फुगा

0
26
  • प्रा. रमेश सप्रे

(क्षणचित्रं… कणचित्रं…)

फुग्यांचं आयुष्य किती? आकाशात वरवर गेल्यावरही ते फुटतात, जमिनीवर मुलांच्या हातात- खेळातही ते फुटतातच. नुसते सजावटीसाठी लोंबत ठेवले तरी दुसऱ्या दिवशी कोमेजतात. माना टाकतात. संपून जातात. एकूण काय, फुगे नि बुडबुडे दोघेही अशाश्वत जगाचं, आयुष्याचं प्रतीकच!

वेद आणि ऋचा- दोन गोड भावंडं. दोघांची एकमेकांशी प्रत्येक गोष्टीत स्पर्धा. एकदा जत्रेतून साबणाचे फुगे हवेत उडवणारं चक्र (यंत्र) आणलं. वेदनं ते घेऊन फुग्यामागून फुगे हवेत सोडणं सुरू केलं. ऋचाला आजोबांनी साबणाचं पाणी करून दिलं आणि नळीतून फुगे कसे उडवायचे हे शिकवलं. लहान-मोठे फुगे, कधीकधी सूर्यप्रकाशात सप्तरंग दाखवणारे फुगे… काही क्षणांचंच आयुष्य. नंतर बुडबुड्यांसारखं फुटून जायचं. फुगे निर्माण होतानाही आनंद नि ते फुटतानाही आनंद. लहानपणाची ही गंमत असते. वाळूत किल्ले बांधतानाही टाळ्या अन्‌‍ उड्या आणि पायांनी ते मोडतानाही तशाच टाळ्या नि आनंदाचे चित्कार. वेद आणि ऋचा यांच्यातल्या फुग्यांच्या संख्येत वेद जिंकला पण ऋचाही जिंकली. कारण ती म्हणाली, “तू कुठं फुगे बनवत होतास. फक्त हातानं चक्र फिरवत होतास. मी नळी हातात धरून, स्वतः श्वास (प्राण) फुंकून फुगे बनवत होते. माझे फुगे जिवंत होते.” ऋचा म्हणाली त्यात निश्चित अर्थ होता. असो.

