युनायटेड गोवा आपल्या नव्या पक्षाच्या नोंदणीचे काम अंतिम टप्प्यात असून आपला पक्ष येऊ घातलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसबरोबर युती करणार असल्याचे सांताक्रुझ मतदारसंघाचे असंलग्न आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी काल संगितले. निवडणूक आयोगाबरोबर येत्या २७ रोजी आपली अंतिम सुनावणी आहे. त्यानंतर पक्षाच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आपण कॉंग्रेस पक्षाबरोबर युती करण्याचा निर्णय घेतलेला असून पक्षाच्या नेत्यांबरोबर त्या संदर्भात बोलणी चालू असल्याचे मोन्सेर्रात यांनी स्पष्ट केले. आपला पक्ष ह्या निवडणुकीत कॉंग्रेसबरोबर युती करणार असल्याने मोजक्याच जागा लढवणार आहे. मात्र, नक्की किती जागा लढवायच्या याचा निर्णय अजून घेतलेला नाही. कॉंग्रेस पक्षाबरोबरच्या चर्चेवरही बरेच काही अवलंबून राहणार असल्याने त्यांनी स्पष्ट केले. आपली पत्नी जेनिफर मोन्सेर्रात कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणार असल्याचे ते म्हणाले. आपण यावेळी सांताक्रुझ मतदारसंघाऐवजी पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे मोन्सेर्रात म्हणाले. पक्षविरोधी कारवायांच्या आरोपावरून कॉंग्रेस पक्षाने मोन्सेर्रात यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. सध्या ते गोवा विधानसभेतील असंलग्न आमदार आहेत.