विद्यमान विजेत्या नोवाक जोकोविच याने ‘बिग थ्री’मधील आपला प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर याच्याशी गाठ पक्की करताना ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. फेडररविरुद्ध जोकोविचचा रेकॉर्ड २६-२३ असा आहे. सर्बियाच्या द्वितीय मानांकित जोकोविचने कॅनडाच्या मिलोस राओनिच याचा सरळ तीन सेटमध्ये ६-४, ६-३, ७-६ (१) असा पराभव केला. दुसरीकडे तृतीय मानांकित फेडररला जागतिक क्रमवारीत १००व्या स्थानी असलेल्या टेनिस सेंडग्रेन याच्याविरुद्ध पाच सेट झुंजावे लागले. चौथ्या सेटमध्ये तब्बल सात मॅच पॉईंट्स वाचवलेल्या फेडरर याने सामना ६-३, २-६, २-६, ७-६ (८), ६-३ असा जिंकला. सात पैकी पाच मॅच पॉईंट्समध्ये फेडररच्या दबावाखाली येत सेंडग्रेन याने टाळता येण्यासारख्या चुका केल्या. २८ वर्षीय सेंडग्रेन याने यापूर्वी कधीही फेडररचा सामना केला नव्हता. परंतु, आपल्या जबरदस्त खेळाने त्याने उपस्थितांची मने जिंकली. महिला एकेरीत सोफिया केनिन (१४) व ऍश्ले बार्टी (१) यांनी उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करत उपांत्य फेरी गाठली. अमेरिकेच्या केनिनने ट्युनिशियाच्या ओन्स जबूर हिचा ६-४, ६-४ असा तर अव्वल मानांकित बार्टीने सातव्या पेट्रा क्विटोवाचा ७-६, ६-२ असा पाडाव केला.