‘हॅलो गोंयकार’मध्ये मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही
राज्य सरकारच्या नदी परिवहन खात्याने फेरीबोट सेवेसाठी वाहनांना नव्याने जारी केलेल्या शुल्कामधून दुचाकी वाहने वगळण्यावर विचार केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हॅलो गोंयकार या जनतेशी थेट संवाद कार्यक्रमात बोलताना काल दिली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या मासिक हॅलो गोंयकार या थेट संवाद कार्यक्रमात चोडणमधील एका नागरिकाने फेरीबोट शुल्कवाढीसंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर बोलताना, राज्यातील नदी परिवहन खात्याची फेरीबोट सेवा तोट्यात आहे. या खात्याला थोडेसे आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी फेरीबोटीसाठी नवीन शुल्क निश्चित करण्यात आले आहे. फेरीसेवेसाठी माफक दरात पास पद्धत तयार करण्यात आली आहे. तथापि, नवीन शुल्कातून दुचाकी वाहने वगळण्यावर विचार केला जाणार आहे. राज्यातील दोन आमदारांनीसुद्धा फेरीबोटीच्या शुल्काचा विषय आपल्यासमोर मांडलेला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
रस्त्यांची तातडीने दुरूस्ती
राज्यातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याला करण्यात आली आहे. राज्यातील खराब झालेल्या सर्वच रस्त्यांची तातडीने दुरुस्ती केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
कुळ-मुंडकार प्रकरणे
निकालात काढणार
राज्यातील मुंडकाराची प्रकरणे जलदगतीने निकालात काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारी खात्यात मुंडकारांची प्रकरणे प्रलंबित राहत असल्याने त्रास सहन करावा लागतो याची जाणीव आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू करण्याची सूचना केली जाणार आहे. तसेच, गोमेकॉमध्ये दिव्यांग व्यक्तींना तपासणीसाठी वेगळा कोटा राखून ठेवण्याची व्यवस्था करण्याची सूचना केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्यातील जीसीईटी परीक्षा रद्द करण्यात आल्याने गोव्यातील मुलांवर कोणताही अन्याय होणार नाही. अभियांत्रिकीसाठी जेई मेन ही एकच परीक्षा द्यावी लागणार असून गोव्यासाठी वेगळी गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. या गुणवत्ता यादीच्या आधारे गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा विकासाला आणखी चालना मिळणार आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत गोव्यातील खेडाळूनी चमक दाखविली असून 30 पेक्षा जास्त पदके पटकाविली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
बेतकी आणि बामणवाडा-शिवोली येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्याची सूचना संबंधितांना केली जाईल. कुळे येथील ग्रामीण आरोग्य केंद्राचे काम लवकर मार्गी लावण्यात येणार आहे. स्वयंपूर्ण ई बाजाराच्या माध्यमातून स्वयंसाहाय्य गट, स्थानिक कलाकारांनी तयार केलेल्या उत्पादनांना विक्रीसाठी व्यासपीठ मिळवून दिले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्य सरकारने होमस्टे धोरण जाहीर केली आहे. या धोरणाच्या माध्यमातून ग्रामीण भागात घरामध्ये पर्यटकाला राहण्यासाठी खोल्या तयार करण्यासाठी 2 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. ग्रामीण भागात हॉटेल्स उभारली जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात आवश्यक वैद्यकीय उपलब्ध केल्या जात आहे. ज्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत, अशा वैद्यकीय सुविधांसाठी रुग्णाला जिल्हा किंवा गोमेकॉमध्ये पाठवावे लागत आहे. गोमंतकीय प्रसिद्ध गायिका लोर्ना कॉर्डेरो यांची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.