बिकिनीला विरोध केला तर काय चुकले?

0
162

– हरी दाणी, वेलिंग
अलीकडेच एका वक्त्याने केलेल्या पब संस्कृती, रेव्ह संस्कृती व पोषाख यावरून एका वादाला सुरुवात झाली आहे. प्रत्येकाला आचार, विचार, उच्चाराचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे हे मान्य. पण त्या स्वातंत्र्यालाही काही मर्यादा असतातच. त्या एका अज्ञात शक्तीने पृथ्वीवर प्राण्यांची निर्मिती केली आणि अस्तित्वात असलेल्या- निर्माण केलेल्या प्राण्यांत मनुष्य हा सर्वश्रेष्ठ प्राणी निर्माण केला. मनुष्याची निर्मिती ही त्या चित्‌शक्तीची अपूर्व कलाकृती आहे. मनुष्य व इतर प्राणी या मूलभूत जे गुण- आहार, निद्रा, भय, मैथून हे सारखेच समान गुण आहेत. परंतु मानवाला इतर प्राण्यांपेक्षा अधिक अशी देणगी दिली आहे. ती म्हणजे, मन, बुद्धी. मन-बुद्धी यांच्या सहाय्याने विचार करण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे. त्या विचारांच्या सहाय्यानेच मानवाने आपल्या जीवनात प्रगती घडवून आणली आहे. ज्ञान, विज्ञानाची निर्मिती केली आहे आणि जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. मानव हा शब्दच असा, ज्या प्राण्याला ‘मन’ हे अदृश्य इंद्रिय आहे तो मानव. इतर प्राण्यांना मन नाही, असे म्हणता येणार नाही. परंतु मानवाला दिलेली बुद्धी. तिच्या सहाय्याने मनाची प्रगल्भता वाढविण्याची किमया फक्त मानवातच आहे.
वेगवेगळा प्राणीवर्ग हा समूहानेच राहतो. मानव हा समूहानेच राहायचा. पण मानव इतर प्राण्यांपेत्रा वेगळाच. याच समूहाचा समाज बनला. अश्मयुगातील मानव समाज स्वैर वृत्तीने राहतच होता. समाज निर्माण झाल्याने त्या समाजाचा प्रमुख आला. समाजावर काही बंधने आली. त्यातून स्वैर वृत्तीला आळा आला. इंद्रियांच्या लाज लज्जेची संकल्पना आली आणि इंद्रिये झाकण्यासाठी वल्कलांचाही उपयोग मानव करू लागला. आहारामध्ये, त्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल घडून येऊ लागला. स्वैराचाराला आळा बसण्यासाठी विवाह संस्था निर्माण झाली. हळूहळू सामाजिक सुधारणा घडून येऊ लागल्या. गरज ही शोधाची जननी आहे. नवनवीन शोध, कल्पना निर्माण झाल्या. त्यातून निसर्गापासून संरक्षणासाठी व लज्जारक्षणासाठी कापडाचा शोधही मानवाने लावला. आहारामध्ये विविधता आली. अन्नाचा शोध, खाण्यापिण्याची व्यवस्था यामध्ये बदल घडून आला. प्राणी जीवनावर निसर्गाचा, पर्यावरणाचा प्रभाव पडणे साहजिकच आहे. पृथ्वीवरील सर्वच ठिकाणी परिस्थिती, नैसर्गिक वातावरण वगैरे एकसारखेच नाही. याचा परिणाम जीवसृष्टीवर पडणे साहजिकच आहे. त्यामुळे आचार – विचार – आहार यामध्ये विविधता येणे स्वभाविकच आहे. आणि मानव हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळाच. आचार विचारावर नैसर्गिक वातावरणाचा, परिस्थितीचा प्रभाव असतोच आणि त्यामुळे मानवाचा तसा स्वभाव बनतो. स्वभाव- मनाची अवस्था. पृथ्वीच्या स्वाभाविक रचनेमुळे मानवाच्या मूलभूत गरजा जिथे भागतील त्या ठिकाणी मानवाची वस्ती होऊ लागली. अन्न, पाणी, निवारा या प्राथमिक गरजा जेथे निभावल्या जातात अशाच ठिकाणी वस्ती होऊ लागली. विशेषतः नदीच्या काठांनीच मानव समाजवस्ती करून राहू लागला. त्यातून देश निर्मिती. म्हणजे पृथ्वीच्या स्वभाविक रचनेच्या अनुरोधाने नद्या-नाले-पर्वत व जीवसृष्टी असते तो देश! आणि या देशात राहणारा मानव समाज- जिथे सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय तसचे वीरांच्या पराक्रमाच्या गाथा वाचल्या जातात ते राष्ट्र. आपला हिंदुस्थान केवळ देश नसून ते वैभवसंपन्न राष्ट्र आहे. येथे काही परंपरा आहेत. संस्कार आहेत व उच्च कोटीची संस्कृती आहे. ज्या काळात आपला भारत देश सर्वार्थाने संपन्न, समृद्ध देश, राष्ट्र होते, त्याकाळात पाश्‍चिमात्य देश हे रानटी अवस्थेत होते. भारतीय संस्कृती ही वैदीक काळापासून सनातन संस्कृती असून या संस्कृतीचे स्वतःचे असे एक वैशिष्ट्य आहे. येथे लाज-लज्जा, अब्रू याची चाड आहे. म्हणूनच भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ मानली जाते. आज भौतिक शास्त्राच्या माध्यमातून विकसित, सुधारित देश म्हणवून घेणार्‍या देशातील जनता आज भारतीय संस्कृतीकडे वळत आहे. भारतीय संस्कृती ही जीवन संस्कृती आहे, याची जाण सुधारक पुरोगामी म्हणवून घेणार्‍या दुढ्ढाचार्यांनी ठेवावी.
