बायणा येथील चोरीचा पर्दाफाश

0
181
अटक केलेल्या चोरट्यांसमवेत वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर व सहकारी पोलीस. (छाया : प्रदीप नाईक)

पाच चोरटे जेरबंद; साडेपाच लाखांचा ऐवज हस्तगत
बायणा-वास्को येथील बंगल्यात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले असून याप्रकरणी पाच चोरट्यांना पकडण्यात वास्को पोलिसांना यश आले आहे. जेरबंद केलेल्या संशयित चोरट्यांमध्ये एका अल्पवयीन चोरट्याचाही समावेश आहे.बायणा येथील मिंगेल इस्तिबेरो यांचे कुटुंब वालंकिणी येथे गेल्याची संधी साधून महमद झाकीर हुसेन (१९) उत्तर प्रदेश, व्यंकटेश कटरिया (२०) बायणा, वास्को, पॉलचिमा (२१), वेळसांव, रासूल सय्यद (२०), बायणा आणि एक अल्पवयीन अशा पाचजणांनी बंगल्यात घुसून १ लाख ३० हजार रुपये किंमतीचे ब्रेसलेट, सहा हजार रुपयांची दोन घड्याळे, ४० हजार किंमतीच्या २ साखळ्या, ४३ हजार रुपयांचा नेकलेस, ५० हजार रुपयांचे विदेशी चलन असे मिळून ६ लाख रुपयांचा डल्ला मारला होता.
या प्रकरणी वास्को पोलिसात तक्रार दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. इस्तेबेरो यांच्या बंगल्या शेजारी राहणारा नवी सय्यद (२०) हा चोरी झाल्याच्या दिवसांपासून गायब असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यामुळे वास्को पोलिसांनी त्याच्यावरच संशय ठेवून त्याचा शोध चालविला असता काल तो पोलिसांना वास्कोत सापडल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखवल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली व सहकार्‍यांचीही नावे आणि पत्ते पोलिसांना दिले. सदर माहितीच्या आधारे एका अल्पवयीनासह पाच चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी चोरीची कबुली दिल्यावर लपवून ठेवलेला सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. सदर ऐवज पॉल चिमा याच्या वेळसांव येथील घरातून जप्त केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या अगोदर पॉल चिमा याला दोन गुन्ह्यांप्रकरणी अटक झाली होती. काल रात्री १०.३० वा. त्याच्या घरातून ऐवज हस्तगत करण्यात आला. वास्को पोलिसांनी १५ दिवसांत चोरीचा छडा लावून चोरट्यांना जेरबंद करण्यात यश मिळविले असून गेल्या दोन महिन्यांच्या काळात वास्को पोलीस हद्दीत घडलेल्या बहुतेक गुन्ह्यांचा तपास लावण्यास पोलिसांना यश आले आहे. परंतु, लक्ष्मी पंपावरून सुमारे २ लाख ७० हजार रुपये घेऊन पसार झालेल्या मोटारस्वारांचा अजून ठावठिकाणा लागला नसून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत. दरम्यान, पाचही संशयितांना ७ दिवसांचा रिमांड देण्यात आला आहे.