साहित्य सृष्टीतील गुलमोहर

0
217
  •  सोमनाथ कोमरपंत

गोमंतकातील ज्येष्ठ कथाकार आणि दोन तपे ‘नवप्रभा’ दैनिकात सातत्याने ‘गुलमोहर’ या लोकप्रिय सदरात लिहिणारे ललितनिबंधकार जयराम पांडुरंग कामत यांचे आज पहाटे अल्प आजाराने निधन झाल्याची वार्ता माझे स्नेही अनिल लाड यांनी कळवली. ऐकून काळजाचा ठोका चुकला. ही बातमी ऐकल्यानंतर कैक वर्षांचा कालपट डोळ्यांसमोरून तरळून गेला. त्यांच्या वाङ्‌मयीन प्रवासाचा हा आलेख…..

गोमंतकातील ज्येष्ठ कथाकार आणि दोन तपे ‘नवप्रभा’ दैनिकात सातत्याने ‘गुलमोहर’ या लोकप्रिय सदरात लिहिणारे ललितनिबंधकार जयराम पांडुरंग कामत यांचे आज पहाटे अल्प आजाराने निधन झाल्याची वार्ता माझे स्नेही अनिल लाड यांनी कळवली. ऐकून काळजाचा ठोका चुकला. गेल्या बेचाळीस वर्षांपासून त्यांचे-माझे सौहार्दाचे संबंध होते. त्यांच्यापेक्षा मी दहा वर्षांनी लहान. पण वयाचे अंतर त्यांनी कधीही जाणवू दिले नव्हते. साहित्यलेखन, साहित्यवाचन आणि एकूणच वाङ्‌मयीन संस्कृती हा त्यांच्या श्‍वासाचा आणि ध्यासाचा विषय होता.

पण प्रदीर्घ काळ साहित्यसाधना करूनही चारचौघात वावरताना त्यांनी आपले लेखकपण कधीही मिरवले नाही. त्यांच्या ऋजू आणि सात्त्विक वृत्तीला साजेसेच ते वागत आले. हे निर्मोहीपण त्यांनाच शोभून दिसत होते. त्यामुळे गोव्याच्या साहित्यिक वर्तुळात त्यांना प्रतिष्ठा होती. सगळ्यांनाच त्यांच्याविषयी ममत्व वाटत होते. ‘जयराम पांडुरंग कामत’, ‘ज. पां. कामत’ किंवा नुसतेच ‘ज.पां.’ या आद्याक्षरांनी त्यांना संबोधले जाई. पण गोमंतकीय साहित्यविश्‍वाचा अथवा कथावाङ्‌मयाचा विचार करताना त्यांचे नाव डावलून कुणालाही जाता येत नसे. प्रादेशिक वळणाच्या कथा त्यांनी लिहिल्या. पण त्याच्याही पलीकडचे त्यांचे अनुभवविश्‍व व्यापक होते. साहित्याबरोबरच जीवनाच्या अन्य अंगप्रत्यंगांविषयी त्यांना आत्मीयता वाटत असे. बा. भ. बोरकरांच्या प्रतिभागुणांबद्दल त्यांना आदरभाव वाटत होता, तो केवळ ते त्यांचे निकटचे आप्त होते म्हणून नव्हे. त्यांच्याकडे सुजाणता आणि गुणग्राहकता होती. त्यांच्या – माझ्या भेटीत या कविश्रेष्ठाचा उल्लेख ‘आबा’ या जिव्हाळ्याच्या नावानेच व्हायचा. कौटुंबिक जिव्हाळा हा तर ज. पां. कामत यांचा स्थायी भाव होताच; शिवाय आपल्या प्रेमळ स्वभावामुळे जिवाभावाची माणसे त्यांनी जोडली होती. हा त्यांचा अपार जिव्हाळा त्यांच्या देहबोलीतून जाणवायचा.

