>> महिलेसह दोन सहआरोपींना प्रत्येकी २० वर्षे कारावास; दोघे दोषमुक्त
अखेर अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी येथील विशेष न्यायालयाने काल एका निवाड्यात स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याला जन्मठेप सुनावली. आसारामसह अन्य दोन आरोपींनाही न्यायालयाने दोषी ठरवले आहे. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम हा असाच कथित अध्यात्म गुरू दोषी सिद्ध झाल्यास वर्ष उलटण्याआधीच आसाराम हा दोषी सिद्ध झाला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश मधुसूदन शर्मा यांनी वरील निवाडा दिला. जोधपूर मध्यवर्ती तुरुंगात तयार केलेल्या न्यायालयात निवाडा सुनावण्यात आला.
७७ वर्षांच्या आसारामला न्यायालयाने जन्मठेप ठोठावली, तर याच प्रकरणातील त्याचे सहआरोपी शरद व शिल्पी या दोघांना प्रत्येकी २० वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला. उर्वरीत जीवन कारावासात घालवावे लागणार याची जाणीव झालेला आसाराम न्यायालयात ओकसाबोक्शी रडला. आसाराम याला १ लाख रु. चा दंडही ठोठावण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमधील शहाजहॉंपूर येथील असलेल्या व आसारामच्या मध्य प्रदेशमधील छिंदवाडा येथील आश्रमात शिकणार्या १६ वर्षीय मुलीने आसारामने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार नोंदवल्यानंतर आसारामला अटक झाली होती. जोधपूरनजीकच्या मनाई येथील आश्रमात बोलावून १५ ऑगस्ट २०१३ रोजी रात्री आसाराम याने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित मुलीने केला होता. त्यानंतर आसारामला इंदूर येथे अटक करून १ सप्टेंबर २०१३ रोजी जोधपूरला आणण्यात आले होते. त्यावेळेपासून तो न्यायालयीन कोठडीत आहे.
पोलिसांनी आसाराम याच्यासह अन्य ४ आरोपींवर ६ नोव्हेंबर २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. सहआरोपींपैकी संचिता गुप्ता उर्फ शिल्पी पीडित मुलीच्या वसतीगृहाची वॉर्डन होती. तर शरद हा छिंदवाडा येथील आश्रम शाळेचा संचालक होता. शिल्पी व शरद या दोघांवर बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता व तो आरोप न्यायालयात सिद्ध झाल्याने त्यांना प्रत्येकी २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी १९ मार्च २०१७ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाली आणि १६ डिसेंबर २०१७ रोजी ही सुनावणी एससी-एसटी प्रकरणे हाताळणार्या विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आली. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदाविषयक प्रकरणांच्या विशेष न्यायालयात या खटल्यातील अंतिम युक्तीवाद गेल्या ७ एप्रिल रोजी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल २५ एप्रिल रोजी जाहीर करण्याचे स्पष्ट केले.
आसाराम संत नव्हे, पापी ः वकील
या खटल्यातील सरकारी वकील पोकर राम बिष्णॉय यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही न्यायालयासमोर युक्तीवाद करताना आसाराम हा संत नसून पापी आहे यावर भर दिला. आसारामने पीडित मुलीला कारस्थान रचून वसतीगृहातून बोलावून आणून तिच्यावर बलात्कार केला. ही बाब सिद्ध केली व त्यानुसार आसारामला अधिकाधिक शिक्षा ठोठावण्याची मागणी केली. असे ते म्हणाले.
पुढील निर्णय वकिलांच्या
सल्ल्यानंतर ः प्रवक्त्या
विशेष न्यायालयाने निकाल जाहीर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आसाराम याच्या प्रवक्त्या नीलम दुबे यांनी आपल्या वकिलांशी निकालासंदर्भात चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले. न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचे दुबे म्हणाल्या.
न्याय मिळाल्याची पीडितेच्या
वडिलांची प्रतिक्रिया
आसाराम बापू याला न्यायालयाने जन्मठेप ठोठावल्याने आपल्याला न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. आसाराम याच्यावर अन्य काही अशाच प्रकरणात गुन्हे दाखल असून त्या पीडितांनाही न्याय मिळण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील शिवा व प्रकाश या दोघांना निर्दोष ठरवून न्यायालयाने त्यांची मुक्तता केली आहे.