गोवा रिअल इस्टेट रेग्युलेटरी प्राधिकरणाने (रेरा) सध्या सुरू असलेल्या रिअल इस्टेट प्रकल्पाच्या नोंदणीसाठीची मुदत आणखी एक महिन्याने वाढवली आहे. एका आदेशानुसार आता सध्याच्या प्रकल्पाच्या नोंदणीसाठी अर्ज सादर करण्यासाठी २३ मार्च २०१८ पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच, पन्नास हजार रूपयांच्या दंडासह नोंदणीसाठी ३१ मार्च २०१८ पर्यत अर्ज अपलोड केले जाऊ शकतात, असेही आदेशात म्हटले आहे.
या संबंधीचा एक आदेश रेराचे अंतरिम प्राधिकारी, नगरविकास खात्याचे सचिव सुधीर महाजन यांनी जारी केला आहे. रेरा कायद्याखाली सुरू असलेल्या प्रकल्पासाठी नोंदणी अर्ज ऑन लाईन पध्दतीने स्वीकारले जात आहेत. नगरविकास खात्याने पाटो, पणजी येथे ‘रेरा’ खास विभाग सुरू केला आहे. रेरा अर्तंगत बिल्डर, प्रवर्तकच्या नोंदणीसाठी ऑन लाईन पध्दत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. रेराच्या अधिकार्याकडून ऑन पध्दतीने मिळणार्या अर्जाची तपासणी करून नोंदणीसाठी पुढील प्रक्रिया केली जात आहे. रियल इस्टेट प्रकल्पाच्या नोंदणीसाठी आत्तापर्यत दीडशेच्यावर अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्र सरकारच्या रिअल इस्टेट ऍक्ट २०१६ (रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट) या कायद्याच्या कार्यवाहीची जानेवारी २०१७ पासून सर्व राज्यांकडून केली जात आहे. नगरविकास खात्याने रेरा कायद्याच्या कार्यवाहीसाठी गोवा रिअल इस्टेट नियम २०१७ तयार केला आहे. मुळात राज्य सरकारने ‘रेरा’ कायद्याची अंमलबजावणी सात महिन्यांनी उशिरा सुरू केली आहे. ‘रेरा’ कायद्याचे अंतिम नियम २४ नोव्हेंबर २०१७ रोजी अधिसूचित केले. नियम अधिसूचित केल्यानंतर तीन महिन्यांत बिल्डर व प्रवर्तक, एजंटांना नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीसाठी २३ फेब्रुवारी २०१८ पर्यंत कायद्यानुसार मुदत देण्यात आली होती. रेरा अर्तंगत प्रकल्प नोंदणीसाठी अर्ज केलेल्या बिल्डर, प्रवर्तक यांच्या अर्जांची तपासणी करून त्यांना मान्यता देण्याचे काम केले जात आहे. आत्तापर्यत २० जणांना मान्यता देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात रेरा कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी एप्रिलपासून होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु, प्रकल्पाच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आल्याने एप्रिलपासून रेराची अंमलबजावणीबाबत अनिश्चितता व्यक्त केली जात आहे. या कायद्याखाली सध्या सुरू असलेल्या आणि नव्या इमारत प्रकल्पांचे प्रवर्तक आणि बिल्डरांची नोंदणी सक्तीची आहे. रेरामुळे ग्राहकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.