फेक न्यूज ः एक घातक प्रवृत्ती

0
193
  • देवेश कु. कडकडे

(डिचोली)

मुद्दे संपले की काही लोक गुद्द्यांवर येतात तर काही जण फेक न्यूजचा आधार घेतात. यावर आता समाजानेच संयम दाखवून त्यांना जशास तसे उत्तर देण्याचे सामर्थ्य दाखवले आणि एकजुटीने या खोटारड्यांचा बुरखा फाडला, तर परत यांची हिंमत होणार नाही आणि नक्कीच वठणीवर येतील.

महाभारत युद्धात श्रीकृष्णाने ‘अश्‍वत्थामा मेला’ अशी खोटी बातमी पसरवून द्रोणाचार्यांच्या हत्येचा मार्ग सुकर केला. गुरू द्रोणाचार्यांनी कौरवांची अर्थात असत्याची बाजू घेतली होती आणि ही युद्ध जिंकण्यासाठी वापरलेली नीती म्हणून त्याचे समर्थन केले गेले. फेक न्यूज म्हणजे खोटी बातमी पसरवून स्वत:च्या फायद्यासाठी एखाद्याला बदनाम करणे हे जगाच्या पाठीवर अनेक काळापासून घडत आलेले आहे.

दुसर्‍या महायुद्धाच्या अंतिम टप्प्यात जर्मनीची पिछेहाट चालू असताना प्रसारमाध्यमे सतत जर्मन सैन्याची नेटाने आगेकूच सुरू आहे, अशा बातम्या प्रसिद्ध करीत असत. कुठलीही गोष्ट वारंवार सांगत राहिली, तर कालांतराने ती खरी वाटून लोकांचा त्यावर विश्‍वास बसतो. ऍडॉल्फ हिटलरचे विश्‍वासू सहकारी जोसेफ गोबेल्स यांनी ही नीती वापरल्यामुळे ती इतिहासात ‘गोबेलस नीती’ म्हणून ओळखली जाते.

सोशल मीडियाने सार्वजनिक आणि खासगी यातील अंतर मिटवून टाकले आहे. आज एखादी व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही लिहिते, प्रसारित करते. सोशल मीडियाचा वापर करणार्‍यांना ‘आयटी ऍक्ट’ बद्दल माहिती नसते. असे लोक विचार न करता आलेली माहिती पुढे पाठवतात. माहिती प्रसार क्रांतीचा निरंतर प्रसार आणि सोशल मीडियासारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या शोधातून माहिती देण्याचे अनेक स्रोत उपलब्ध होऊ लागले आहेत.

आपण घरी असो, ऑफिसमध्ये असो किंवा पिकनिकला जात असताना मोबाईल हा आपल्या हातात असतोच आणि आपण सतत जिज्ञासू वृत्तीने त्यातील इंटरनेट सुविधांचा वापर करीत असतो. सोशल मीडियातील अनेक संकेतस्थळे आणि इतर सुविधा केवळ मौज-मस्ती आणि मनोरंजनासाठी असतात हाच समज आतापर्यंत होता. मात्र, त्यापेक्षाही त्याची ताकद अफाट आणि अचाट आहे. या समस्येचे मूळ कारण हे आहे की, बहुसंख्य लोक इंटरनेटवर उपलब्ध असणारी प्रत्येक गोष्ट ही खरीच आहे असेच गृहीत धरतात. सोशल मीडियाचा वापर करणार्‍यांनी खबरदारी घेतली नाही तर धोका २४ तास असतो. जगभरात निरंतर फेसबुक, व्हॉटसऍप आणि इतर माध्यमातून एका सेकंदामध्ये संदेश प्रसारित करून हिंसक घटना घडत असतात. आपण त्याला प्रतिसाद किती द्यावा आणि समाजात अराजक माजवण्यात वाटेकरी व्हावे की आपली विवेकबुद्धी वापरून सामाजिक बांधीलकी जपावी हे ज्याने त्याने ठरवावे.

