नीरव मोदीच्या बनवेगिरीची कूळकथा

0
176

एडिटर्स चॉइस
– परेश प्रभू

बँकेकडून मिळालेल्या या हमीपत्राच्या माध्यमातून विदेशातील बँकांकडून कोट्यवधींचे कर्ज मिळवायचा, परंतु पीएनबी बँकेच्या सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद केली जात नसे. त्यामुळे तो बँकेला काही देणेच लागत नसे. मात्र पीएनबीला या विदेशातील बँकांना देणे द्यावेच लागे. म्हणजे बँक बुडीत खात्यात चालली होती. नीरव मोदी मात्र नामानिराळा होता…

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांना गंडवून देशाबाहेर पळालेल्या आणि सध्या लंडनच्या तुरुंगात असलेल्या नीरव मोदीने भारतीय बँकिंग व्यवस्थेला दिलेल्या हादर्‍यातून ती अजून सावरू शकलेली नाही. नीरव मोदीला भारतात आणण्याचे प्रयत्नही अद्याप सुरू आहेत. मुंबईच्या विशेष न्यायालयाने नुकतेच त्याला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित केले. विजय मल्ल्यानंतर हा ‘सन्मान’ मिळवणार्‍या या नीरव मोदीची कूळकथा सांगणारे, त्याचा यशस्वी उद्योजकापासून आर्थिक गुन्हेगारापर्यंतचा प्रवास सांगणारे एक लक्षवेधी पुस्तक नुकतेच बाहेर आले आहे. ज्येष्ठ आर्थिक पत्रकार पवन सी. लाल लिखित व ‘हॅशेट इंडिया’ प्रकाशित या पुस्तकाचे नाव आहे ‘फ्लॉड ः द राईझ अँड फॉल ऑफ इंडियाज् डायमंड मुघल नीरव मोदी.’
सप्टेंबर २०१५ मध्ये न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमधील मॅडिसन स्क्वेअरसारख्या उच्चभ्रू भागामध्ये नीरव मोदी ब्रँडच्या हिर्‍यांच्या दुकानाचे दिमाखदार उद्घाटन होते तिथपासून हे पुस्तक सुरू होते. २३० कॅरटचा आणि १.६ दशलक्ष डॉलर किमतीचा ‘महाराणी नेक्लेस’ही तेथे प्रदर्शित केलेला असतो. अनेक बड्या मंडळींच्या उपस्थितीत आणि हिर्‍यांच्या झगमगाटामध्ये झळकणारे नीरव मोदी हे नाव पुढच्या तीन चार वर्षांतच जगातील बड्या आर्थिक गुन्हेगारांच्या यादीत कसे पोहोचले? हे पुस्तक ही याचीच कहाणी आहे आणि पवन लाल यांच्यासारख्या आर्थिक पत्रकारितेमधील तज्ज्ञ व्यक्तीच्या लेखणीतून ती वाचणे खरेच उद्बोधक आहे.

भारतातील हिरे व्यवसाय हा पारंपरिकरीत्या पालनपुरी जैन समाजाच्या हाती राहिला आहे. आज भले त्यात अन्य मारवाडी, काठियावाडी आणि इतर या क्षेत्रात आलेले असले तरी सुरवातीचे योगदान पालनपुरी जैनांचेच राहिले आहे. अशाच एका कुटुंबातील केशवलाल मोदी या हिरे व्यापार्‍याचा नीरव हा नातू. त्याचे वडील दीपक बेल्जियममध्ये स्थायिक झालेले व हिर्‍यांच्याच व्यवसायात असलेले एक नाव. चिनुभाई चोक्सी यांच्या गीता या मुलीशी त्यांचा विवाह झाला. चिनुभाईंनी आपल्या चार मुलींपैकी गीता आणि अंजली या मुलींच्या नावाने कंपनी थाटली तीच ‘गीतांजली जेम्स.’ तर असा हा हिर्‍याचा चमचा तोंडात घेऊन आलेला नीरव मोदी १९९९ साली भारतात मुंबईत आला आणि मामा मेहुल चोक्सीच्या व्यवसायात लक्ष घालता घालता त्याने स्वतःचा स्वतंत्र व्यवसायही उभारला. बघता बघता त्याने आपला व्यवसाय वाढवत नेला. चीन, अमेरिका, लंडन, हॉंगकॉंग आणि भारतातमध्ये त्याची भव्य दिव्य शोरूम्स उभी राहिली. वर्षातील दोनशे दिवस जगभर प्रवास करणारा असा हा नीरव मोदी.
हिरा ही अशी गोष्ट आहे जी चिरस्थायी मानली जाते. तिचे मूल्य नेहमीच मोठे राहिले आहे. शिवाय ती एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणेही सुलभ आणि त्याचा मागही राहात नाही. साहजिकच गुन्हेगारी जगताचेही हिरे व्यापाराशी साटेलोटे नेहमीच राहिले आहे. हिर्‍याच्या खाणी आज मुख्यतः दक्षिण आफ्रिकेत सापडतात. ‘डी बेअर्स’ हे या व्यवसायातले आघाडीचे नाव. ‘डायमंड इज फॉरेव्हर’ म्हणजेच ‘हिरा है सदाके लिए’ ही टॅगलाइन त्यांचीच. बेल्जियम हे हिरे व्यापाराचे जागतिक केंद्र. कच्चे हिरे त्यांना आकार देऊन पॉलिशिंगसाठी पूर्वी भारतात सूरतला पाठवले जायचे. सूरत हे हिरे व्यापाराचे केंद्र होते व आजही आहे. पन्नास साली तेथे असा व्यवसाय करणारे ३०० कारागीर होते. आज ती संख्या आठ लाखांच्या घरात आहे. हिरे व्यापाराची ही सगळी पार्श्वभूमी विस्ताराने विशद करत लेखक मूळ विषयाकडे येतो.

