
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभव टाळण्यासाठी बांगलादेशची धडपड सुरू आहे. चौथ्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला नसता तर कदाचित बांगलादेशच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले असते. द. आफ्रिकेने आपला दुसरा डाव ६ बाद २४७ धावांवर घोषित करत विजयासाठी ४२४ धावांचे लक्ष्य बांगलादेशसमोर ठेवल्यानंतर बांगलादेशची चौथ्या दिवसअखेर ३ बाद ४९ अशी स्थिती झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील ४९६ धावांना उत्तर देताना बांगलादेशचा पहिला डाव ३२० धावांत आटोपला होता.
तिसर्या दिवसअखेर द. आफ्रिकेने आपल्या दुसर्या डावात २ बाद ५४ धावा केल्या होत्या. पावसाची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या फलंदाजांनी काल आक्रमक खेळ केला. तेंबा बवुमाने १०७ चेंडूंत ७१ तर कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने १०१ चेंडूंत ८१ धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून मोमिनूल हकने ३, मुस्तफिझुर रहमानने २ तर शफिउल इस्लामने १ गडी बाद केला. ४२४ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या दुसर्या डावाची सुरुवात भयावह झाली. तमिम इक्बाल (०) व मोमिनूल हक (०) बाद झाले त्यावेळी संघाचे खातेदेखील उघडले नव्हते. मॉर्नी मॉर्कलने त्यांना बाद केले. पावसाच्या आगमनापूर्वी केशव महाराजने इमरूल काईस (३२) याचा बळी घेत बांगलादेशला संकटात टाकले. पावसामुळे चौथ्या दिवशी केवळ ५५.४ षटकांचा खेळ झाला असून पराभव टाळण्यासाठी बांगलादेशला पावसाची प्रार्थना करावी लागेल.