फुंकर

0
393
  • मीना समुद्र

फुंकर- किती अर्थवाही शब्द. नुसता शब्द वाचला तरी डोळ्यांपुढे तरळतो तो ओठांचा चंबू, ते अधोन्मीलित प्रेमव्याकूळ नेत्र, ती माया, ती ममता, तो स्नेह, ती सहवेदना, ती संवेदनशीलता आणि अस्फुट ऐकूही येतो, फूऽऽऽ, तो अलगद सोडलेला हवेचा विसर्ग, एक लाघवी उच्छ्‌वास!

‘साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे’ असं म्हटलं आहे. अशीच एक ‘फुंकर’ या साध्या विषयावरची कविता परवा वाचनात आली. ती कुणाची वगैरे माहीत नाही. कारण कवितेच्या खाली किंवा वर तसा उल्लेख नव्हता. पण विषयाला सुरुवात करताना लिहिलेल्या पहिल्या तीनचार ओळींवरूनच शितावरून भाताची परीक्षा झाली आणि कविता वाचायला सुरुवात केली. ‘फुंकरी’चा तोंडवळा स्पष्ट करणारा पहिला परिच्छेद असा होता-
फुंकर- किती अर्थवाही शब्द. नुसता शब्द वाचला तरी डोळ्यांपुढे तरळतो तो ओठांचा चंबू, ते अधोन्मीलित प्रेमव्याकूळ नेत्र, ती माया, ती ममता, तो स्नेह, ती सहवेदना, ती संवेदनशीलता आणि अस्फुट ऐकूही येतो, फूऽऽऽ, तो अलगद सोडलेला हवेचा विसर्ग, एक लाघवी उच्छ्‌वास!
फुंकर… एक सहजसुंदर, स्वाभाविक, हळुवार भावनाविष्कार!
‘फुंकर’ या साध्या क्रियेचे इतके मार्मिक शब्दचित्र वाचल्यावर, मनःचक्षूंनी पाहिल्यावर कुणाला पुढची कविता वाचावीशी वाटणार नाही? मग कवितेत कोण, कुठला, कुठे, कधी फुंकर घालतो याचे समग्र चित्रण आहे. शेतावर निघालेल्या धन्याला भाजी-भाकर बांधून देण्यासाठी चुलीत चार लाकडे सारून निखार्‍यांवर फुंकर घालणार्‍या घरधनिणीचे चित्र डोळ्यांपुढे साकार करणारे पहिले कडवे. खेळून दमलेल्या बाळाला आंघोळ घालून त्या भुकेल्या बाळासाठी दोन्ही हातांनी बशी धरून आई दुधावर फुंकर घालते दूध गार होण्यासाठी, फुलासारखं नाजूक छोटं सतत चळवळ करणारं तान्हुलं चेहर्‍यावर हळूच फुंकर मारली की ओठ मुडपून हसतं. अंगणात खेळताना डोळ्यात धूळ उडते तेव्हा नाजूक हातांनी डोळा उघडून सखी फुंकर घालते. राधारमण मुरलीधर वेणू ओठांवर धरून वाजवताना हळुवार फुंकर मारून तिच्यातून मधुर स्वर निर्माण करतो. कितीतरी दिवसांचा वियोग सहन करावा लागल्यामुळे रागावलेली नवथर प्रिया तिच्या प्रियकराने तिच्या बटांवर फुंकर घालताच लाजते.