मेहुल चोक्सीने आपल्या व्यवसायाचा विस्तार करताना एका ब्रँडच्या जोडीने गिली, आस्मी, नक्षत्र वगैरे वगैरे अनेक ब्रँड्‌स निर्माण केले. वेगवेगळ्या गटातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी असे सुमारे तीस ब्रँडस् त्याने विकसित केले. त्यांच्या जाहिरातीवर तो वर्षाला तब्बल २२८ कोटी खर्च करायचा. परंतु गीतांजली जेम्स तोट्यात गेली आणि चोक्सीला त्याचे ब्रँडस्‌ही गुंडाळावे लागले.

हे सगळे पाहणार्‍या नीरव मोदीने फायरस्टार डायमंडस् या नावाने आपली कंपनी उभारली. सुरवातीपासून त्याने आपले लक्ष्य ठेवले जगभरातील उच्चभ्रू ग्राहक. हिर्‍यासारखी अमूल्य वस्तू केवळ तेच खरेदी करू शकतील याचे भान त्याला होते. त्यामुळे सुरवातीपासून एक लक्झरी ब्रँड म्हणून त्याने आपला व्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढवत नेला. अनेक भारतीय उद्योजक विदेशात आपल्या शाखा उघडतात. नीरव मोदीचे तसे नव्हते. त्याने जगभरात उभारलेल्या शोरूमच्या जोडीने भारतात शोरूम उघडले होते. खर्‍या अर्थाने तो आंतरराष्ट्रीय व्यवसाय होता. स्वतः एक घरंदाज कला अभ्यासक असल्याचा आवही त्याने आणला होता. त्यासाठी आपल्या शोरूममध्ये उच्च प्रतीच्या कलाकृती त्याने संग्रहित केलेल्या होत्या. अगदी राजा रविवर्मापासून सौझापर्यंतच्या कलाकारांच्या अस्सल चित्रकृती ख्रिस्तीज आणि सॉथेबीच्या लिलावांतून विकत घेऊन त्याने हा संग्रह गोळा केला. त्यासाठी कोट्यवधी रुपये मोजले. दुसरीकडे त्याचे शोरूम न्यूयॉर्क, लंडन, मकाव, हॉंगकॉंग अशा ठिकठिकाणी उभे राहिले. उंची हिरे तो कटिंग व पॉलिशिंगसाठी मॉस्को, अँटवर्प आणि सूरतला पाठवायचा. त्यांचे आकर्षक अलंकार हॉंगकॉंगमध्ये बनवले जायचे. त्यावर त्याची बहीण पूर्वी मोदी मेहता देखरेख ठेवायची. सॉलिटेर, एम्ब्रेस, साकुरा, इन्फिनिटी नॉट , लुमिनन्स अशी एकाहून एक आकर्षक मालिका त्याने बाजारात उतरवली. २०१२ साली त्याच्या फायरस्टार कंपनीच्या चार उपकंपन्या आणि त्या उपकंपन्यांच्या डझनभर आणखी उपकंपन्या असा सारा पसारा होता. २०१७ पर्यंत या उपकंपन्यांची संख्या पाच झाली व त्यांच्या उपकंपन्यांची संख्या २८ वर पोहोचली. टोकियो, लंडन, बीजिंग, पॅरिस, मकाव, रशिया, न्यूयॉर्क, क्वालालंपूर जेथे म्हणाल तेथे त्याची शोरूम उभी राहिली.
या सगळ्यासाठी पैसा हवा. खासगी गुंतवणूकदारांऐवजी त्याने लक्ष वळवले आयपीओ बँकर्सकडे. कोटक महिंद्रा, मेरील लिंचसारख्या आघाडीच्या आयपीओ बँकर्सशी त्याची बोलणीही चालली. परंतु शेवटी त्याच्या सापळ्यात अडकली ती पंजाब नॅशनल बँकेसारखी राष्ट्रीयीकृत बँक. वास्तविक त्याच्या फायरस्टोनची व्यापारी देणी होती ४१०४ कोटी आणि कर्ज होते ३५०९ कोटी. त्या तुलनेत त्याच्या मालमत्तेचे मूल्य होते अवघे २६८८ कोटी रुपये. म्हणजे हे प्रमाण ३ः१ असे अत्यंत व्यस्त होते. परंतु त्याने केवळ ३५०९ कोटींचे कर्ज आणि २६८८ कोटींची मालमत्ता मिळून ते १.३ः१ असे दाखवले. पीएनबीने त्याच्यासाठी आपली गंगाजळी खुली केली. पुढे जे घडले ते अतर्क्य होते, अकल्पित होते.

