बनावट चकमक : लष्कराच्या  ५ जणांना जन्मठेप

0
71

चकमक म्हणून दर्शवून केलेल्या गोळीबारात तीन युवकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पाच जवानांना जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात मचील भागात २०१० साली ही घटना घडली होती. ‘कोर्ट मार्शल’द्वारे ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, ओमर अब्दुल्ला यांनी मात्र ट्विटर संदेशात सात जणांना जन्मठेप झाल्याचे म्हटले आहे.
लष्करी सूत्रांंनुसार पाच जणांना जन्मठेप देण्यात आली असून त्यात दोन अधिकार्‍यांचा समावेश आहे. शिक्षा झालेल्यांची नावे – कर्नल दिनेश पठाणिया, कॅप्टन उपेंद्र, हवीलदर देवेंद्र, लान्स नाईक लखमी आणि लान्स नाईक अरुण कुमार – अशी आहेत.
शीझद अहमद, मुहम्मद शफी आणि रियाझ अहमद हे बारामुल्ला जिल्ह्यातील नदीहाल गावातील तिघेजण, ३ मे २०१० रोजी, मचील येथे नियंत्रण रेषेनजीक लष्कराच्या गोळीबारात मारले गेले होते. हे तिघे पाकिस्तानातून प्रशिक्षण घेतलेले दहशतवादी होते व भारतात घुसण्याच्या प्रयत्नात होते, असा दावा लष्कराने नंतर केला होता. मात्र त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर ते काश्मीरातीलच बेपत्ता युवक होते व त्यांचा दहशतवादाशी काहीही संबंध नव्हता, असे निष्पन्न झाले होते.या घटनेनंतर काश्मीर खोर्‍यात सुरक्षा फौजा व नागरिकांमध्ये संघर्षाचे वातावरण निर्माण झाले होते.
या तिन्ही युवकांना नोकरीचे आमिष दाखवून नेणारे अब्बास हुसेन आणि बशीर अहमद हे लष्कराबरोबर काम करणारे युवक होते, असेही पोलीस तपासात आढळून आले होते.