भारताच्या महिला फुटबॉल संघाने ताज्या फिफा क्रमवारीत सहा स्थानाची प्रगती करताना ५७वा क्रमांक मिळविला आहे. फिफाने आयोजित महिला विश्वचषक स्पर्धा अमेरिकेने जिंकल्यानंतर महिला क्रमवारी अद्ययावत करण्यात आली.
स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेल्या नेदरलँड्सने पाच स्थानांची सुधापणा करत तिसरे स्थान मिळविले तर जर्मनीने आपले दुसरे स्थान कायम राखले. स्पर्धेच्या अंतिम चारांत प्रवेश करूनही इंग्लंडची पाचव्या स्थानी घसरण झाली. उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागूनही फ्रान्सचे चौथे स्थान कायम राखले आहे. भारताने आशियाई दिग्गज इराण व जॉर्डन यांना पछाडले असून मायमॉल रॉकीच्या संघाने एएफसी क्रमवारीत ११वे स्थान प्राप्त केले आहे. संयुक्त अरब अमिराती व फिलिपिन्स यांना त्यांनी खूप मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलिया व दक्षिण कोरिया हे एएफसी सर्किटमधील सर्वोत्तम स्थानावरील संघ असून ‘टॉप १०’मध्ये असलेले आशियाई देश आहेत. भारतीय संघाने सात सामन्यांत अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे. नेपाळचा पराभव करून ‘साफ महिला अजिंक्यपद’ स्पर्धा जिंकल्यानंतर भारताने ‘२०२० ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतील दोन सामने देखील जिंकले होेते.
केवळ यजमान म्यानमारपेक्षा गोलफरक कमी असल्याने भारताची वाटचाल खंडित झाली होती. पुरुष संघ ‘टॉप १००’मध्ये प्रवेश करण्यासाठी संघर्ष करत असताना महिला संघ करत असलेली प्रगती थक्क करणारी आहे. पुढील वर्षी १७ वर्षांखालील महिला विश्वचषक भारतात होणार असल्याने भारतीय महिला फुटबॉल क्षेत्रासाठी सीनियर संघाची कामगिरी प्रेरणादायी ठरणार आहे.