बालरथ कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये अखेर वाढ

0
23

>> आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर जाग; दिवाळीपूर्वी वाढीव पगार मिळणार; शिक्षण खात्याकडून परिपत्रक जारी

बालरथ कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर शिक्षण खात्याने बालरथ कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचे परिपत्रक काल जारी केले. बालरथचालकांचे मानधन 12 हजार रुपयांवरून 17 हजार रुपये आणि बालरथ मदतनिसांचे मानधन 6 हजार रुपयांवरून 10 हजार रुपये करण्यात आले आहे. ही पगारवाढ शैक्षणिक वर्ष जून 2023 पासून लागू करण्यात आली असून, दिवाळीपूर्वी बालरथ कर्मचाऱ्यांना नवीन परिपत्रकानुसार वाढीव मानधनाचे वितरण करावे, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

राज्यातील अनुदानित विद्यालयांतील बालरथ कर्मचाऱ्यांनी गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात आंदोलन करून आपल्या विविध मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी केली होती. त्यात पगारवाढीच्या मागणीचाही समावेश होता. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बालरथ कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याबरोबर अन्य मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी, बालरथ कर्मचाऱ्यांच्या मानधन व इतर मागण्यांची पूर्तता होत नसल्याने बालरथ कर्मचारी संघटनेने मंगळवारी येथील आझाद मैदानावर निदर्शने करून मागण्यांची पूर्तता न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

पगारवाढ जूनपासून लागू

शिक्षण खात्याने बालरथ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची त्वरित दखल घेतली असून, पगारवाढीबाबत परिपत्रक जारी करून शाळा व्यवस्थापनांना पाठविले आहे. ऑक्टोबर 2023 या महिन्याचा पगार नवीन मानधनानुसार देण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच जून ते सप्टेंबर 2023 या चार महिन्यांच्या मानधनातील फरक दिवाळीच्या पूर्वी देण्याची सूचना करण्यात आली आहे.

बँक खात्यात जमा होणार कर्मचाऱ्यांचा पगार

तसेच, बालरथ कर्मचाऱ्यांचा पगार बँक खात्यात जमा करण्याची सूचना करण्यात आली आहे. बालरथ योजनेखाली 4.17 लाख रुपयांचे अनुदान विद्यालय व्यवस्थापनाच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहे. तसेच, शिल्लक अनुदान लवकरच दिले जाणार आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.