील वगैरे घोषणा त्यांनी केल्या आहेत. एवढे करूनच ते थांबले नाहीत, तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचे प्रचाराचे मुद्दे कोणते असतील, जाहीरनाम्याचे स्वरूप काय असे हे सगळेच त्यांनी उघड करून टाकले आहे. वास्तविक पक्षनेतृत्वाविरुद्ध नुकतेच बंडाचे निशाण एका गटाने उभारले असल्याने पक्षांतर्गत निवडणूक येत्या महिन्यात जाहीर करण्यात आलेली असताना व नव्या अध्यक्ष, कार्याध्यक्षांची निवडणूक व्हायची असताना आधीच पक्षाची आगामी विधानसभेची संपूर्ण रणनीती जाहीर करणे आश्चर्यकारक आहे. हे काही नेतृत्वाच्या परिपक्वतेचे लक्षण नाही. राजकारणामध्ये आपले पत्ते राखून ठेवायचे असतात आणि काळ, वेळ, प्रसंग पाहूनच ते हळूहळू खोलायचे असतात. शिवाय पक्षाच्या केंद्रीय समितीची आणि कार्यकारिणीची निवडणूक तोंडावर असताना आधीच अशा प्रकारे घोषणा करणे उतावीळपणाचे ठरते ते वेगळेच. आगामी निवडणुका हा केवळ फार्स राहील, मग पक्षाचे नेतृत्व आमच्याकडेच असेल हेच सूचित करण्याचा हा प्रयत्न आहे असे उद्या विरोधक म्हणू लागले तर ते चूक कसे म्हणायचे?
मगो पक्षाची गेल्या काही वर्षांतील वाटचाल ही गोंधळाची आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शेवटपर्यंत हा पक्ष सरकारसोबत राहिला आणि निवडणुकीच्या ऐन तोंडावर फारकत घेत ‘समविचारी’ म्हणत राज्यात अस्तित्वही सिद्ध न झालेल्या शिवसेना आणि गोवा सुरक्षा मंचाशी हातमिळवणी करून पक्षाने स्वतःचीच हानी करून घेतली. पक्षाचे जे तीन आमदार निवडून आले, त्यापैकी दोघे पक्ष सोडून भाजपात पळाले. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीमध्येही पक्षाची भूमिका गोंधळाचीच दिसली. लोकसभा निवडणुकीत तर ‘समविचारी’पणा बासनात गुंडाळून कॉंग्रेसची साथ देण्याची घोषणा पक्षाने केली. आयात केलेले उमेदवार मगोचा शिडीसारखा वापर करून भाजपात पळाल्याचे एकदा दिसल्यावरही पुन्हा मगोमध्ये उमेदवार आयात करण्याचे सत्र राज्यात जोरात चालले आहे.
खरे तर पक्षाचा सुवर्णमहोत्सव जेव्हा साजरा झाला तेव्हा पक्षाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले होते. त्या सगळ्यामधून मगो पक्ष पुन्हा जोरदार संघटनात्मक बांधणी करील आणि या जुन्याजाणत्या प्रादेशिक पक्षाला नवसंजीवनी मिळेल असे चित्र निर्माण झाले होते. भाऊसाहेब बांदोडकर यांची पुण्याई आज सहा दशके लोटली तरीही पक्षाच्या पाठीशी आहे. त्याचा फायदा घेऊन राज्यामध्ये पक्षाचे स्वतंत्र आणि समर्थ अस्तित्व निर्माण करण्यासाठी या सार्या संघटनात्मक प्रक्रियेचा वापर केला जाईल असे पक्षनेतृत्व सांगत होते. प्रत्यक्षात मात्र जी काही पक्ष संघटना होती, तीही नेतृत्वाला सांभाळता आली नाही. तिचीच शकले उडाल्याचे व सरचिटणिसांनीच बंड पुकारल्याचे नंतरच्या काळात दिसून आले. आता पक्षाची जी निवडणूक जाहीर झाली आहे, ती सुरळीतपणे पार पडून पक्षांतर्गत एकजूट असल्याचे दिसले तरच मतदार गांभीर्याने पाहतील. मगोने भाजपशी युती करणार नाही असे काल सांगितले, पण खरे तर शिरोड्याच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी ‘असले लोक गेले तेल लायत’ असे सांगून मगोला जागा दाखवून दिली होती याचे पक्षाध्यक्षांना विस्मरण झालेले नसेलच. नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीमध्येही पक्ष ढवळीकर बंधूंच्या पलीकडे गेल्याचे दिसलेले नाही. त्यामुळे विधानसभेची स्वप्ने पाहण्यापूर्वी आधी पक्ष सांभाळा, स्वबळावर समर्थपणे उभा करा आणि मगच सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहा!