बायणातील दरोड्यात लाखोंची लूट

0
0

उद्योजकाच्या फ्लॅटमध्ये 7 दरोडेखोरांचा धुमाकुळ; कुटुंबीयांना लोखंडी सळईने जबर मारहाण; रोख रकमेसह सुवर्णालंकार लंपास

म्हापशातील डॉक्टरच्या बंगल्यावरील दरोड्याचे प्रकरण ताजे असतानाच, मंगळवारी मध्यरात्री 2.20 वाजता बायणा-वास्को येथील एका उद्योजकाच्या फ्लॅटमध्ये 7 दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकला. दरोडेखोरांनी चामुंडी आर्केड इमारतीतील फ्लॅटमध्ये राहणारे उद्योजक सागर गुरुदास नायक यांच्यासह कुटुंबीयांना जबर मारहाण करत जखमी केले. त्यानंतर घरातील रोकड आणि लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटून पलायन केले. दरोडेखोरांनी अंदाजे दोन लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने मिळून लाखो रुपयेकिमतीचा ऐवज चोरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरोडेखोरांनी सागर नायक (60) यांना लोखंडी सळईने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच त्यांची पत्नी हर्षा नायक, त्यांची अल्पवयीन मुलगी आणि सासू हिराबाई पै (85) यांना सुद्धा जबर मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या सागर नायक यांना अधिक उपचारासाठी गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

राज्यातील गुन्हेगारी घटना थांबण्याचे नाव घेत नसून, कधी टोळीयुद्ध, कधी दिवसाढवळ्या सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण, तर कधी गोळीबार आणि दरोडा अशा घटना घडत असून, राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ लागला आहे.
7 दरोडेखोरांनी मंगळवार (दि. 18) मध्यरात्री 2.20 वाजता चामुंडी आर्केड इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटच्या स्वयंपाकघरातून आत प्रवेश केला. त्यासाठी स्वयंपाकघराच्या खोलीच्या खिडकीची काच फोडली. त्यांनी हेल्मेट आणि मास्क घातले होते. पहिल्यांदा फ्लॅटमालक सागर नायक यांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. यानंतर त्यांची पत्नी हर्षा हिच्या गळ्यातील मंगळसूत्र, हातातील सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याच्या अंगठ्या हिसकावून घेतल्या.

वडिलांना वाचवण्यासाठी मुलगी धावली

यावेळी दरोडेखोरांनी सागर नायक यांना लोखंडी सळईने मारहाण केली. वडिलांना मारहाण होत असल्याचे दिसून येताच त्यांच्या अल्पवयीन मुलीने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात तिच्या उजव्या हातावर लोखंडी सळई लागल्याने तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली. दरोडेखोरांनी सागर यांच्या सासूबाईंना सुद्धा जबर मारहाण केली.

मुलीच्या अपहरणाची धमकी
दरोडेखोरांनी कुटुंबातील सदस्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतल्यानंतर घरातील आणखी रोकड आणि दागिने देण्याची मागणी केली. आणखी रोख रक्कम, दागिने दिले नाही, तर मुलीचे अपहरण करू अशी धमकी सुद्धा दिली. यानंतर दरोडेखोरांनी फ्लॅटमध्ये सर्वत्र मोडतोड केली. त्यामुळे सागर व त्यांची पत्नी खूपच घाबरली. सात दरोडेखोरांपैकी काहींनी आम्ही तुमच्या मुलीला काहीच करणार नाही, फक्त आम्हाला आणखी रोकड व दागिने देण्याची मागणी केली. त्यानंतर कपाटे फोडून त्यातील सुवर्णालंकारही लंपास केले. दरोडेखोरांनी रोख रक्कम अंदाजे दोन लाख आणि दागिने मिळून अंदाजे लाखोंचा ऐवज चोरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
पाचव्या मजल्यावरील
फ्लॅट्सना लावली कडी

दरोडेखोरांनी सहाव्या मजल्यावर चोरी करण्यापूर्वी पाचव्या मजल्यावरील फ्लॅट्‌‍सना बाहेरून कडी लावली होती. यानंतर दरोडेखोरांनी सागर नायक यांच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटच्या स्वयंपाक घरातून प्रवेश केला.

शिडीचा आधार घेत पलायन
दरोडा टाकल्यानंतर सातही दरोडेखोरांनी इमारतीच्या तळमजल्याच्या मागून संरक्षक भिंतीला शिडी लावून पलायन केले. दरोडेखोर गेल्यानंतर काही मिनिटांनी सागर यांच्या मुलीने इमारतीतील इतर फ्लॅटचे दार ठोठावून सर्वांना सदर घटनेची माहिती दिली. सागर यांच्या फ्लॅटवर दरोडा पडल्याचे कळताच त्यांचे बंधू जे पहिल्या मजल्यावर राहतात, त्यांनी घटनास्थळी धावत घेतली. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलीस घटनास्थळी दाखल
सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुरगाव पोलिसांनी त्वरित बायणातील चामुंडी आर्केड इमारतीकडे धाव घेऊन जखमींना प्रथम उपचारांसाठी चिखली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलीस महानिरीक्षक केशवराम चौरसिया, पोलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा, दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंग, मुरगावचे पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम, मुरगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक शॅरिफ जॅकिस, वास्कोचे पोलीस निरीक्षक वैभव नाईक, ठसेतज्ज्ञ व इतर सरकारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

जखमींवर रुग्णालयात उपचार
सागर नायक यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले, तर इतरांवर दाबोळी-चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून घरी पाठविण्यात आले.

