>> दुचाकींना 5 तर चारचाकींना 40 रुपये लागू होणार
राज्य सरकारच्या नदी परिवहन खात्याने फेरीबोटीमध्ये दुचाकी वाहनांसाठी शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला असून दुचाकी वाहनांना 5 रुपये आणि चार चाकी वाहनांना 40 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. नवीन शुल्क येत्या 15 दिवसांनंतर लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
नियमित प्रवास करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी फेरीबोटींमध्ये महिना पासची व्यवस्था करण्यात आली असून दुचाकींसाठी महिना 150 रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी 600 रुपये आकारले जाणार आहेत.
राज्यातील जलमार्गावरील फेरीबोटींमधून नियमितपणे वाहतूक करणाऱ्या व्यक्तींसाठी ही पासची व्यवस्था करण्यात आली असून ऑनलाइन पद्धतीने पास खरेदी केला जाऊ शकतो.
राज्य सरकारचे नदी परिवहन खाते तोट्यात आहे. या खात्याला महसूल वाढविण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांना शुल्क लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेरीबोटींमध्ये यापूर्वी चारचाकी व अवजड वाहनांसाठी शुल्क आकारले जात होते. तर, दुचाकी वाहनांसाठी शुल्क आकारले जात नव्हते. आता, फेरीबोटमधून वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांकडून शुल्क आकारले जाणार आहे.
फेरीबोट तिकीट आणि महिना पास ॲपद्वारे उपलब्ध केला जाणार आहे. राज्यातील फेरीबोट सेवेचा दर्जा वाढविण्यासाठी महसूल उभारण्यासाठी तिकीट दरात वाढ केली जात आहे. पारंपरिक फेरीच्या 3 पट भार उचलण्याची क्षमता असलेल्या जलद रोरो फेरी पुढील 6 महिन्यांत गोव्यात कार्यान्वित होतील, असेही मंत्री फळदेसाई यांनी म्हटले आहे.