Home Featured बदलती समीकरणे

बदलती समीकरणे

0

इराण – अमेरिका युद्धाची समीकरणे पालटून टाकणाऱ्या घटना गेल्या दोन दिवसांत घडल्या. इराणच्या आकाशावर आमचे संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित झाले आहे अशी शेखी मिरवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून इराणने अमेरिकेची लढाऊ विमाने खाली पाडली. शिवाय त्या वैमानिकांच्या शोधार्थ गेलेल्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरांनाही पाडले. आपण पाडलेल्या विमानांच्या अवशेषांचे पुरावेही इराणने दाखवले आहेत. ज्या देशाचे हवाई दल, नौदल अमेरिकेने पार नष्ट केले आणि युद्धात संपूर्ण वर्चस्व प्राप्त केले असल्याचे दावे केले, त्या इराणकडून अशा प्रकारच्या आक्रमक प्रत्युत्तराची अपेक्षाच अमेरिकेने ठेवली नसेल. या युद्धामध्ये धक्क्यांमागून धक्के अमेरिकेला बसत आहेत. हात दाखवून अवलक्षण म्हणतात तसे ह्या युद्धाच्या बाबतीत घडते आहे. अमेरिकेचे लढाऊ विमान पाडले जाणे ही वाटते तेवढी क्षुल्लक बाब नाही. इराक युद्धात 2003 साली अमेरिकेचे एक लढाऊ विमान पडले होते. त्यानंतर आता वीस वर्षांनी अमेरिकेच्या अत्याधुनिक लढाऊ विमानांना शत्रूचा तडाखा बसताना दिसतो आहे. त्यामुळे ह्या घटनेला अपरिमित महत्त्व आहे. इराण शरणागती पत्करण्याच्या दिशेने चालला आहे असा जो काही आभास अमेरिकेने निर्माण केला होता, तो किती फसवा आहे हे इराणच्या गेल्या काही दिवसांतील आक्रमक पावलांतून दिसून येते. अजूनही आखाती देशांतील महत्त्वाच्या ठिकाणांना इराण लक्ष्य करतोच आहे. अमेरिका आणि इराणनने उद्ध्वस्त केलेले बंकर काही तासांत पुन्हा सज्ज करून इराण क्षेपणास्त्रे डागतोच आहे. अमेरिकेच्या तुलनेत इराणपाशी फारच कमी शस्त्रास्त्रबळ आहे हे तर खरेच आहे, परंतु तरीही आपल्यापाशी असलेल्या साधनांचा अत्यंत चातुर्याने आणि नेमकेपणाने वापर करण्यावर इराणने भर दिलेला पाहायला मिळतो. इराण पाकिस्तानच्या माध्यमातून वाटाघाटींची भीक मागतो आहे असे जे काही चित्र ट्रम्प यांनी जगापुढे रंगवले होते, तेही फसवे असल्याचे स्पष्ट झाले आहे. इराणने अमेरिकेचा प्रस्ताव पार धुडकावून लावलेला असल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे तसे असेल तर इराणमधील नवे नेतृत्व आपले प्रतिनिधी इस्लामाबादेत होऊ घातलेल्या चर्चेसाठी पाठवणार नाहीत किंवा तेथे जे जातील त्यांना इराणच्या विद्यमान नेतृत्वाचे पाठबळ असणार नाही असा होतो. खामेनेईंच्या खात्म्यानंतर नेतृत्व ज्यांच्याकडे आले ते मोज्तबा सार्वजनिक दर्शन द्यायला तयार नसले, तरी त्यांच्या प्रभावाखालील इस्लामी रेव्हल्युशनरी गार्ड अजूनही प्राणपणाने लढत आहेत. आपल्या मर्यादित शस्त्रास्त्रबळानिशी त्यांनी अमेरिकेच्या नाकीनऊ आणले आहेत. अर्थात, रशिया आणि चीनचा त्यांना ह्याकामी अप्रत्यक्ष पाठिंबा निश्चितच असेल, कारण युक्रेनविरुद्ध लढणाऱ्या रशियाला शह देण्यासाठी अमेरिकाही युक्रेनच्या पाठीशी उभी ठाकलेली आहे. त्यामुळे त्याचा सूड उगवण्याची संधी रशियाला इराण – अमेरिका युद्धात मिळाली आहे. इराणला त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय सद्यपरिस्थितीत अमेरिकेला टक्कर देणे त्यांना शक्यच नव्हते. इस्रायलच्या मदतीने आपण इराणला काही दिवसांत नमवू अशा भ्रमात ट्रम्प होते, परंतु युद्ध लांबत चालले आहे आणि आता माघार घेण्यासाठी ट्रम्प निमित्ते शोधत आहेत. इराणच्या अणुप्रकल्पांवर निर्णायक हल्ले चढवायचे, खर्ग बेट ताब्यात घ्यायचे, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करायची असे मनसुबे बाळगणाऱ्या ट्रम्प यांना एकेका उद्दिष्टावर विरजण पडत चालले आहे. अणुप्रकल्पांवर बंकर बॉम्ब टाकले, तरी त्यातून काही निष्पन्न झालेले नाही. प्रत्यक्ष मैदानी तुकड्या उतरवून युरेनियम ताब्यात घेणे तेवढे सोपे नाही. खर्ग बेटावर कब्जा मिळवणे किंवा होर्मुझमध्ये नौदल घुसवणही अत्यंत धोक्याचे आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून ज्यांची तेलवाहतूक चालते त्यांनीच ती खुली करण्याबाबत निर्णय घ्यावा, आमचे काही देणेघेणे नाही असा नवा पवित्रा ट्रम्प यांनी घेतलेला दिसला. मित्रदेशही आज अमेरिकेला साथ द्यायला तयार नाहीत. इस्रायलने आपले लक्ष लेबनॉनमधील हिज्बुल्लांचा नायनाट करण्यावर केंद्रित केलेले आहे. इस्रायल आपले हिशेब पूर्ण करण्यामागे लागला आहे, त्याला अमेरिकेच्या विजय – पराभवाशी तसे देणेघेणे नाही. ट्रम्प यांना हे युद्ध संपुष्टात आणायचे आहे, परंतु दिवसेंदिवस चाललेली आपल्या देशाची अप्रतिष्ठा ते रोखू शकलेले नाहीत. जे जे पाऊल उचलत आहेत, ते ते अंगलट येते आहे. इराणचे नवे नेतृत्व अधिक समजूतदार आहे असे म्हणणाऱ्या ट्रम्प यांना आता ते अधिक कडवे असल्याचे प्रत्ययास येऊ लागले आहे. त्यामुळे सर्व आघाड्यांवर असे तोंड पोळून घेत किती दिवस राहायचे ह्याचा विचार त्यांना करावाच लागणार आहे. अमेरिकेची लढाऊ विमाने पाडून इराणनने युद्धाची समीकरणेच पार पालटून टाकली आहेत.