विरोधी पक्षनेत्यांच्या मर्मभेदी टीकेने बिथरलेले पाकिस्तानचे विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी पाकिस्तानी पार्लमेंटमध्ये इम्रान खान सरकारच्या कामगिरीच्या फुशारक्या मारण्याच्या नादात पुलवामातील हल्ला पाकिस्ताननेच केल्याची कबुली देऊन टाकली आहे. ‘‘पुलवामातील यश हे इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील जनतेचे यश आहे आणि तुम्ही – आम्ही सगळे त्याचे भागीदार आहोत’’ असे सांगताना ‘हमने हिंदुस्थानको घुसके मारा’ची दर्पोक्ती या महाशयांनी केली. आता आपले वक्तव्य अंगाशी आल्यानंतर ‘पुलवामा’ चा उल्लेख आपण मोघमपणे केला होता, आपल्या बोलण्याचा संदर्भ नंतरच्या घडामोडींशी, ‘पुलवामाके वाकिये के बाद’च्या घडामोडींशी होता अशी सारवासारव महाशयांनी केली आहे. म्हणजे आपल्या बोलण्याचा संदर्भ बालाकोटच्या कारवाईनंतर पाकिस्तानी विमानांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा जो प्रयत्न केला, त्यासंदर्भात होता, असे त्यांना आता म्हणायचे आहे. परंतु त्यांचे वक्तव्य नीट ऐकले तर ‘घुसके मारा’ ची फुशारकी मारताना ‘पुलवामा’चा उल्लेख त्यांनी एकदा नव्हे, दोनदा केलेला आहे. ‘पुलवामामें जो कामयाबी है’ असे ते म्हणतात, ती कसली कामयाबी?
आपण तेव्हाचा घटनाक्रम पाहू. पुलवामा हल्ला झाला गतवर्षी चौदा फेब्रुवारीला. त्याचा सूड म्हणून थेट पाकिस्तानात घुसून खैबर पख्तुनख्वामधील बालाकोटच्या दहशतवादी तळाला भारताने उद्ध्वस्त केले २६ फेब्रुवारीला. प्रत्युत्तरादाखल भारतात घुसू पाहणार्या पाकिस्तानी एफ १६ विमानांना भारतीय हवाई दलाने पिटाळून लावले तेव्हा झालेल्या दुर्घटनेत २७ फेब्रुवारीला अभिनंदन वर्धमान पकडला गेला आणि लागलीच दोन दिवसांत एक मार्चला त्याची सुटका झाली. मग बालाकोटच्या कारवाईनंतर पाकिस्तानी विमानांनी भारतीय हद्दीत ‘घुसके मारा’असे जर फवाद यांना म्हणायचे असते, तर त्यात ‘पुलवामा’आले कुठून? आणि मुख्य म्हणजे पाकिस्तानला ‘घुसके मारा’ करण्याची संधीच भारताने दिलेली नाही. आलेली एफ-सोळा विमाने तात्काळ पिटाळून लावली गेली होती.
खरे तर भारताने बालाकोटमध्ये पाकिस्तानला ‘घुसके मारा’ हेेच आजवर पाकिस्तानी नेत्यांच्या जिव्हारी लागलेले आहे. आपला बहादुर वैमानिक अभिनंदन वर्धमान पकडला गेल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्याची सुटका करण्याचा निर्णय पाकिस्तानला घ्यावा लागला, एवढे प्रचंड दडपण पाकिस्तानवर भारताने तेव्हा आपल्या अत्यंत आक्रमक पावलांनी निर्माण केलेले होते. नवाज शरीफांच्या पाकिस्तान मुस्लीम लीगचे नेते सरदार अयाझ सादिक यांनी पाकिस्तानमध्ये तेव्हा माजलेल्या दहशतीचे प्रत्यक्षदर्शी वर्णन नुकतेच केले आहे. अभिनंदन वर्धमान पकडला गेल्यानंतर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विदेशमंत्री शाह महमूद कुरेशींपुढे लष्करप्रमुख कमर बाजवा आले तेव्हा त्यांचे पाय लटलटत होते. कुरेशींनी त्यांना अभिनंदन वर्धमानला ताबडतोब सोडून द्यायला सांगितले. ते केले नाही तर रात्री नऊ वाजेपर्यंत भारत पाकिस्तानवर हल्ला चढवील असे ते म्हणाल्याचे सादिक यांनी नुकतेच सांगितले आहे. त्यामुळे फवाद चौधरींच्या या फुशारक्यांना त्यातील ‘पुलवामा’ चा संदर्भ सोडला तर काही अर्थ राहात नाही.
पुलवामा हल्ल्याचे धागेदोरे थेट पाकिस्तानशी जोडले गेले आहेत, मसुद अजहरच्या जैश ए महंमदनेच सदर हल्ला घडवल्याचे आपल्या राष्ट्रीय तपास संस्थेने पुराव्यांनिशी सिद्ध केले आहे. एनआयएच्या तेराशे पानी आरोपपत्रात पाकिस्तानकडे बोट दाखवणारे असंख्य पुरावे देऊनही त्यांनी ते वेळोवेळी नाकारले आहेत. पाकिस्तानला, किमान ‘नया पाकिस्तान’ची बात करणार्या इम्रान खान सरकारला दहशतवादाची खरोखरच चीड असती, तर एव्हाना मुंबई हल्ल्यातील दोषी फासावर लटकले असते. पुलवामाच्या शहिदांना न्याय मिळाला असता. पण हे सारे दाखवायचे दात आहेत. आम्ही त्या गावचेच नव्हे असाच एकूण पाकिस्तानी नेत्यांचा पवित्रा राहिला आहे, परंतु सत्य कधी ना कधी बाहेर येतच असते. फवाद चौधरींच्या मुखातून जणू सत्यच वदले गेले आहे.
कारगिलची घुसखोरी झाली तेव्हाही पाकिस्तानने ‘आम्ही नाय बा’ चाच पवित्रा घेतला होता. शेवटी मुशर्रफ आणि नवाज शरीफांमध्ये कटुता आली त्यानंतर नवाज शरीफांनीच कारगील मुशर्रफ यांनीच घडवल्याची कबुली देत त्यांचे आणि पर्यायाने पाकिस्तानचे बिंग फोडले होते. फवाद चौधरींची कबुली भारताने गांभीर्याने घ्यायला हवी आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी नव्याने जोर लावण्याची जरूरी आहे. एफएटीएफच्या कारवाईची टांगती तलवार पाकिस्तानवर लटकते आहेच. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकाकी पाडले गेलेच आहे, परंतु जोवर पुलवामाच्या पापाची सजा पाकिस्तानला मिळत नाही, तोवर त्या चाळीस शहिदांचे हौतात्म्य सार्थकी लागणार नाही!