शालेय शिक्षणासाठी ते आपले वडील बंधू श्रीराम पांडुरंग कामत यांच्या समवेत मुंबईत गेले. विलेपार्ल्याला राहिले. तेथील शालेय जीवनातील आठवणी, साहित्यसंस्थांविषयीच्या आठवणी तशाच नावाजलेल्या व्यक्तिमत्त्वांविषयीच्या आठवणी त्यांनी जतन करून ठेवल्या. कधी तरी… केव्हा तरी निवांत क्षणी ते हा आठवणींचा पुंज रिता करायचे. त्यात शाळेतील शिक्षकांची संस्मरणे ते जागवायचे… पु.ल. देशपांडे, डॉ. व. दि. कुलकर्णी आणि डॉ. सदा कर्‍हाडे इत्यादिकांच्या सहवासातील काही प्रसंग सांगायचे. सांगण्याचा बाज कथेचाच असायचा… नर्मविनोदाचा शिडकावा असल्याशिवाय त्यांचे हे संभाषण खुलत नसे. एकदा ते मला त्यांच्या घरी- अस्नोड्याला- घेऊन गेले. रात्रीच्या समयी ते मला गावाबाहेरच्या त्यांच्या ‘कामत सॉ मिल’कडे घेऊन गेले. ते सारे पाहिल्यानंतर त्यांच्या व्यवसायातील जटिलता आणि व्यग्रता ध्यानात येत होती. पण या कामातील धांदलीचा परिणाम त्यांनी आपल्या निर्मितिशीलतेवर होऊ दिला नव्हता. गर्दीपासून दूर असलेल्या या निवान्त ठिकाणी…. निशांत रात्री त्यांचे लेखन चालायचे. त्यांच्या मनातील गुलमोहर नित्य बहरतच राहिला.
ज. पां. कामत गेले ही बातमी ऐकल्यानंतर कैक वर्षांचा कालपट डोळ्यांसमोरून तरळून गेला. गोवामुक्तीच्या प्रसंगी पोर्तुगीजांनी अनेक पूल उडवून लावले. त्यांत अस्नोड्याचा पूल होता. नदीकाठी असलेल्या कामत यांच्या घराला धक्का बसला. प्रचंड नुकसानी त्यांना सहन करावी लागली… पुढे त्याच जागी नवी वास्तू उभी राहिली. मी शाळेत असताना ती बातमी वाचली होती. १९६३च्या दरम्यान ‘मांडवी’ मासिकाचे अंक वाचनात येऊ लागले. मुख्य संपादक श्रीराम पांडुरंग कामत होते. त्यांच्या समवेत जयराम पांडुरंग कामत यांचे नाव असायचे. ‘मांडवी’चे उत्तमोत्तम अंक त्यानंतर चौगुले महाविद्यालयात वाचले. पण कामतबंधूंची भेट घडली ती फार उशिरा.
१९ मार्च १९७८ रोजी ‘कला अकादमी’ने साहित्यपुरस्कारविजेत्या लेखक-कवींना पुरस्कार देण्याच्या निमित्ताने साहित्यमेळावा आयोजित केला होता. ज्ञानपीठ पुरस्कार विजेचे आणि नामवंत कन्नड साहित्यिक के. शिवराम कारंथ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अनेक साहित्यिकांबरोबर श्रीराम पांडुरंग कामत आणि जयराम पांडुरंग कामत हेही आले होते. राम-लक्ष्मणांची जोडी शोभावी तसे. त्या दोघांमधला जिव्हाळा वाखाणण्याजोगा, असे त्या वेळी जाणवले. त्यांच्याशी परिचय झाला. पुढे स्नेहभाव वाढतच गेला.

‘राज्य विकास शिक्षणसंस्थे’ने एन.सी.आर.टी.मार्फत पहिली ते चौथीपर्यंतची मराठीची पाठ्यपुस्तके तयार करण्याचा प्रकल्प राबविला. अनेक मंडळींपैकी जयराम पांडुरंग कामत आणि मीदेखील होतो. पाठ तयार करण्यासाठी कधी पर्वरीला तर कधी मडगावच्या ‘महिला इंग्लिश हायस्कूल’मध्ये बैठका व्हायच्या. चर्चा व्हायची. त्या निमित्ताने आम्ही दोघे खूप जवळ आलो. एकदा ते मला पर्वरीला बा. भ. बोरकरांकडे घेऊन गेले होते. त्या दोघा बंधूंनी दिलेला ‘मांडवी’ मासिकाचा ‘बा. भ. बोरकर विशेषांक’ माझ्या संग्रही आहे.
चंद्रकांत केणी ‘इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा’ या संस्थेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी ‘कथा’ या वाङ्‌मयप्रकारावरचे एकदिवसीय कृतिसत्र आयोजित केले होते. मराठी कथेचे प्रतिनिधित्व जयराम पांडुरंग कामत यांनी केले होते. कथेवर त्यांनी केलेले भाषण माझ्या स्मरणात आहे. सैद्धांतिक बैठकीपेक्षा अनुभवसिद्ध उद्गारांमुळे त्यांचे विवेचन प्रभावी ठरले होते.

