बस दरीत कोसळून ७ जवान मृत्यूमुखी

0
18

>> जम्मू-काश्मीरमधील घटना; ३२ जवान जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये चंदनवारीत आयटीबीपीच्या जवानांची बस दरीत कोसळून काल भीषण अपघात झाला. या अपघातात ७ जवानांचा मृत्यू झाला. या बसमधून एकूण ३९ जवान प्रवास करत होते. या अपघातात ३२ जवान जखमी झाले.

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये आयटीबीपी अर्थात इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलाच्या ३७ जवानांना बस जात होती. त्यांच्यासोबत जम्मू-काश्मीरचे दोघेही पोलीस देखील होते. ही बस चंदनवारी भागातून पहलगामच्या दिशेने येत होती. चंदनवारी येथे सुमारे २०० फूट खाली दरीत कोसळली. त्यात या बसचा चक्काचूर झाला. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अचानक ब्रेक निकामी झाल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळली.

अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी आयटीबीपीचे जवान तैनात करण्यात आले होते. अमरनाथ यात्रा संपल्यानंतर हे जवान परतत होते. त्याचदरम्यान हा अपघात झाला.

काश्मिरी पंडितांवर गोळीबार; एकाचा मृत्यू
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात काल एका काश्मिरी पंडिताचा मृत्यू झाला. शोपियन येथे दहशतवाद्यांकडून दोन भावांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका भावाचा मृत्यू झाला, तर एक जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून स्थलांतरितांना लक्ष्य केले जात असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तीची ओळख पटली असून, त्याचे सुनील कुमार असे आहे. त्याचा भाऊ पिंटू कुमार जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.