राज्यात अपघातांचे सत्र सुरुच असून, काल बाळ्ळी येथील आरोग्य केंद्राजवळ महामार्गावर खासगी बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीचालक एकनाथ यशवंत नाईक (60, रा. बेतुल) हे ठार झाले. भरधाव असलेल्या खासगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. या प्रकरणी बसचालकास अटक करण्यात आली आहे.
कुंकळ्ळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू येथून आलेली खासगी बस दुर्गाप्पा कारबोंडा हा चालवत होता. त्याचा बसवरील ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाला. बसने एकनाथ नाईक यांच्या दुचाकीलार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. रक्तस्राव होत असल्याने त्यांना लगेचच बाळ्ळी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. नाईक हे आपल्या भावाला डायलेसिससाठी बाळ्ळी इस्पितळात घेऊन आले होते, त्यावेळी अपघात घडला. मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगाव येथील जिल्हा इस्पितळात पाठवण्यात आला आहे. बसचालकाला कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली आहे.