संपूर्ण देश हादरवून सोडणार्या हैदराबादच्या तोंडापल्लीतील बलात्कार प्रकरणाचे चारही आरोपी पोलीस एनकाऊन्टरमध्ये काल ठार झाले. मानवतावादाचे स्वयंघोषित कैवारी आता या एनकाऊन्टरविषयी संशय व्यक्त करतील, संबंधित पोलिसांविरुद्ध कारवाईचा आग्रहही धरतील, बहुधा त्यांची न्यायालयीन चौकशीही होईल, परंतु हे दांभिक काहीही म्हणोत, संपूर्ण देशामध्ये या घटनेमुळे आज जी समाधानाची लाट उसळलेली दिसते आहे, त्याला अशा बलात्काराच्या घटनांमध्ये सर्रास प्रत्ययाला येणारा आपल्या एकंदर न्यायव्यवस्थेचा विदारक अनुभवच कारणीभूत आहे. त्यामुळेच चारही बलात्कार्यांचा अशा प्रकारे तडकाफडकी खात्मा झाला त्याचे देशभरात स्वागत होताना दिसते. प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पळवाटा शोधून जसे अनंत अपराधी सुटतात तसेच हे लोकही मोकळे सुटू शकले असते अशी भावना जनतेच्या मनात आहे, म्हणूनच ते या एनकाऊन्टरबद्दल समाधानी दिसत आहेत हे विसरून चालणार नाही. गुन्ह्यानंतर जामीनावर मुक्त झालेल्या चार नराधमांनी परवाच उन्नांवमध्ये न्यायालयात सुनावणीस चाललेल्या पीडितेला भोसकून जिवंत जाळण्याची भीषण घटना तर ताजीच आहे. बलात्कारासारख्या घटनांमध्ये आरोपी ताठ मानेने हिंडतात, परंतु पीडितेचे उर्वरित आयुष्य नरक होऊन जाते. प्रस्तुत घटनेमध्ये तर चारही नराधमांनी पीडितेवर केवळ अत्याचारच केले नाहीत, तर तिला निर्घृणपणे जाळूनही टाकले. अशी हैवानियत दाखवणार्यांना कसला आला आहे ‘मानवा’धिकार? ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याने न्याय मागायचा असतो. न्यायालये त्यांच्यासाठी असतात. दुसर्यावर अन्याय, अत्याचार करून जीव घेणार्यांसाठी नव्हे! ज्या रस्त्यावर पीडितेवर अत्याचार झाले, त्याच रस्त्यावर झालेल्या चकमकीत गुन्हेगार मारले जाणे हा एका परीने दैवाने केलेला त्यांच्या पापांचा हिशेबच आहे! अशा अनेक गंभीर गुन्ह्यांतील आरोपी प्रदीर्घ न्यायप्रक्रियेमध्ये पळवाटा शोधून मोकळे सुटतात तेव्हा त्याला न्याय कसे म्हणायचे? दिल्लीमधील २०१२ च्या निर्भयाकांडातील आरोपी फाशीची शिक्षा झालेली असूनही अजून तुरुंगात बिर्याणी झोडत आहेत. फाशीची शिक्षा होऊनही अनेक गुन्हेगार राष्ट्रपतींकडे दयेची याचिका करून वर्षानुवर्षे तुुरुंगात फुकटचा पाहुणचार झोडत असतात. अशा हैवानांचा पुळका घेऊन फाशीची शिक्षाच रद्दबातल करण्यात यावी अशी मागणी करणार्या ढोंगी लोकांचीही आपल्या देशात कमी नाही. या सगळ्या पार्श्वभूमीमुळेच हैदराबादच्या या एनकाऊन्टरचे समर्थन देशात आज होते आहे. कोणत्याही सुसंस्कृत देशामध्ये गुन्हेगारांना अशा प्रकारे तडकाफडकी शिक्षा दिली जात नाही हे खरे आहे, परंतु त्याचा अर्थ गुन्हेगारांना सुटकेची अधिकाधिक संधी देत राहणे असाही होत नाही. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही म्हणूनच तर पावलोपावली अशी बलात्कार प्रकरणे घडत असतात. कायद्याची जरब असती, धाक असता तर कोणी असे पाशवी गुन्हे करायला धजावलेही नसते. त्यामुळे पोलिसांनी एनकाऊन्टरद्वारे गुन्हेगारांचा तडकाफडकी खात्मा केला याचे जर आज देशामध्ये स्वागत होत असेल तर त्याचे खरे कारण आपण गुन्हेगारांना गुन्ह्यास प्रवृत्त न होण्याची जरब बसवू शकलेलो नाही हेच आहे आणि त्याबाबत अधिक मंथन होण्याची गरज आहे. दिल्लीच्या निर्भयाकांडानंतर कायदे थोडे कडक झाले, परंतु त्यांची कार्यवाही ज्या वेगाने आणि निर्धाराने व्हायला हवी ती होताना मात्र दिसत नाही. हैदराबादच्या या पीडितेच्या कुटुंबियांना पोलिसांकडून जी वागणूक मिळाली, त्यांना गुन्ह्याचे क्षेत्र आपल्या हद्दीतले नसल्याचे सांगून इथून तिथे भटकण्यास भाग पाडले गेले, जी अनास्था दाखवली गेली, त्यामुळे तेलंगणामध्ये पोलिसांवर जनतेचा प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्याचे प्रत्यंतरही सातत्याने चाललेल्या उग्र निदर्शनांतून येत होते. पोलीस स्थानकाची घेराबंदी करून जमावाने गुन्हेगारांना आपल्या ताब्यात देण्याची मागणी चालवलेली होती. पोलिसांवरील जनतेच्या या दबावापोटी आणि त्यातून आलेल्या ताणातूनही हे एनकाऊन्टर घडलेले असू शकते. चारही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पोलिसांवर प्रतिहल्ला चढवला, त्यामुळे त्यांना ठार मारण्याशिवाय पर्याय उरला नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे. वस्तुस्थिती तशी असेल तर ते समजण्यासारखे आहे, कारण हे आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले असते तर आधीच संतप्त असलेल्या जनतेनेच पोलिसांना दे माय धरणी ठाय करून सोडले असते. त्यामुळे त्या दडपणाखाली असलेल्या पोलिसांनी गोळीबाराद्वारे चौघाही आरोपींना यमसदनास पाठवलेले असू शकते. या एनकाऊन्टरला राजकीय लोकप्रियता मिळवण्याचे परिमाणही असू शकते. काहीही असो, जे घडले त्याबद्दल खेदोद्गार काढण्याचा दांभिकपणा दाखवण्यापेक्षा गुन्हेगारांना लवकरात लवकर आणि कठोरातील कठोर शिक्षा कशी मिळेल, कायद्यातील पळवाटांचा लाभ त्यांना कसा मिळणार नाही हे पाहिले जावे. मग अशा एनकाऊन्टरची वेळच येणार नाही आणि जनतेकडून त्यांचे समर्थनही होणार नाही!