महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन

0
132

>> १६२ आमदारांची परेड, सत्ता स्थापनेचा दावा

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर भाजपकडून दगाफटका होण्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने १६२ आमदारांचे जोरदार शक्तीप्रर्दशन केले. हॉटेल ग्रँड हयातमध्ये तिन्ही पक्षांच्या १६२ आमदारांची परेड करण्यात आली. ही परेड हा राज्यपालांवर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

यावेळी कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी यावेळी प्रस्तावना केली. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्व आमदारांना एकजूट राहण्यासाठी संविधानाची शपथ दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी, शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यपालांकडे सत्तेसाठी दावा
महाआघाडीतर्फे काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपालांना भेटून सत्तेचा दावा केला. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करता आले नाही तर ते राज्यपालांकडे विधानसभा बरखास्तीची शिफारस करू शकतात. म्हणूनच आम्ही राज्यपालांना भेटून सत्तेचा दावा केला आहे.

ते पुढे म्हणाले की, राज्यपालांना यावेळी आघाडीला १६२ आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्रही दिले आहे. सोबत या आमदारांच्या सह्या असलेले प्रतिज्ञापत्रही देण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विश्वासदर्शक ठराव जिंकण्यास अयशस्वी ठरल्यास आम्हाला सत्ता स्थापनेसाठी पाचारण करावे अशी मागणीही राज्यपालांकडे केल्याचे ते म्हणाले. या शिष्टमंडळात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विनायक राऊत, आझमी, केसी. पडवी आणि जयंत पाटील आदी नेते होते.

न्यायालयाचा आज निकाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या शपथविधीला आव्हान देत शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या आघाडीने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता निर्णय देणार आहे. य निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार येणार असं वाटत असतानाच अजित पवारांच्या साहाय्याने नव्या सरकारचा शपथविधी घडवून आणला. त्यामुळे राज्याच्या सत्ताकारणाला कलाटणी मिळाली. मात्र, नव्या सरकारचा शपथविधी घडवून आणण्याच्या संपूर्ण प्रक्रियेलाच महाविकास आघाडीने न्यायालयात आव्हान दिले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला आमंत्रित करण्याचे आदेश राज्यपालांना द्यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. या तातडीच्या याचिकेवर रविवारी न्या. एन. व्ही. रामणा, न्या. अशोक भूषण व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने भाजपला सत्तास्थापनेच्या दाव्याची पत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काल सोमवारी पुढील सुनावणी झाली असून आज मंगळवारी निकाल जाहीर करणार आहे.

हा गोवा नव्हे, महाराष्ट्र
आहे ः शरद पवार
बहुमत नसतानाही मणिपूर, गोवा या राज्यात भाजपने सत्ता स्थापन केली. पण हा गोवा नाही, हा महाराष्ट्र आहे. आमच्यावर काही चुकीचे लादाल तर त्याला उत्तरही देऊ असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. यावेळी कुणी आडवा आला तर त्याचे काय करायचे हे शिवसेना पाहून घेईल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

परेडने मतदारांचा अपमान ः शेलार
महाविकास आघाडीने काल आमदारांची ओळख परेड घेतली. अशी ओळख परेड आरोपींची होते. त्यामुळे स्वार्थासाठी तयार झालेल्या या आघाडीने आमदारांचा तसेच त्यांना निवडून देणार्‍या जनतेचा अपमान केला आहे, अशी तोफही भाजपचे नेते आशिष शेलार यांनी डागली. ही आघाडी त्यांच्याकडे १६२ आमदार असल्याचा दावा करत असली तरी आज हयात हॉटेलमध्ये १४५ तरी आमदार उपस्थित होते का, याबाबतच शंका उपस्थित करून कितीही झाले तरी विधानसभेत बहुमत आम्हीच सिद्ध करू, असे निक्षून सांगितले. ही महाविकास आघाडी म्हणजे पोरखेळ असल्याची शेरेबाजीही यावेळी शेलार यांनी केली. विधानसभेच्या पटलावर फडणवीस सरकार निश्चितपणे बहुमत सिद्ध करेल आणि पुन्हा एकदा पाच वर्षे महाराष्ट्राची सेवा करेल, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला.