फातोडर्यातील जाहीर सभेत सीएए मागे घेण्याची मागणी

0
286

केंद्र सरकारने संमत केलेला नागरिकत्व दुरुस्ती तथा सीएए हा कायदा मागे घ्यावा व एनपीए व एनआरपी यासाठीच्या हालचाली त्वरीत बंद कराव्यात अशी मागणी करणारा ठराव काल फातोर्डा येथे सीएएविरोधात आयोजित जाहीर सभेत संमत करण्यात आला. सिटीझन ऑफ गोवा यांच्या नेतृत्वाखाली या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेला आमदार विजय सरदेसाई, चर्चिल आलेमाव, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो उपस्थित होते. या सभेत क्लॉड आल्वारिश, रमेश गावस, इफ्तीयार शेख, मुजफ्फर शेख, रामा काणकोणकर, फा. सावियो फर्नांडिस यांची भाषणे झाली.
भारताच्या राज्य घटनेत सर्व धर्मातील लोकांना समानतेचा हक्का दिला आहे. लोकशाहीत प्रजा ही राजा असून, सर्व नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. कायद्याने त्याचा भंग केला जातो. राज्य घटनेचे संरक्षण करणे व हा कायदा रद्द करेपर्यत सर्वांनी एकत्र राहून लढा देण्याची गरज आहे, असा ठराव सभेत संमत केला.

क्लॉड आल्वारीश यांनी राज्यघटनेतील कायदा नियमाची माहिती देवून, देश सर्व जातीधर्मपंथाना एका सुत्रांत गुफलेला आहे. घटनेचा भंग करण्याचा कोणालाच अधिकार नाही, असे सांगितले. गेल्या चाळीस दिवसांपासून शाहीन बागेत या कायदा विरोधात महिलांचे धरणे चालू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी ही आजची सभा असल्याचे रमेश गावस यानी सांगितले. देश स्वतंत्र झाल्यानंतर ७० वर्षात मोदीसारखा धर्मात फूट पाडणारा प्रधानमंत्री दुसरा झाला नाही असे त्यांनी सांगितले.
या कायद्याला विरोध करण्यासाठी सर्व धर्माचे लोक एकत्र आले आहेत. या शक्तीपुढे केंद्र सरकारला नमवावे लागेल असे मुज्जफर शेख यानी सांगितले.