बिहारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार

0
11

>> ३१ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; खातेवाटप देखील जाहीर

बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी पार पडला. नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये पहिल्या विस्तारात ३१ मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपची साथ सोडून तेजस्वी यादव यांच्यासोबत महागठबंधन करून नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी सरकार स्थापन केले. त्यांच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी राजभवनात पार पडला. राज्यपाल फागू चौहान यांनी आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. शपथविधीनंतर खातेवाटप देखील जाहीर झाले.

मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ३१ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. जदयू पक्षाचे सर्वेसर्वा असलेले नितीशकुमार या सरकारचे नेतृत्व करत असून, उपमुख्यमंत्रीपद राजद पक्षाचे तेजस्वी यादव यांच्याकडे देण्यात आलेले आहे. या सरकारमध्ये सर्वाधिक १६ मंत्रिपदे राजद पक्षाला मिळाली आहेत. नितीश कुमार यांच्या पक्षाच्या वाट्याला ११ मंत्रिपदे आली आहेत. कॉंग्रेस पक्षाला २, तर हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि एका अपक्ष आमदाराला प्रत्येकी १ मंत्रिपद देण्यात आले आहे.

या विस्तारानंतर मंत्र्यांना खात्यांचे वाटप देखील करण्यात आले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गृहमंत्रालय स्वत: कडे ठेवले असून, तेजस्वी यादव यांना आरोग्य मंत्रालय देण्यात आले आहे. तेज प्रताप हे वन आणि पर्यावरण खात्याचे मंत्री असतील.
या मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पक्षाला राजदच्या तुलानेत कमी मंत्रिपदे मिळाली असली तरी सर्व महत्त्वाची खाती नितीशकुमार यांनी स्वत:कडे ठेवून घेतली आहेत.

त्यांच्याकडे गृहखाते असेल. गृहखात्यासोबतच सामान्य प्रशासन, कॅबिनेट सचिवालय या खात्यांचा कारभारदेखील त्यांच्याकडेच असणार आहे. तसेच जी खाती कोणत्याही मंत्र्यांना देण्यात आलेली नाहीत, ती सर्व खातीदेखील नितीशकुमार सांभाळतील.
जदयूने मोहम्मद जमा खान, जयंत राज, शीला कुमारी, सुनील कुमार, संजय झा, मदन साहनी, श्रवण कुमार, अशोक चौधरी, लेशी सिंह, विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र यादव यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी दिली.

राजद पक्षाकडून तेजप्रताप यादव, आलोक मेहता, सुरेंद्र प्रसाद यादव, रामानंद यादव, कुमार सर्वजित, ललित यादव, समीर कुमार महासेठ, चंद्रशेखर, जितेंद्र कुमार राय, अनिता देवी, सुधाकर सिंग, इस्रायल मन्सुरी, सुरेंद्र राम, कार्तिकेय सिंग, शाहनवाज आलम, शमीम अहमद या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.