Home Featured फोंड्यात तिन्ही पक्षांचा घरोघरी प्रचारावर भर

फोंड्यात तिन्ही पक्षांचा घरोघरी प्रचारावर भर

0

सर्वच उमेदवारांनी साधला नागरिकांशी संवाद, मतदारसंघातील जाणून घेतल्या समस्या

फोंडा पोटनिवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजप, काँग्रेस तसेच आम आदमी पक्ष या तिन्ही पक्षांनी जोरदार प्रचार चालवला आहे. पक्षाच्या उमेदवारांनी घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. प्रचार संपण्यापूर्वी दोन दिवस अगोदर आम आदमी पक्षाचे उमेदवार गीतेश नाईक यांनी सुमारे 80 टक्क्यांपेक्षा अधिक घरांना भेटी देऊन मतदारांशी संपर्क साधल्याचे म्हटले आहे. या घरांना भेटी देत आपण प्रचाराचे काम पूर्ण केल्याचा दावा त्यांनी केला.
निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या काही दिवसांत आपच्या गीतेश नाईक यांनी, खडपाबांध, दुर्गाभाट, शातीनंगर, खांडेपार, कुर्टी, नागझर, सिल्वानगर, सपना पार्क, नागा मशीद, हवेली कुर्टी, यशवंत नगर अशा ठिकाणी प्रचार केल्याची माहिती दिली.
आम आदमी पक्षाने मतदारसंघातील बहुतांश नागरिकांशी संवाद साधला असून त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी सांगितले.

दामू नाईकनी साधला राजस्थानी समाजाशी संवाद

भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी फोंडा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजस्थान समाजातील सदस्यांशी संवाद साधला व त्यांना संबोधित केले.

या कार्यक्रमाला राजस्थान समाजातील सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थितांनी आपला पाठिंबा व्यक्त करत स्थानिक प्रश्नांवर आपली मते मांडली. श्री. नाईक यांनी त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन देत भाजप प्रत्येक घटकाच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

या संवादादरम्यान प्रदेशाध्यक्ष श्री. नाईक यांनी भाजपच्या विकासाभिमुख दृष्टीकोनावर प्रकाश टाकत पक्षाची सर्वसमावेशक विकास आणि समाजकल्याणासाठीची दृष्टी स्पष्ट केली.

गोवा फॉरवर्डने भाटीकर यांना
पाठिंबा द्यावा ः कॅ. विरियातो

गोवा विधानसभा अधिवेशनात काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड नेत्यांत निर्माण झालेला राजकीय मतभेद बाजूला ठेवून युतीचा संघ असल्याने गोवा फॉरवर्ड नेत्यांनी फोंडा पोटनिवडणुकीतील काँग्रेस उमेदवार केतन भाटीकर यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केले. गोवा फॉरवर्ड पक्षाला फोंडा मतदारसंघात मोठा पाठिंबा असून त्यांचे नेते आमदार विजय सरदेसाई आदी नेत्यांनी केतन भाटीकर यांना पाठिंबा देण्यासाठी लवकरात लवकर त्यांच्या प्रचारात उतरण्याची गरज असल्याचे कॅ. विरियातो यांनी सांगितले.

केतन भाटीकर यांना फोंडा मतदारसंघातून उत्कृष्ट पाठिंबा व प्रतिसाद मिळत असून त्याचा विजय निश्चित असल्याचा दावा फर्नांडिस यांनी केला. गोवा फॉरवर्ड व काँग्रेस नेत्यांमध्ये जे मतभेद असतील ते एकत्रित बसून सोडवू असेही पुढे कॅ. विरियातो यांनी सांगितले. फोंडा मतदारसंघात भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी गोवा फॉरवर्डचे प्रमुख आमदार विजय सरदेसाई आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी लवकरात लवकर केतन भाटीकर यांच्या प्रचारात उतरावे असे आवाहन पुढे कॅ. विरियातो यांनी केले.