  • आज एक नवी फॅशन, नव्हे ट्रेंड चालू झालेत. एखाद्या घरासमोर, कार्यालयासमोर रेगीबेरंगी, निरनिराळ्या आकाराचे फुग्यांचे घड किंवा फुग्यांची झाडं दिसली तर समजायचं की कुणाचं तरी बारसं किंवा वाढदिवस असा कार्यक्रम आहे. पूर्वी केळीचे घड दिसायचे; आजकाल फुग्यांचे दिसतात. सहज सांगायचं तर केळीच्या झाडाला ‘रंभा’ म्हणतात नि केळ्याला ‘रंभाफल’!
  • पूर्वी शांतिदूत म्हणून शांतीचा संदेश देण्यासाठी आकाशात पांढरी कबुतरं सोडली जात. आता एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी शेकडो फुगे सोडले जातात. ते खूप उंचीवर जाईपर्यंत दिसत राहतात आणि हळूहळू अदृश्य होतात. पूर्वी स्थानिक वेधशाळेद्वारा (ऑब्झर्वेटरी) विशिष्ट वेळी अवकाशात फुगे सोडत असत, ज्याला तापमान, हवेचा दाब (प्रेशर), आर्द्रता (ह्युमिडिटी) मोजण्यासाठी लहानमोठी यंत्रे जोडली जात. असे फुगे जमिनीवर पडल्यावर ते लक्षात येताच वेधशाळेला कळवणे ही नागरिकांची जबाबदारी असे.
  • अशा फुग्यांचा अतिशय घातक, हिंसक उपयोग म्हणजे त्यातून जंतू, प्रचारपत्रकं खाली टाकून शत्रुपक्षातील लोकांना त्रास देणं, त्याचा बुद्धिभेद करणं, फुग्यातून अफू-चरस-गांजा यांसारखी मादक द्रव्ये (ड्रग्ज) टाकून तरुणांना व्यसनाधीन बनवणं हा शत्रुपक्षाचा एक कार्यक्रम असतो. पंजाबमध्ये असा प्रयोग केला गेला.
  • काही देशांतील लोकपरंपरेनुसार फुग्यातून दिवे, रंगीबेरंगी प्रकाश बाहेर फेकणारे पतंग अशा माध्यमातून पूर्वजांना (पितरांना) योग्य मार्गदर्शन (सद्गती) केलं जातं. कल्पना करा, आकाशात असंख्य फुगे आतून प्रकाश बाहेर टाकत एकाच वेळी अंधाऱ्या रात्री वर वर जाताहेत. त्याच्यामागची भावना आहे पूर्वजांना अंतरिक्षातला मार्ग दाखवण्याची. मुक्तीच्या दिशेनं नेण्याची. आपली सर्वपित्री अमावस्या, तसेच ख्रिस्ती बांधवांचा ‘ऑल सोल्ड डे’ यामागील भावना अशीच पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आहे. असो.
  • फुग्यांच्या संदर्भात एक सत्यकथा सांगण्यासारखी आहे. एका साधूचे अनेक भक्त असतात, त्यात एक गरीब फुगेवाला असतो. रोजचा धंदा सुरू करण्यापूर्वी आश्रमात जाऊन साधूचं दर्शन घ्यायचं अन्‌‍ त्याच्या पायावर दोन फुगवलेले फुगे ठेवायचे. जसे इतर भक्त फुले ठेवत. एकदा पावसाळ्याची सुरुवात असल्याने बाजार, जत्रा, इतर उत्सव बंद झाल्याने याचे फुगे तसेच राहिले. एकही फुगा विकला गेला नाही. बायकोमुलं उपाशी राहणार या विचारानं त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. त्याचवेळी आश्रमात गुरुजी सर्वांना म्हणाले, “बघा. बारीक पाऊस रिमझिमतोय. दुसऱ्या बाजूला सूर्यप्रकाश आहे. केव्हाही इंद्रधनुष्य दिसू लागेल. आपण का नको सप्तरंगी फुगे आकाशात सोडून फुग्यांचं इंद्रधनुष्य तयार करायला? चला, बोलवा आपल्या फुगेवाल्याला.” फुगेवाला आला. त्याला फुगे फुगवून द्यायला सांगितले. त्याच्याकडच्या शेवटच्या फुग्यापर्यंत तो फुगे फुगवत राहिला आणि साधुमहाराज एकेकाच्या हातून ते फुगे आकाशात सोडून सर्वांना आनंदित करू लागले. सांगायला नकोच की फुगेवाल्याच्या डोळ्यातून पाऊसधारा झरझरू लागल्या. अशी असते गुरूकृपा!
  • प्रत्यक्ष पहिलं विमान आकाशात उडण्यापूर्वी विशिष्ट आकाराच्या फुग्यातून (बलूनमधून) मानव आकाशप्रवास करत होता. आताही अशा बलूनमधून पृथ्वीभ्रमण करणं, सागर ओलांडून जाणं असे साहसी प्रयोग चालूच असतात. काही प्रेमीयुगुलं आपला वाढदिवस मित्रमैत्रिणींसह अशा तरंगत्या फुग्यातून साजरे करतात.
  • अनेक शहरांतील महत्त्वाच्या ठिकाणी एका जागी स्थिर असलेले मोठे फुगे असतात. त्यांच्यावर अनेक वस्तूंच्या-वास्तूंच्या जाहिराती असतात. एखाद्या मनोऱ्यासारखी उंची असलेले असे झगमगीत फुगे खरंच मनोहारी दिसतात.
  • एका शाळेत स्पर्धा होती. शब्दांचं स्पेलिंग अशा पद्धतीनं लिहायचं की त्यातून अर्थ स्पष्ट झाला पाहिजे. उदा. कुणी ‘इनकंप्लीट’ शब्दाच्या स्पेलिंगमध्ये शेवटाचा ‘ई’ लिहिला नव्हता तर कुणी ‘एक्स्ट्रा’च्या स्पेलिंगमध्ये शेवटी दोन-तीन ‘ए’ एक्स्ट्रा (जादा) लिहिले होते. बक्षीस मात्र मिळालं बलून (फुगा) या शब्दाला, ज्यात मधल्या दोन ‘एल’ अक्षरांवर दोन ‘ओ’ लिहिले होते. जणू दोन फुगेच! गंमत आहे नाही?
  • फुग्यांचं आयुष्य किती? आकाशात वरवर गेल्यावरही ते फुटतात, जमिनीवर मुलांच्या हातात- खेळातही ते फुटतातच. नुसते सजावटीसाठी लोंबत ठेवले तरी दुसऱ्या दिवशी कोमेजतात. माना टाकतात. संपून जातात. एकूण काय, फुगे नि बुडबुडे (बलून्स ॲण्ड बबल्स) दोघेही अशाश्वत जगाचं, आयुष्याचं प्रतीकच!
  • सहज गुगलवर फुग्यावरचं मराठी गाणं विचारलं तर काय- बडबडगीतं, कविता, गाणी, नृत्यं अशी साखळीच बघायला मिळाली. तुम्हीही असा प्रयत्न करू शकता. असो.
  • लहान मूल रूसलं की ओठांचा चंबू नि गालांचे फुगे करून कोपऱ्यात बसतं. आपण ‘रूसूबाई रूसू, कोपऱ्यात बसू’ असं म्हणत दोन्ही हातांनी अलगद गालांचे फुगे फोडले की लगेच ‘हसू बाई हसू’ होते. खूप गोड अनुभव असतो हा!
  • कितीही झालं तरी फुगे हे लहानग्यांसाठीच. त्यांचे खेळ, नाच, गाणी या विश्वात फुग्यांना आनंदाचं स्थान असतं. मोठ्या मंडळींनी मात्र हवेत उडावावेत कल्पनांचे, स्वप्नांचे, योजनांचे, संकल्पांचे फुगे… खरं ना?