भौतिकशास्त्राच्या प्रगतीमुळे पाश्‍चात्य देशांत प्रगती घडवून आणली. पण त्यापूर्वीही भारतातसुद्धा सर्व क्षेत्रातील शास्त्रांत प्रगती झालेली होतीच, याचा अभ्यासकांनी अभ्यास करावा.
भारताचा इतर देशांशी व्यापाराच्या निमित्ताने संपर्क होता हे इतिहासच सांगतो. जलमार्गाच्या शोधानंतर हिंदुस्थानशी अधिक संपर्क येऊ लागला. इसवी सनापूर्वीही परकीय यवनांच्या टोळ्या लुटीच्या निमित्ताने येत होत्याच. इ. सनानंतर ८ व्या शतकापासून अरब, मुसलमान यांच्या स्वार्‍या या सुवर्णभूमीची लूट करावी या निमित्ताने सुरू झाल्या. १५ व्या शतकाच्या अखेरीस भारताकडे येणार्‍या जलमार्गाचा शोध लागला. वास्को-द-गामा हा पहिला पाश्‍चिमात्य जलमार्गाने आला व त्याचे पांढरे पाय हिंदुस्तानच्या, भारताच्या या पवित्र भूमीत लागले. जलमार्गाचा हिंदुस्थानाकडे येण्याचा शोध लागल्यामुळे पाश्‍चिमात्य जगतातून हिंदुस्थानकडे येण्याचा ओघ लागला आणि प्रथम पोर्तुगीजांनी इथे पाय रोवण्याचा प्रयत्न केला. २५ नोव्हेंबर १५१० हा एक प्रकारे काळा दिवसच समजायला हवा. आफोन्स-द-अल्बुकर्क याने गोव्याच्या देवभूमीवर अशुभ पादस्पर्श केला आणि त्या दिवसापासून येथील संस्कृतीला उतरती कळा लागली. अल्बुकर्क हा धर्मांध होताच आणि त्यानंतर आलेले धर्मप्रसारक एका हाती धर्मग्रंथ दुसर्‍या हाती शस्त्र घेऊनच आले. ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ या म्हणीनुसार धर्मप्रसाराने अंध झालेल्या धर्मांधांनी ‘ख्रिस्ती धर्म स्वीकार नाहीतर मरणाला तयार हो’ या दहशतीने येथील हिंदू जनतेवर जुलूम जबरदस्ती करून त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. इन्क्विझिशनसारख्या अमानवी कृत्याने हिंदू जनतेची फरफट केली. बळजबरीने, जबरदस्तीने ख्रिस्तीधर्म स्वीकारण्यास भाग पाडून एका परीने हिंदूंंच्या संस्कृतीवर हल्ला चढविला. संस्कृती नष्ट करण्याचा व ख्रिस्ती संस्कृती या देवभूमीत रुजवण्याचा चंग बांधला त्यामुळे मूळ हिंदू- ख्रिश्‍चन झाले- म्हणून तो हिंदू ख्रिश्‍चनच! रक्त हिंदूंचे- ख्रिस्तीधर्माचा वरचा मुलामा. संस्कृती म्हणजे आचार, विचार, उच्चार यांचे मनावर होणारे आघात. त्यामुळे मानसिकता बनते. संस्कृती म्हणजे धर्माची कवचकुंडले. संस्कृती नष्ट झाली की धर्म बुडालाच. पोर्तुगिजांच्या गोव्यातील आगमनाने धर्मांध धर्मोपदेशकांनी पाश्‍चिमात्य पोर्तुगीज नागडी – उघडी संस्कृती लादली. गोव्यात ४५० वर्षे पोर्तुगीजांची राजवट व ख्रिस्ती धर्माला प्रोत्साहन त्यामुळे बाटलेल्या हिंदू ख्रिश्‍चनांत ही नागडी संस्कृती अगदी लोणच्याप्रमाणेच नसानसांत मुरली. ‘गुण लागत नाही, पण वाण लागतो’, अशी एक मराठीत म्हण आहे. तसेच त्या पाश्‍चिमात्त्यांच्या सहवासामुळे त्या