त्यांच्या समृद्ध सहवासातील असे कितीतरी आनंददायी क्षण सांगता येतील. त्यांना ‘गोमंतक मराठी अकादमी’ने अधिसदस्यत्व दिले. त्यांच्या ‘अंधारयात्री’ या कथासंग्रहाला ‘कला अकादमी’चा साहित्यपुरस्कार १९८२-८३ सालासाठी देण्यात आला. त्यांच्या आयुष्यातील या काही आनंदक्षणांचा साक्षीदार मला होता आले याबद्दल धन्यता वाटते. कारण आमचे दोघांचे संबंधच तसे जिव्हाळ्याचे राहिले. त्यांनी ते अबोल वृत्तीने जपले.

जयराम पांडुरंग कामत यांचा वाङ्‌मयीन प्रवास सुखासुखी झालेला नाही. त्यात अनेक खडतर वळणे- वाकणे आहेत. तो समजून घेणे नव्या पिढीला उद्बोधक वाटेल. गोवा पारतंत्र्यात असताना प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे हेदेखील दुरापास्त होई. अर्धपोटी राहून शिक्षक शाळा चालवीत. अगदी जीवन असह्य झाले की शाळा बंद करून आपल्या गावी निघून जात. परिणामी अनेक मुले प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहत.

मुंबईत नोकरी करणार्‍या जयराम पां. कामत यांच्या थोरल्या भावाने त्यांना तिथे नेले. पार्ले येथील टिळक विद्यायलात त्यांना चौथ्या इयत्तेत प्रवेश मिळाला. मात्र तिसरी इयत्ता पास झाल्याचं व शाळा सोडल्याचा दाखला द्यायचे बंधन होते. तो अखेरपर्यंत देता आला नाही. परंतु चौथीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून पास झाल्यामुळे त्यांना रीतसर पाचवीत प्रवेश मिळाला. मध्यंतरी त्यांना अनारोग्याने छळले. औषधांनी उतार पडेना. आयुर्वेदिक औषधांमुळे तब्येत सुधारली. या आजारामुळे त्यांची तीन वर्षे वाया गेली. आजारपणाच्या काळात त्यांना अंथरुणावर पडून रहावे लागले. घरची गुरे रानात वळवून आणण्याचे कामदेखील त्यांना करावे लागले. पण अनुभव कामी आला.

मुंबईत त्यांचे पुनरागमन झाले. एका नियमाचा आधार घेऊन त्यांना आठवीत प्रवेश दिला गेला. अभ्यासात मागे पडल्यामुळे तो त्यांना करावासाच वाटेना. पण बहिणीने केलेल्या उपदेशामुळे शालेय अभ्यास निष्ठेने करण्याचे व्रतच त्यांनी स्वीकारले. त्यांच्या यशाचा आलेख चढताच राहिला. त्यांचा आत्मविश्‍वास वाढतच गेला. गणित, भूमिती व चित्रकला सोडून इतर विषयात त्यांना चांगले मार्क्‌स मिळू लागले. वर्ग शिक्षिका श्रीमती इं. मं. तिनईकर या बर्‍यापैकी कवयित्री होत्या. त्यांच्या प्रोत्साहनामुळे कामत यांना साहित्याविषयी गोडी वाटू लागली. लोकमान्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांनी लिहिलेली कविता गाऊन दाखविण्यात आली; तेव्हा सबंध शाळेतून एकाच वेळी टाळ्यांचा कडकडाट झाला.
एखाद्या कथेत शोभावा असाच त्यांच्या जीवनातील हा रोमांचकारी प्रसंग आहे.

