टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व पाकिस्तानचा नवोदित कर्णधार बाबर आझम यांची तुलना योग्य नसल्याचे पाकिस्तानचा माजी कसोटीपटू व विद्यमान फलंदाजी प्रशिक्षक युनिस खान याने सांगितले आहे. बाबरला विराटच्या जवळपास जाण्यासाठी किमान पाच वर्षे लागतील असे युनिसला वाटते.
विराट आता चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि जगातील टॉप फलंदाज आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात चांगला खेळत आहे. आझमही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात चांगला खेळला आहे. परंतु, विराटने क्रिकेट क्षेत्रात जे काही मिळवले आहे. ते मिळवण्यासाठी आझमला ५ वर्षे तरी लागतील. आझमने ती उपलब्धी साध्य केल्यानंतर त्याची विराटसोबत तुलना करणे योग्य असेल. आझमला पाकिस्तान क्रिकेट संघाचा महत्त्वाचा फलंदाज समजले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ शतके करणार्या आझमविषयी बोलताना युनिस म्हणाला की, दुसर्या खेळाडूंंशी तुलना करून आझमवर निरर्थक दबाव टाकला जात आहे. त्याला थोडा वेळ द्यावा लागेल. जेणेकरुन तो भविष्यात सचिन तेंडुलकर किंवा जावेद मियांदादसारखा महान खेळाडू बनू शकेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून २१९०१ धावा केल्या आहेत. यात ७० शतके व १०४ अर्धशतकांचा समावेश आहे. ५६.१५च्या सरासरीने त्याने या धावा केल्या आहेत. दुसरीकडे बाबरच्या नावावर केवळ सात हजारांहून थोड्या जास्त धावा जमा आहेत.