योगायोगानेच त्याचा उलगडा झाला. झाले असे की, बँकेच्या मुंबईच्या ब्रॅडीहाऊस शाखेत मोदीचा एक कर्मचारी क्रेडिट नोटची मागणी करण्यासाठी आयात कागदपत्रे घेऊन आला. अशा प्रकारचे हमीपत्र म्हणजे लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्यासाठी तेवढ्याच रकमेची हमी लागते हा कोणत्याही कर्जदारास लागू असलेला साधा नियम. बँकेच्या अधिकार्‍याने त्या कर्मचार्‍याला तसे सांगितले तेव्हा यापूर्वी अशी हमी कधीच घेण्यात आली नसल्याचा दावा त्याने केला. बँक अधिकार्‍यांनी शोध घेतला असता त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्या कर्मचार्‍याने सांगितलेल्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराचा थांगपत्ता बँकेच्या सॉफ्टवेअरमध्ये त्यांना लागेना. मात्र, नीरव मोदीच्या कंपनीला वेळोवेळी अशा प्रकारची लेटर ऑफ अंडरटेकिंग मात्र दिली गेल्याचे आणि त्यांच्या आधारे त्याने विदेशातील बँकांमधून कोट्यवधी रुपये उचलल्याचे आढळून आले. सोप्या भाषेत सांगायचे तर हा महाभाग बँकेकडून मिळालेल्या या हमीपत्राच्या माध्यमातून विदेशातील बँकांकडून कोट्यवधींचे कर्ज मिळवायचा, परंतु पीएनबी बँकेच्या सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद केली जात नसे. त्यामुळे तो बँकेला काही देणेच लागत नसे. मात्र पीएनबीला या विदेशातील बँकांना देणे द्यावेच लागे. म्हणजे बँक बुडीत खात्यात चालली होती. नीरव मोदी मात्र नामानिराळा होता. हे सगळे बँकेच्या अधिकार्‍यांच्या संगनमताशिवाय शक्यच नव्हते. बँकेच्या नव्या व्यवस्थापकांनी रीतसर तक्रार नोंदवली तेव्हा तपासात नाव पुढे आले ते गोकुळदास शेट्टी या निवृत्त उपव्यवस्थापकाचे. पुढे सविस्तर तपासात आणखीही काही नावे पुढे आली. एकूण घोटाला समोर आला तो ४८८६.७२ कोटींचा. २००११ ते २०१७ या काळात नीरव मोदीने पीएनबीच्या हमीपत्रांचा वापर करून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे उचलले आणि आपला व्यवसाय भरभराटीला नेला.

हा घोटाळा उजेडात येऊनही नीरव मोदी भारतातून पळाला त्याला सीबीआयने तपासात केलेली दिरंगाई कारणीभूत ठरली. बँकेकडून तक्रार नोंदवल्याचे दिसताच सीबीआयकडून लूक आऊट नोटीस जारी होण्याच्या आधीच नीरव आणि मेहुल चोक्सी लगोलग विदेशात पसार झाले. मेहुल चोक्सीने अँटिग्वाचे नागरिकत्व घेतले. नीरव मोदी तर पुढे लंडनमध्ये सुखाने हिर्‍यांचा व्यापार करताना आढळला. अलीकडच्या काळातील सर्वांत मोठा बँक घोटाळा ठरलेल्या या नीरव मोदी प्रकरणाचे सगळे कंगोरे उलगडण्याचा प्रयत्न पवन लाल यांनी समर्थपणे या पुस्तकातून केला आहे. एखादा ठकसेन संपूर्ण व्यवस्थेला कसा हातोहात बनवू शकतो त्याची ही कहाणी खरोखर अचंबित करणारी आहे यात शंका नाही.