त्यांच्या वर्धिष्णू यशाच्या महत्त्वाच्या गोष्टी येथे अधोरेखित करण्यासारख्या आहेत.
१९५७मध्ये ते एस.एस.सी.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांची एक कविता ‘नवशक्ती’च्या रविवार आवृत्तीच्या बालविभागात प्रसिद्ध झाली. अनेक नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. ‘संजय’ मासिकाच्या ‘समस्यापूर्ती’त ते नियमितपणे भाग घेऊ लागले. त्यांच्या अवांतर वाचनाचा वेग वाढतच चालला. ‘मौज’ साप्ताहिक ते आवडीने वाचू लागले. त्यातील गंभीर विषयांकडे त्यांचा कल नव्हता. परंतु त्यातील पुस्तक परीक्षणाचे पान आणि ‘माणूस’ या टोपणनावाने प्रत्येक आठवड्याला एक पूर्ण पान दिली जाणारी कथा त्यांना आकर्षित करायची. (अंबादास अग्निहोत्री हे त्या लेखकाचे नाव). पं. महादेवशास्त्री जोशी यांची ‘मानिनी’ ही कथा त्यांना अभ्यासासाठी नेमलेली होती. त्यातील विषय, भाषा, प्रसंगांची गुंफण त्यांना अत्यंत भावली. शिवाय शास्त्रीबुवा गोव्याचे आहेत हे कळल्यानंतर त्यांना विशेष ममत्व वाटले.

गोमंतकातील एका आघाडीच्या कथालेखकाच्या जडणघडणीची ही अनोखी कहाणी!
जयराम पांडुरंग कामत यांचे ‘अंधारयात्री’ आणि ‘क्रांतिदूत’ हे कथासंग्रह सुरुवातीच्या कालखंडात प्रसिद्ध झाले. ‘अंधारयात्री’ या संग्रहासंबंधी एक बाब आवर्जुन सांगायला हवी. १९७५ मध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’ या मराठीतील अग्रगण्य दैनिकाने पहिली कथास्पर्धा घेतली, तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तिच्यासाठी आलेल्या ८२७ कथांमधून ‘क्रांतिदूत’ या कथेला पहिला क्रमांक मिळाला. कामत यांच्या कसदार लेखनाला समग्र मराठी कथाविश्‍वाकडून मिळालेली ती मान्यता होती. जयराम पांडुरंग कामत हे केवळ गोमंतकीय कथाकार राहिले नाहीत. ते मराठी साहित्यविश्‍वातील महत्त्वाचे कथाकार ठरले आहेत. ‘सुखिया’ या त्यांचा २००७ मध्ये कथासंग्रह. त्यांच्या परिणतावस्थेतील हा संग्रह त्यांच्या वाङ्‌मयीन गुणवत्तेची साक्ष देणारा ठरला आहे.

‘गुलमोहर’चा विचार केल्याशिवाय त्यांच्या वाङ्‌मयीन कर्तृत्वाचा आलेख परिपूर्ण होणार नाही. थॉमस कार्लाईलने ‘‘वर्तमानपत्री वाङ्‌मय म्हणजे गुडघाभर पाणी!’’ असे म्हटले तरी ते विधान तेवढ्या वृत्तिगांभीर्याने घेण्याचे कारण नाही. समाजामध्ये भिन्न भिन्न अभिरुची असलेली माणसे असतात. त्या अभिरुचीचा लघुत्तम साधारण विभाजक काढून वाङ्‌मयीन अभिरुचीचा राजरस्ता खुला करण्याचे काम, सेतुबंधनाचे काम लेखकांना करावे लागते. जयराम पांडुरंग कामत यांनी ‘नवप्रभा’मध्ये २४ वर्षे सातत्याने ‘गुलमोहर’ हे सदर चालविले. आपला स्वतःचा वाचकवर्ग त्यांनी निर्माण केला. लेखन हा प्रतिभाजन्य मनोव्यापार असला तरी त्यात शारीरिक परिश्रमांचा भाग असतो. सर्व प्रकारच्या व्यथा-वेदना बाजूला ठेवून, आत्ममग्न राहून लेखकाला त्यासाठी स्वतः झोकून द्यावे लागते. कामत यांनी ते नेकीने केले.
साहित्यक्षेत्रातील या माझ्या ज्येष्ठ सुहृदाला भावपूर्ण श्रद्धांजली!