पणजी महानगरपालिका निवडणुकीचा निकाल उत्पल पर्रीकर समर्थकांचा दारूण अपेक्षाभंग करणारा आहे. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच ह्या निकालाने सिद्ध केले आहे. मंत्री बाबूश मोन्सेर्रात यांच्या आशीर्वादाखालील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष समर्थित गटाने ‘रोवू चला पणजीवर विजयी झेंडे’ म्हणत पणजी महानगरपालिकेवर पुन्हा एकवार आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. आणि नुसते बहुमतच मिळवले आहे असे नाही, तर उत्पल यांच्या पाठीशी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकवटले असताना देखील बाबूश गटाच्या एकेका उमेदवाराने पन्नास टक्क्यांच्या वर मते मिळवून प्रत्येक प्रभागावरील आपली पकड अधिक मजबूत केलेली दिसते. सर्व विरोधक एकवटल्याने जी एकत्रित ताकद दिसायला हवी होती, ती ह्या निकालात कुठेच दिसत नाही. माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, शीतल दत्तप्रसाद नाईक यांचे पराभव तर विरोधी गटाच्या जिव्हारी लागणारे आहेत. मनोहर पर्रीकर यांनी ज्या पणजीच्या पाठबळावर आपली राजकीय कारकीर्द उभी केली, त्याच पणजीमध्ये पर्रीकरांच्या पुत्राला अशा मानहानीला सामोरे जावे लागले आहे. पर्रीकर संरक्षणमंत्री होते आणि सिद्धार्थ कुंकळ्येकर पणजीचे आमदार होते, तेव्हाची पणजी महानगरपालिका निवडणूक आम्हाला आठवते. तेव्हा बाबूश भाजपात नव्हते. त्यांचा विजयरथ रोखण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जिवाचे रान केले होते आणि बाबूश यांना कडवी झुंज दिली होती. तेव्हा बाबूश गटाला किरकोळ आघाडीवर समाधान मानावे लागले होते. भाजपच्या उमेदवारीच्या कुरबुरी, उमेदवार यादी जाहीर करण्यास लागलेला विलंब अशा गोष्टी असताना देखील तेव्हा भाजपने बाबूश यांना शिकस्त दिली होती. त्या निवडणुकीत तीसपैकी सत्तावीस जागा जिंकण्याच्या गर्जना करणाऱ्या बाबूशना भाजपपेक्षा केवळ दोन जागा जास्त मिळवून समाधान मानावे लागले होते. आज परिस्थिती काय आहे पाहा! ज्या बाबूश यांना रोखण्यासाठी भाजपने एकेकाळी जिवाचे रान केले होते, त्यांच्याच विजयासाठी भाजपाने कंबर कसली आणि त्यांना खरोखरच तीसपैकी सत्तावीस जागा मिळवून देऊन पणजीमध्ये अधिक बळकटी दिली. बाबूश गटाच्या जवळजवळ प्रत्येक उमेदवाराला पन्नास टक्क्यांच्या वरची मते मिळाली आहेत. खरे तर उत्पल यांनी यावेळी पणजीकरांची एकजूट निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. आपला गट महापालिकेवर निवडून आला तर पणजीच्या समस्या धसास लावू, पे पार्किंगसारख्या गोष्टींपासून पणजीकरांची मुक्तता करू वगैरे आश्वासने उत्पल गटाच्या उमेदवारांनी दिली होती, परंतु त्या कशाचाही परिणाम बाबूश गटाच्या मताधिक्क्यावर झालेला दिसत नाही. निवडून आलेल्यांपैकी अनेक उमेदवार हे गेल्या कित्येक वर्षांपासून पणजीतील आपापल्या प्रभागावर आपली पकड राखून आहेत. त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा फायदा आपल्याला मिळेल अशी उत्पल गटाची अटकळ होती, परंतु तसे झालेले दिसत नाही. प्रभागातील मतदारांशी बाबूश गटाच्या उमेदवारांनी कायम जोडून ठेवलेली आपली नाळ ही समस्त विरोधकांच्या एकजुटीहून अधिक प्रबळ ठरलेली दिसते. लोकांना शेवटी आपली कामे करणारे नगरसेवक हवे असतात. अनेकांची नाडी ही महानगरपालिकेच्या हातात असते, त्यामुळे पाण्यात राहून ज्याप्रमाणे माशाशी वैर करता येत नाही, तसेच जो निवडून येण्याची शक्यता आहे, त्याच्याशी वैर पत्करून चालत नाही. त्यामुळेच बाबूश यांच्या पाठीशी राहण्याची सोईस्कर नीती धूर्त पणजीकर मतदारांनी अवलंबिली असेल तर त्यांना दोष देता येणार नाही. पणजीचे एकूण सामाजिक रूप बदलत चालले आहे. परप्रांतीयांच्या वस्त्या विविध प्रभागांतून वाढत आहेत. ह्या मंडळींना अशा राजकारण्यांचाच आधार हवा असतो. त्यामुळे तोही परिणाम मतदानातून दिसत असतो. कालच्या निकालात सर्वाधिक म्हणजे तब्बल 72 टक्के मते मिळवून आलेले उमेदवार तुकाराम चिनानावर हे आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे. बाबूश गटातील अनेक जुनेजाणते उमेदवार ह्या निवडणुकीत आपापल्या प्रभागातील आपले स्थान अधिक बळकट करण्यात यशस्वी ठरले आहेत, ज्याचा बाबूश यांना आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चित फायदा मिळेल. महापालिकेत भरभक्कम बहुमत मिळाले असल्याने त्यांचा आत्मविश्वास आता गगनाला जाऊन भिडेल. पुत्र रोहित मोन्सेर्रात हे स्वतः साठ टक्के मते मिळवून विजयी झालेच आहेत. ते पुन्हा महापौरपदी विराजमान होतील. उदय मडकईकर, कबीर मखिजा, कॅरोलिना पो वगैरे अनुभवी शिलेदार साथीला आहेतच. ह्यावेळी महिला उमेदवारांनीही महापालिकेत दिमाखात शिरकाव केला आहे. ह्या सगळ्यातून खरोखरच काही चांगले निष्पन्न व्हावे, पणजीचे आजचे बेशिस्त, बकाल रूप पालटेल अशी भाबडी आशा करूया!