इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या मोसमातील १९व्या सामन्यात काल सोमवारी दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा ५९ धावांनी दारुण पराभव केला. दिल्लीने विजयासाठी ठेवलेले १९७ धावांचे लक्ष्य बंगलोरला मजबूत फलंदाजी फळी असूनही पेलवले नाही. त्यांना निर्धारित २० षटकांत ९ बाद १३७ धावांपर्यंतच मजल मारणे शक्य झाले.
प्रथम फलंदाजी करताना दिल्लीला पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी ६.४ षटकांत ६८ धावांची दमदार सलामी दिली. शॉ याने २३ चेंडूंत ४२ तर धवनने २८ चेंडूंत ३२ धावांची खेळी केली. तिसर्या स्थानावरील कर्णधार श्रेयस अय्यर (११) अपयशी ठरला. ऋषभ पंत याने समयोचित खेळ दाखवताना २५ चेंडूंत ३७ धावा जमवल्या. अष्टपैलू मार्कुस स्टोईनिस याने डावाची दिशाच बदलून टाकताना केवळ २६ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५३ धावा चोपल्या. त्यामुळे दिल्लीला ४ बाद १९६ धावांपर्यंत जाता आले.
बंगलोरकडून मोहम्मद सिराजने दोन तर मोईन अली व इसुरु उदाना यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. बंगलोरच्या फलंदाजांविरुद्ध सुरुवातीच्या काही षटकांनंतर फिरकीचे अस्त्र वापरून दिल्लीने बंगलोरच्या अधोगतीला सुरुवात केली. अश्विनने पडिकल याला तर अक्षरने फिंचला तंबूची वाट दाखवली. विराट कोहलीने ३९ चेंडूंत ४३ धावा करत थोडाफार प्रतिकार केला. परंतु, डीव्हिलियर्स (९). मोईन अली (११) यांच्याकडून त्याला अपेक्षित साथ लाभली नाही. त्यामुळे बंगलोरला विजयापासून खूप दूर रहावे लागले. दिल्लीकडून कगिसो रबाडा याने ४ षटकांत २४ धावा मोजून ४ गडी बाद करत बंगलोरचे कंबरडे मोडले. ऍन्रिक नॉर्केने २२ धावांत २ बळी घेत त्याला सुरेख साथ दिली. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल याने १८ धावांत २ तर अश्विनने २६ धावांत १ गडी बाद केला.