महिन्यापूर्वी केंद्र सरकारने बाष्पक निरीक्षकालय (बॉयलर) विभागाला सरकारपासून वगळून त्याचे खासगीकरण केल्याने पार्सेकर मंत्रिमंडळातील मंत्री दीपक ढवळीकर यांच्या कारखाने आणि बाष्पक या खात्याचे महत्व पूर्णपणे संपुष्टात आले आहे.प्रत्यक्षात ढवळीकर यांच्याकडे कारखाने हा एकच विषय आता राहिला आहे. मुद्रण व लेखन सामुग्री या खात्यालाही विशेष वजन नाही. प्रशासनात या खात्यांकडे एखाद्या शोभेच्या वस्तूप्रमाणे पाहिले जाते. त्यामुळे ढवळीकर व त्यांचे समर्थक प्रियोळ मतदारसंघातील मतदार बरेच नाराज बनले आहेत.
बाष्पक विभागाचे खासगीकरण केल्याने बॉयलर्सची तपासणी करण्याचा अधिकार सरकारकडे राहिलेला नाही. देशभरात या खात्याचे निरीक्षक कारखान्यांची तपासणी करण्याच्या नावाखाली सतावणूक करीत असल्याच्या तक्रारी वाढल्याने केंद्राने बाष्पक विभागाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्य सरकारने महिन्याभरापूर्वी वरील खात्यातून बाष्पक विभाग वगळण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे या खात्यातील अधिकार्यांनाही विशेष काम राहिलेले नाही.