सीमेवरून येणार्‍या घरधन्याची साथ थोडीच मिळते. तेव्हा खूप रात्र झाली, गप्पा पुरेत म्हणून फुंकर घालून दिवा विझवला जातो. संसारात अनेक जखमा, चटके सोसावे लागतात. अशा खडतर जिण्याला सहानुभूतीची फुंकर घातली की तेच जिणे सुसह्य होते. प्रत्येकाला नशिबी येणारे भोग भोगणे अटळ; पण कुणी गेल्यामुळे जेव्हा भयंकर दुःख होते तेव्हा दुःखावरती सहानुभूतीची फुंकर घाला असेही सांगितले गेले आहे. खूप महिने उलटून गेले. मित्रही भेटत नाहीत. मैत्रीवरची धूळ झटकून पुनर्भेटीची फुंकर घालूया असे शेवटी म्हटले आहे. हे बहुधा महामारीच्या काळात दुरावल्यामुळे होणारे दुःख शमविण्यासाठी भेटीची फुंकर घालणे किती निकडीचे आहे हे दाखविण्यासाठी/सांगण्यासाठी असावे असे वाटते.
‘फुंकर’ या सहजक्रियेचे तितक्याच सहजसोप्या, साध्या शब्दांत चित्रण करण्यात कविता यशस्वी झाली आहे. ती आपल्यालाही आत्मशोधनाचा चाळा लावून देते. चहा-कॉफीवर फुंकर मारून पिणारे आठवतात. लहानपणी मैत्रिणीच्या शेतात खेळताना पायात रुतलेला काटा काढताना तिथल्या कामकरणीची हळुवार फुंकर आठवते. तापलेल्या तेलाच्या कढईत चकली सोडताना निसटल्याने हातावर तेलाचे शिंतोडे उडाल्यावर हात धरून पटकन फुंकर घालत जवळची पोळीची कणिक पटकन लावणारी आई आठवते. काचेवरची, आरशावरची धूळ फुंकरीने उडवणारी मैत्रीण ओठांचा चंबू करून फुंकर मारून कोरडे रंग उडवताना दिसते. चष्म्यावरती फुंकर मारून तो स्वच्छ पुसून डोक्याला लावणारे आजोबा आठवतात. दूध पिताना तान्ह्या बाळाला ठसका लागला तर टाळूवर फुंकर मारणारी आजी स्मरणात जागी होते. लहानसहान दुःखांवर ती फुंकर घालताना आठवते. तरुणपणीच एका बहिणीच्या नवर्‍याचे अकाली निधन झाल्यावर तिच्या लहान मुलांना मी सांभाळेन म्हणून तिची नणंद शब्दांनी आणि कृतीनं सहानुभूतीची फुंकर घालते आणि तिला निश्‍चिंतपणे नोकरी करता येते. ‘मी आहे तुझ्या पाठीशी’ म्हणत संत-सज्जन-साधुजन आपल्या दुःखावर, चिंतेवर, व्यथेवर फुंकर घालतात. हे असे सारे सारे फुंकरीने सुसह्य केलेले तिचे वेगवेगळे आविष्कार आठवून ही साधी आणि तशी प्रतिक्षिप्त क्रियेइतक्या झटपट वेगाने होणारी क्रिया कवितेमुळे मनावर जास्तच ठसली. आणि पूर्वी वाचलेली श्री. वसंत बापट यांची ‘फुंकर’ याच नावाची- तिचा एक वेगळाच आविष्कार दाखवणारी कविता आठवली. मग ‘काव्यदर्शन’ हा संग्रह काढून ती पुन्हा वाचली. वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या काव्यवाचनाच्या मैफलीत हमखास रंगणार्‍या निवडक कवितांच्या या संग्रहातली ती कविता.

तिच्यावर मनस्वी प्रेम केले, तिचे दुसर्‍याशी झालेले लग्न आणि तिच्या घरी सुखवस्तू जीवनाच्या खुणा पाहून अस्वस्थ होणारा एक असफल प्रियकर यात दिसतो. प्रेमप्रतीक असलेल्या भुशाने भरलेल्या राघूमैना, लाकडी निरस फळे, भिंतीवरची रविकर्म्याची चित्रे… सारेच त्याला शुष्क, निरर्थक वाटते. तिने काढलेल्या पतीच्या नावाच्या कशिद्यातला एक टाका चुकली असती तरी धन्य झालो असतो असे त्याला वाटते. तिचे आणि पतीचे सुखी-समाधानी छायाचित्र पाहूनही तो खिन्न होतो. त्याला स्वतःला ती इतकी विसरलेली पाहून, तिचे तृप्त हसणे पाहून तो अधिकच नाराज होतो. पण शेवटी-
आता एकच सांग
उंबर्‍यावर तुझ्या डोळ्यात पाणी आले
इतकी का तुला सुपारी लागली?
-पण नकोच सांगूस
तेवढीच माझ्या मनावर एक फुंकर!
असे तो म्हणतो. खरे कारण माहीत करून घेताना आपल्याबद्दल अजूनही तिच्या मनात ओल आहे असे वाटण्याचे समाधान हीच त्याच्या हळव्या दुःखावरची फुंकर. कळे ना कळेच्या सीमारेषेवर संपणारी ही कविता मनात कल्लोळ माजवते. कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या लेखात ही फुंकर साहित्यसृजनाचे बीज पेरते- ‘अंतर्मनात साचलेल्या अडगळीतून वाट काढीत अचानक पार्‍यासारखा थरथरणारा थेंब येतो. मनाच्या कुठल्यातरी मखमली कप्प्यात हळूच शिरतो आणि कसले तरी न कळणारे गाणे गाऊ लागतो. प्रेरणेच्या तारा पुन्हा एकदा छेडतो आणि संवेदनांच्या आळसावलेल्या पापणीत हळूच फुंकर घालतो.’
सृष्टीत पेटलेल्या असह्य आगीवर वार्‍याची झुळूक अशीच फुंकर मारते आणि कळ्या-फुलांच्या सुगंधाने आणि फुंकरीच्या गारव्याने मन शांत शांत होते.