संस्कृतीची भुरळ पडून मूळ संस्कृतीचे या बाटग्या हिंदू ख्रिश्‍चनांना विस्मरण झाले आणि स्वीकारलेली संस्कृती हीच आमची संस्कृती ही मनोधारणा बनून राहिली. त्यामुळे दृढीकरण होऊन बिकीनी व तोकड्या कपड्यांवर केलेली टीका ही अशांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे वादंग निर्माण झाला. कोणी कसे कपडे वापरावेत, कोणता पोशाख करायचा हे जरी वैयक्तीक मत असले तरी आपण हिंदुस्थानात राहतो आणि हिंदुस्थानातील संस्कृती- ही उघडी संस्कृती नाही याची जाणीव करून दिली. यात सुदिन ढवळीकर यांच्या वक्तव्यात काय चुकले? यामुळे इतके वादंग का माजवावे? हिंदु संस्कृती ही लाजलज्जा, अब्रू रक्षण संस्कृती ही पुराणकाळापासून चालत आलेली आहे. मग ढवळीकरांचे चुकले कुठे? उपमुख्यमंत्र्यांनी ‘मी हिंदू ख्रिश्‍चन आहे’ असे म्हटले म्हणून चर्चची का माफी मागावी? त्यांचे हिंदू ख्रिश्‍चन म्हणवून घेणे हे अभिमानास्पद आहे.
गोव्यातील एक विद्वान साहित्यिक, कवी, उत्तम प्रतीचे वक्ते व सद्यस्थितीत सत्ताधारी पक्षाचे एक जबाबदार आमदार विष्णू वाघ यांनी असे एक वक्तव्य केले, ‘देवही दारू (सुरा) पीत होते.’ समुद्रमंथनातून चौदा रत्नांपैकी ‘सुरा’ हे जसे रत्न आले तसे अमृतकलश हेही रत्न आलं.
पण देवांनी अमृताचा स्वीकार केला. व असुरांनी, राक्षसांनी ‘सुरा’ पसंत केली. सुरा हे राक्षसांचे पेय व अमृत हे देवांचे पेय हे या विद्वानाच्या लक्षात यायला हवे होते. देव जे पेय घेत तो सोमरस. सुरा नव्हे. सुरा म्हणजे दारू. या पेयाने मनाचे संतुलन बिघडते, सोमरसाने नव्हे. मनाचे संतुलन बिघडले की माणूस राक्षस बनतो. हे पण लक्षात यावे. दारू पिणे ही पाश्‍चात्त्य संस्कृती.
या युगांत माणूस माणूस राहिलाच नाही. तो राक्षसच बनत चाललाय आणि म्हणूनच अत्याचार, बलात्कार यांसारखे अघोरी प्रकार बनत चाललेत. पोशाख बदलला म्हणून मानसिकता बदलत नाही. धोतर नेसून अंगरखा घालून विधानभवनात गेला म्हणून मानसिकता बदलत नाही व ती हिंदू संस्कृती होत नाही. बिकीनी व तोकडे कपडे पेहरावावर केलेल्या वक्तव्यावर वादंग माजविण्यात काहीच अर्थ नाही.
हे सर्व पाल्हाळ लिहिण्याचा एकच उद्देश बिकिनी, तोकडे कपडे पेहराव, रेव्ह पार्टी, पाश्‍चात्त्य संस्कृती-हिंदू संस्कृती यावरील वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्या संस्कृतीची जाण व्हावी म्हणूनच हा सविस्तर लेख लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. हा लेख वाचकांनी वाचल्यानंतर जे काही बरे वाटत असेल तर ते घ्यावे व जे मुद्दे वाचकास पटले नसतील ते लेखकाच्या माथी मारावेत. या लेखावर ज्यांना प्रतिक्रिया द्यावयाच्या असतील त्या जरा द्याव्यात. त्यामुळे माझे काही चुकल्यास त्यात सुधारणा करता येईल.