उपमहानिरीक्षक काय म्हणाल्या?
पोलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी बायणा येथील दरोडा स्थळाला भेट दिली आणि दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांसह परिस्थितीचा आढावा घेतला. आम्ही घटनेचा तपास करत आहोत, आम्हाला थोडा वेळ द्या. मागील दोन प्रकरणांतील म्हणजेच दोनापावला आणि म्हापसा येथील संशयितांना आम्ही ओळखले आहे आणि या प्रकरणातही आम्ही दरोडेखोरांना शोधून काढू, असे वर्षा शर्मा म्हणाल्या.
आमदार, लोकप्रतिनिधीही घटनास्थळी
उद्योजक सागर नायक यांच्या फ्लॅटवर दरोडा पडल्याची माहिती मिळताच वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मुरगावचे माजी आमदार मिलिंद नाईक, मुरगावचे माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत, गोवा मानव संसाधन विकास मंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक, नगरसेविका श्रध्दा आमोणकर व नायक कुटुंबातील अन्य काही सदस्य घटनास्थळी दाखल झाले.

हर्षा नायक यांनी सांगितला घटनाक्रम…

नायक कुटुंबातील हर्षा नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 2.30 च्या सुमारास, 7-8 दरोडेखोर मागच्या बाजूचे ग्रील तोडून फ्लॅटमध्ये घुसले.
दरोडेखोरांकडे लोखंडी आणि ॲल्युमिनियमच्या सळई होत्या. त्यांनी बेडरूमचा दरवाजा तोडला आणि आमच्यावर हल्ला करायला सुरुवात केली.
दरोडेखोरांनी माझ्या पतीच्या डोक्यावर हल्ला केला, त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांनी माझ्या मुलीला चापट मारली आणि लाथ मारली आणि माझ्या आईला बेडवरून ढकलले.

दरोडेखोरांनी लॉकरच्या चाव्या आणि रोख रकमेची मागणी केली आणि ते न दिल्यास आम्हाला चाकूने मारण्याची धमकी दिली.
माझ्या पतीने नकार दिल्यावर दरोडेखोरांनी पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला, डोक्यावर सळईने हल्ला केला आणि पोटावर लाथ मारली. आम्ही त्यांना आम्हाला इजा करू नका, अशी विनंती केली आणि त्याऐवजी पैसे घेण्यास सांगितले.
दरोडेखोरांनी रोख रक्कम, चांदीची भांडी, सोन्याचे दागिने, हातातील बांगड्या आणि अंगठ्या लुटल्या.
सर्व काही इतक्या वेगाने घडले की आम्हाला विचार करण्याची किंवा मदत मागण्यासाठी वेळही मिळाला नाही. आम्ही प्रतिकार केला तेव्हा त्यांनी आम्हाला मारहाण केली.
हल्लेखोर बिहारी असल्यासारखे बोलत होते. त्यांनी मुखवटा आणि हेल्मेट घातले होते.

सांताक्रूझमध्ये फ्लॅट फोडून 25 लाखांचा ऐवज लंपास

उबोदांडो-सांताक्रूझ येथे काल दिवसाढवळ्या एक फ्लॅट फोडून 25 लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. या प्रकरणी जुने गोवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली आहे. फ्लॅटमधील रोख 15 लाख रुपये आणि 10 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळविले आहेत. तक्रारदार व्ही. भारती यांची पत्नी दुपारी 12.30 वाजता फ्लॅट बंद करून मुलाला आणायला शाळेत गेली होती. त्यानंतर ही घटना घडली. सीसीटीव्ही कॅमेरामधील फुटेजमध्ये एक एमएच नोंदणी क्रमांकाची दुचाकी त्या फ्लॅटकडे येत असल्याचे दिसून आले आहे. त्याच दुचाकीवरील संशयित चोरट्यानेही चोरी केल्याचा संशय आहे. या प्रकरणी जुने गोवा पोलीस तपास करीत आहे.

युरी आलेमाव यांची सरकारवर टीका

राज्यातील दरोड्यांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे. भाजप सरकार जनतेला योग्य सुरक्षा पुरविण्यात अपयशी ठरले आहे. योग्य पोलीस गस्त आणि नाकाबंदीच्या अभावामुळे सार्वजनिक सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. भाजप सरकारने पोलिसांच्या तपासाच्या बढाया न मारता लोकांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी वास्को येथील दरोड्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना काल केली.