बारावीच्या पहिल्या सत्राची ८ डिसेंबरपासून परीक्षा

0
24

इयत्ता बारावीच्या पहिल्या सत्रातील परीक्षेचे वेळापत्रक गोवा शालांत मंडळाने जाहीर केले आहे. त्यानुसार ही परीक्षा डिसेंबर महिन्यात होणार आहे. परीक्षा ८ डिसेंबरपासून सुरू होणार असून ती ५ जानेवारी २०२२ पर्यंत चालू राहणार आहे.
बहुतेक विषयांसाठीची परीक्षा ही बहुपर्यायी प्रश्‍न पद्धतीने घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ओएमआर पेपरवर ही परीक्षा द्यावी लागेल.

२०२१-२२ ह्या वर्षासाठीच्या गोवा शालांत मंडळाच्या धोरणानुसार या शैक्षणिक वर्षाला दोन सत्र परीक्षा घेतल्या जातील. पहिल्या सत्रातील परीक्षा ही बहुपर्यायी प्रश्‍न या पद्धतीने घेतली जाईल. तर दुसरी परीक्षा ही मूल्यांकनावर असेल व ती व्यक्तीनिष्ठ प्रश्‍नांवरील मूल्यांकनावर घेण्यात येईल.

मुलांचा अंतिम वर्षासाठीचा निकाल तयार करताना ह्या दोन्ही परीक्षांतील गुण लक्षात घेण्यात येणार आहे, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, दहावीच्या परीक्षाही दोन सत्रात होणार असल्याचे यापूर्वीच मंडळान जाहीर केले आहे. कोविडमुळे गेल्या दोन वर्षांत वर्ग ऑनलाइन पद्धतीने घेतले जात होते. सध्या राज्यात गेल्या महिन्यापासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने घेतले जात आहे. इयत्ता आठवीपूर्वीचे वर्ग दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरू होण्याची शक्यता होती. मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, नुकतेच दिवाळीच्या सुट्टीनंतर वर्ग सुरू करण्याची शक्यता नसल्याचे सांगितले. यासाठी राज्यात तयार करण्यात आलेल्या कृती दलाशी चर्चा केल्यानंतरच याबाबत विचारविनियम करण्यात येणार असल्याचे मुख्यमंयांनी स्पष्ट केले.