फ्रेंच ओपनमध्ये युकीला थेट प्रवेश

0
106

पुरुष एकेरीतील भारताचा आघाडीचा टेनिसपटू युकी भांब्री याला आगामी फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळाला आहे. २७ मे ते १० जून या कालावधीत सदर स्पर्धा होणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळविल्यानंतर आयोजकांनी त्याला थेट प्रवेशाच्या रुपाने भेट दिली आहे. तैपेई चॅलेंजर स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर युकीने २२ क्रमांकांची मोठी प्रगती साधताना ८३वे स्थान मिळविले होते. २०१६ सालानंतर त्याला प्रथमच ‘टॉप १००’मध्ये प्रवेश करता आला होता. युकीला यंदाच्या वर्षातील सलग दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळण्याची संधी मिळणार आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत तो खेळला होता. परंतु, यासाठी त्याने पात्रता फेरीचा अडथळा पार केला होता. मुख्य स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत तगड्या मार्कोस बगदातिससमोर त्याचा निभाव लागला नव्हता.

सेरेना विल्यम्स हिचा अधिकृतरित्या काल स्पर्धेसाठी समावेश करण्यात आला. २०१७ सालच्या ऑस्ट्रेलियन ओपननंतर सेरेनाने एकही ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळलेली नाही. मागील वर्षीच्या विंबल्डननंतर ग्रँडस्लॅमपासून दूर असलेल्या अँडी मरे याचे पुनरागमन झाले आहे. ३६ वर्षीय विल्यम्सने २००२, २०१३ व २०१५ साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. मातृत्वामुळे १२ महिने टेनिसपासून दूर राहिल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात फेडरेशन कपच्या पहिल्या फेरीद्वारे तिने स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन केले होते. पुनरागमनानंतर इंडियन वेल्सच्या तिसर्‍या फेरीत व्हीनसकडून व मायामीमध्ये नाओमी ओसाकाकडून पहिल्याच फेरीत सेरेनाला पराजित व्हावे लागले आहे. सध्या जागतिक क्रमवारीत सेरेना ४४५व्या स्थानावर असली तरी ‘प्रॉटेक्टेड रँकिंगद्वा’रे तिला प्रवेश मिळाला आहे. यानुसार खेळाडू सहा महिने किंवा जास्त कालावधीसाठी खेळापासून दूर राहिल्यास विशेष त्याच्या कालावधीतील पहिल्या तीन महिन्यातील रँकिंगची सरासरी काढून एकाद्या स्पर्धेसाठी थेट प्रवेश देण्यासाठी याचा विचार केला जातो.

जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला राफेल नदाल आपल्या ११व्या फ्रेंच ओपन जेतेपदासाठी उतरणार असून दुसर्‍या स्थानावरील रॉजर फेडरर याने सलग दुसर्‍या वर्षी क्ले कोर्ट मोसमातून माघार घेतल्याने त्याचा खेळ पाहता येणार नाही.