बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत

0
1

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबर रोजी रात्री हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. या घटनेत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचीही माहिती समोर आली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत असून आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

काल मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी मूळ राजस्थानमधील उदयपूरचा रहिवासी असून त्याने 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे. भगवंत सिंग (32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो नवी मुंबईत राहत होता. भगवंत सिंग याच्या अटकेनंतर कोठडीत असलेल्या एकूण आरोपींची संख्या 10 वर पोहोचली आहे.

भगवंत सिंग या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, भगवंत सिंगने आरोपींना पुरवलेले शस्त्र कोठून आणले होते? त्याने ते शस्त्रे कसे पुरवले? तो राजस्थानमधून शस्त्रे घेऊन मुंबईत आला होता का? अशा सर्व गोष्टीचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

दरम्यान, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात गोळीबार करणाऱ्यांपैकी धर्मराज कश्यप, गुरमेल सिंह या दोघांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली होती. या दोघांना 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकणातील शिवकुमार गौतम आणि हत्येच्या कटात सहभागी असलेले अन्य दोघेजण अद्याप फरार आहेत.