बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या बाहेरील परिसरात एका दुकानाच्या बाहेर संतोष कांबळी (39) याचा खून झाला होता. या प्रकरणाचा 72 तासांत छडा लावण्यात आगशी पोलिसांना यश आले आहे. या खून प्रकरणातील संशयित आरोपी हृतिक रवींद्र सोलंकी (24, रा. चंद्रपूर महाराष्ट्र) याला वास्को रेल्वे स्थानकाजवळ अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात हत्येमागील कारण आर्थिक वाद असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली. गेल्या रविवार 13 एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास बांबोळी येथे एका बंद दुकानाच्या बाहेर एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आगशी पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये सदर मृतदेह संतोष कांबळी (सध्या रा. सांताक्रूझ, मूळ बेळगाव) नामक व्यक्तीच्या असल्याचे समोर आले होते. मृतदेहाच्या डोक्यावर जखमा होत्या. त्यामुळे पोलिसांनी श्वानपथक आणि न्यायवैद्यक पथकाच्या मदतीने तपासकाम हाती घेतले. घटनास्थळावरून दारूची बॉटल आणि घरगुती वापराच्या वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या. संतोष कांबळी याचा मृत्यू डोक्यावरच्या जखमांमुळे झाल्याचे शवचिकित्सा अहवालात स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करून तपासकामाला सुरुवात केली. या खून प्रकरणाच्या तपासासाठी नियुक्त तपास पथकामध्ये एएसपी (यूटी) अरुण बालगोत्रा, पोलीस शिपाई राजू अत्तार, शिपाई राघोबा, संजय वरक, एचसी राज आणि पोलीस शिपाई विद्या यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.