बायंगिणीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी मोन्सेरात आग्रही; राजेश फळदेसाईंचा विरोध

0
0

बायंगिणी येथे येत्या ऑगस्ट महिन्यापासून कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीचे काम सुरू करणार असून, त्यासाठीची तयारी जोरात सुरू असल्याची माहिती कचरा व्यवस्थापनमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी काल दिली. बुधवारी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दुसऱ्या बाजूला बायंगिणीत हा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास कडाडून विरोध केला जाणार आहे, असा इशारा कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी
काल दिला.

बायंगिणी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कचरा प्रक्रिया व व्यवस्थापन यासाठी त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे मोन्सेरात म्हणाले. साळगाव, कुडचडे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पांमुळे कचरा व्यवस्थापन चांगल्या प्रकारे सुरू आहे. बायंगिणी येथे प्रस्तावित कचरा प्रक्रिया प्रकल्प हा गेल्या 10 वर्षांपेक्षा जास्त काळापासून चर्चेत आहे. स्थानिक लोकांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केल्यानंतर सरकारने या प्रकल्पाचे काम पुढे नेण्याकडे दुर्लक्ष केले होते. आता हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत आणि तो येत्या ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसऱ्या बाजूला बायंगिणीत कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे, अशी घोषणा बाबूश मोन्सेरात यांनी केल्यानंतर राजेश फळदेसाई यांनी त्याला विरोध दर्शवला आहे.
जुने गोवे हे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जात आहे. तसेच, कचरा प्रकल्पाच्या नियोजित जागेच्या बाजूला मोठ्या लोकवस्ती, विद्यालये, मठ, इस्पितळ आदी कार्यरत आहे. त्यामुळे कचरा प्रकल्पाला कडाडून विरोध केला जाणार आहे, असे फळदेसाईंनी सांगितले.

तो कचरा प्रकल्प ताळगावात उभारा : फळदेसाई
बायंगिणी येथील नियोजित कचरा प्रकल्पाला आपला विरोध कायम आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बायंगिणी येथील कचरा प्रकल्पाच्या विषयावर चर्चा करून नियोजित प्रकल्प मोडीत काढला जाणार आहे, तेथे प्रकल्प उभारण्यास अनुमती दिली जाणार नाही. मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी ताळगावात तो कचरा प्रकल्प उभारावा, असा उपरोधिक सल्लाही आमदार राजेश फळदेसाई यांनी दिला.