फिरत्या अन्न चाचणी वाहनाचा मुख्यमंत्र्यांहस्ते पणजीत प्रारंभ

0
134

अन्न आणि औषध प्रशासनाच्या राज्यातील फिरत्या अन्न चाचणी वाहनाचा शुभारंभ मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते काल करण्यात आला भेसळयुक्त खाद्यपदार्थाची चाचणी करण्यास फिरते वाहन उपयुक्त ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात अन्न सुरक्षेबाबत जागृती करण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

या फिरत्या वाहनाच्या माध्यमातून सुरूवातीला महिनाभर अन्न सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष अन्न तपासणीला सुरूवात केली जाणार आहे. अन्न बनवितांना योग्य काळजी घेतली जात नाही. अन्न पदार्थामध्ये रंगाचा वापर केला जातो. अन्न पदार्थामध्ये रंगाचा वापर करण्यास मान्यता नाही. त्यामुळे फिरते वाहन विविध भागात नेऊन अन्न सुरक्षेबाबत सविस्तर माहिती देऊन जागृती केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे उपस्थित होते. केंद्र सरकारच्या योजनेखाली अंदाजे ४१ लाख रूपये खर्चून फिरते अन्न तपासणी वाहन उपलब्ध करण्यात आले आहे. या अन्न तपासणी वाहनामध्ये अन्न पदार्थ तपासणीसाठी अत्याधुनिक साधन सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

अन्न आणि औषध प्रशासनाकडून महिना साधारण १५० च्या आसपास अन्य पदार्थाची तपासणी केली जात आहे. नवीन वाहनामुळे अन्न तपासणीच्या मोहीमेला गती मिळणार आहे. या फिरत्या वाहनामध्ये अन्न पदार्थ तपासणीबरोबरच अहवाल सुध्दा पंधरा मिनिटात तपास होण्याची सोय उपलब्ध आहे, अशी माहिती संचालिका सरदेसाई यांनी दिली. या वाहनाच्या वापराबाबत केंद्र सरकारबरोबर सामंजस्य करार केला जाणार आहे. या फिरत्या वाहनावर काम करणार्‍या कर्मचार्‍याना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. वाहन चालकाला सुध्दा खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. या वाहनात चालकाबरोबरच पाच जणांना बसण्याची व्यवस्था आहे.

अन्नाबाबतच्या तक्रारीसाठी विविध पर्याय उपलब्ध करण्यात आले आहे. ग्राहकांसाठी खास ऍपसुध्दा कार्यान्वित करण्यात आला आहे. या ऍपवर तक्रार, छायाचित्र सुध्दा पाठविली जाऊ शकतात, असे सरदेसाई यांनी सांगितले.