फा. परेरांना अटक करा; शिवप्रेमींची मागणी

0
63

>> शवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी वास्को पोलीस स्थानकाबाहेर हिंदू संघटनांचे आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या फादर बोलमॅक्स परेरा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी काल रात्री शिवप्रेमी आणि हिंदू संघटनांनी वास्को पोलीस स्थानकासमोर ठिय्या मांडला. त्यानंतर अखेर फादर बॉलमॅक्स परेरा यांच्यविरुद्ध हिंदू बांधव आणि शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी कायद्यानुसार कारवाई होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

‘छत्रपती शिवाजी देव नसून, ते राष्ट्रीय हिरो आहेत. आपण त्यांना मान दिला पाहिजे. आपण त्यांचा आदर केला पाहिजे. ते हिरो आहेत; पण देव नाहीत. पण हिंदू लोकांनी त्यांना देव केले’, असे वक्तव्य फादर बोलमॅक्स परेरा यांनी केले होते. परेरा यांनी चिखली येथील चर्चमध्ये केलेल्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या पार्श्वभूमीवर, काल रात्री शिवप्रेमी आणि हिंदू संघटनांनी वास्को पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडत शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य करून समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याप्रकरणी फा. बोलमॅक्स परेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी केली. मोठ्या संख्येने शिवप्रेमी पोलीस स्थानकाबाहेर जमल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

शिवप्रेमींच्या मागणीनंतर अखेर फा. परेरांविरुद्ध भादंसंच्या 295, 504 कलमाखाली हिंदू बांधव आणि शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र परेरांना अटक झाली नसल्याने रात्री उशिरापर्यंत शिवप्रेमींनी पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन केले.