फिलेंडर होणार निवृत्त

0
123

दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज व्हर्नोन फिलेंडर याने इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे काल सोमवारी जाहीर केले. फिलेंडर याने द. आफ्रिकेकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून एकूण ९७ सामने खेळले आहेत. २००७ साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करूनही फिलेंडरच्या वाट्याला केवळ ३० वनडे सामने आले. चार वर्षांपूर्वी त्याने आपला शेवटचा वनडे सामना खेळला होता. टी-ट्वेंटीत फिलेंडरने आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केवळ सातवेळा केले. कसोटी क्रिकेटमध्ये मात्र त्याने छाप सोडली. कसोटीत सर्वांत कमी सामन्यांत ५० बळी घेण्यात संयुक्त दुसर्‍या स्थानी राहिल्यानंतर त्याने केवळ १९ लढतींत बळींचे शतक करत आघाडीच्या खेळाडूंत स्थान मिळविले. कसोटी क्रिकेटमध्ये द. आफ्रिकेकडून त्याने २१६ बळी घेतले आहेत. ९१२ गुणांसह त्याने गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान देखील भूषविले आहे. २०१२ साली साऊथ आफ्रिकन ऑफ दी ईयरच्या पुरस्कारानेदेखील त्याचा सन्मान झाला आहे. कसोटीत २४च्या सरासरीने धावा जमवताना ८ अर्धशतके देखील त्याच्या नावावर आहेत.