गावात चोर घुसला आहे किंवा मुले पळविणारी टोळी सक्रिय झाली आहे, अशी अफवा फेक न्यूजद्वारे पसरते आणि भीतीच्या छायेत त्याचवेळी गावात आलेली एखादी अनोळखी व्यक्ती गावकर्‍यांच्या रोषाला अवधानाने बळी पडून प्राण गमावते.
आधी एखादी माहिती एका निर्धारित प्रक्रियेला सामोरे जाऊन ती जनतेसमोर पोचत असे. यामागे कायदा न मानणारा एक वर्ग होता. आता आधुनिक तंत्रज्ञानाने सर्वच बदलून टाकले आहे. आता प्रत्येकजण स्वत:ला प्रकाशक समजतो. तंत्रज्ञानाने ही सुविधा सर्वांना दिली आहे. माहितीचे स्त्रोत असंख्य झाले आहेत. ते वापरणार्‍या अनेकजणांना यातील गांभीर्याची जाण नसते, तर काहीजणांना आपल्या सामाजिक दायित्वाचे भान निश्‍चितच असते. एक बातमी एखाद्या समुदायासाठी लाभदायक ठरू शकते. विकासित देशातील नागरिक अशा फेक न्यूजच्या जाळ्यात अडकत नाहीत, कारण ते आपली विवेकबुद्धी शाबूत राखून निर्णय घेतात.

भारतासारख्या विकसनशील देशात जिथे शिक्षण आणि जागरूकतेचा स्तर एकसारखा नाही तिथे लोक बातमी आणि माहिती यांच्याबद्दल द्विधा मनःस्थितीत असतात आणि असत्याला सत्य मानून मोकळे होतात. वास्तविक आपण जे वाचतो ते सत्य असेलच याची शहानिशा करणे थोडे कठीण आहे, म्हणून लगेच आततायीपणा करून पुढे प्रसारित करणे टाळले पाहिजे. मात्र, सध्या धीर धरायला कोणाकडे वेळ आहे?
आपल्या मनावर अनेक वर्षांपासून एका विशिष्ट विचारांचा पगडा असतो. त्यात प्रभावित होऊन फेक न्यूज पसरवण्यात वाढ होत आहे. एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या प्रतिमेला ठेच पोचवून किंवा लोकांमध्ये विरोधी बातम्या पसरवून समाजाला भडकावणे तसेच अमक्या ठिकाणी बॉम्ब ठेवला आहे अशा खोट्या बातम्या पसरवून जनतेच्या मनात भीती पसरवणे, सुरक्षा व्यवस्थेला वेठीस धरून विकृत आनंद मिळवणे काही नतद्रष्ट्यांचे काम असते. निवडणुकांच्या काळात अशा फेक न्यूजवाल्यांना सुगीचे दिवस येतात. राजकारणात आधी मुद्द्यांवर थेट संवाद होत असे आता तिथे दावे-प्रतिदावे होतात आणि आकर्षक स्वप्ने दाखवली जातात.

राजकीय नेते तात्कालीक हितासाठी अनेक दावे करतात. कधी स्वत:ची प्रतिमा उजळण्यासाठी आणि विरोधकांची मलीन करण्यासाठी एखादा जुना व्हिडिओ प्रसारित करून ही घटना आताच घडल्याचे दर्शवून जनतेला भडकवण्याचे प्रयत्न काही कमी घडत नाहीत. एका गावात सभा झाली त्यात एका नेत्याने असे वादग्रस्त विधान केले, असेही छापून येते. मात्र दुसर्‍या दिवशी इतर वर्तमानपत्रात ही सभा रद्द झाल्याचे छापून आलेले असतेे.

सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून जगातील नेते आणि चित्रपट कलाकारांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या प्रसारित केल्या जातात. अशा वेळी संबंधितांना नाहक मनस्ताप होतो. त्यांना स्वत: जिवंत असल्याचे जाहीर करावे लागते. या जाळ्यात अडकणारे फक्त मूर्खच बनतात असे नव्हेत तर कळत नकळत आपण अशा लबाड लोकांच्या हातचे बाहुले बनत असतो.

अशा प्रकारची माहिती लोकांच्या मनावर कब्जा करते आणि समाजासाठी दीर्घकाळ घातक ठरू शकते तसेच नागरिक, संस्था आणि लोकशाही प्रक्रियेला हानिकारक ठरू शकते. दहशतवादी संघटना तरुणांमध्ये दहशतवादी बिजे रुजविण्यासाठी सोशल मीडियाचा खुबीने वापर करतात. अनेक बोगस कंपन्या फेक न्यूजद्वारे हलक्या दर्जाची उत्पादने ग्राहकांच्या माथी मारून त्यांना गंडवतात, हे असे सतत घडत असते. फेक न्यूज पसरवणारे सहजपणे आपले उद्दिष्ट साध्य करतात. असे म्हणतात की, मुद्दे संपले की काही लोक गुद्द्यांवर येतात तर काही जण फेक न्यूजचा आधार घेतात. यावर आता समाजानेच संयम दाखवून त्यांना जशास तसे उत्तर देण्याचे सामर्थ्य दाखवली आणि एकजुटीने या खोटारड्यांचा बुरखा फाडला, तर परत यांची हिंमत होणार नाही आणि नक्कीच वठणीवर येतील.