राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या पंचवीस हजारांच्या घरातून अठरा हजारांपर्यंत खाली आल्याचे सरकारी आकडेवारी जरी दर्शवीत असली तरी याचे प्रमुख कारण आता जनता कोरोनासदृश्य लक्षणे दिसायला लागली की तपासणीसाठी न जाता परस्पर औषधोपचार सुरू करू लागली आहे. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण खाली आले आहे आणि परिणामी नवी रुग्णसंख्याही कमी दिसते आहे. शिवाय कुटुंबातील एखादी व्यक्ती कोरोनाग्रस्त होताच पुढील पाच दिवसांत इतरांनाही त्याचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्याने असा संसर्ग होताच पुन्हा इतरांची चाचणी न करता थेट औषधोपचार सुरू ठेवण्याकडे कल वाढलेला आहे. परिणामी कागदोपत्री दिसणारी आकडेवारी फसवी आहे.
गेेल्या २८ डिसेंबरपासून राज्यात उसळलेली कोरोनाची तिसरी लाट ही डेल्टा, डेल्टाप्लस व्हेरियंटमुळे आहे की ओमिक्रॉनमुळे हे सांगायला सरकार अजूनही असमर्थ आहे. राज्यात नववर्षात ओमिक्रॉनचे २१ रुग्ण सापडल्याचे सरकारने सांगितले होते, परंतु त्यानंतरच्या अहवालांचा तपशील जनतेसमोर आलेला नाही. मुळात अजूनही आपल्याकडे जिनॉम सिक्वेन्सिंगची व्यवस्था नसल्याने पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडून आपण पाठवलेल्या नमुन्यांचे अहवाल यायलाच कित्येक दिवस लागत आहेत. राज्यासाठी जिनॉम सिक्वेन्सिंग मशीन घेण्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी सहा महिन्यांपूर्वी दुसर्या लाटेने कहर केला तेव्हा केलेली होती. गेल्या महिन्यात त्यांनी पुन्हा त्याच घोषणेचा पुनरुच्चार केला. जॉन हॉपकिन्सच्या अनुदान योजनेखाली आणखी एक उपकरण गोव्याला मोफत मिळणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. परंतु आता आग लागून गेल्यावर विहीर खोदावी तसे हे उपकरण येऊन उपयोग काय?
कोरोनाच्या ह्या तिसर्या लाटेमध्ये रुग्णांना इस्पितळात दाखल करावे लागण्याचे प्रमाण कमी आहे हाच काय तो दिलासा आहे. सामान्य सर्दी, खोकला किंवा व्हायरल तापाप्रमाणेच कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने आणि दोन तीन दिवसांत ताप उतरून रुग्ण बरे होत असल्याने कोरोना महामारीची भीतीही जनमानसात उरलेली दिसत नाही. आलिया भोगासी असावे सादर अशाच भावनेने आता जो तो कोरोनाचा सामना करण्यास सज्ज झालेला आहे. तसे पाहता इस्पितळात दाखल करावे लागण्याचे प्रमाण ही तिसरी लाट सुरू झाली तेव्हाच्या तुलनेत आता खूपच जास्त दिसते आहे. परवा दीड हजारांहूनही कमी नवे रुग्ण सापडूनही इस्पितळात दाखल करावे लागलेल्यांचे प्रमाण तब्बल ७१ होते. त्यामुळे आता पुन्हा एकवार इस्पितळात दाखल करण्याइतपत हा संसर्ग घातक ठरू लागलेला आहे का याविषयी तज्ज्ञांनी अभ्यास करणे जरूरी आहे. दुसर्या लाटेमध्ये अशाच प्रकारे इस्पितळात दाखल करावे लागण्याचे प्रमाण वाढत गेले होते आणि नंतर अत्यंत भयप्रद मृत्युकांड सुरू झाले होते. कोरोनाचा नवा व्हेरियंट आधीच्या डेल्टा किंवा डेल्टा प्लसप्रमाणे चौथ्या किंवा पाचव्याच दिवशी फुफ्फुसांत जात नसल्याचे दिसून येत असल्याने मृत्युचे प्रमाणही सध्या कमी आहे ही बाब नक्कीच दिलासादायक आहे, परंतु सोबतीला अन्य जीवनशैलीविषयक वा इतर आजार असलेल्या रुग्णांसाठी कोरोनाचा हा सौम्य प्रकारही घातक ठरू शकतो हे गेल्या काही दिवसांत रोज कानी येणार्या रुग्णांच्या मृत्यूच्या बातम्यांवरून दिसते आहे. गेल्या काही दिवसांत मृत्युमुखी पावलेल्यांमध्ये अधिकतर व्यक्ती ह्या कोरोनावरील लशीचा एकही डोस न घेतलेल्या असल्याचे सरकार आता सांगते आहे. राज्याचे संपूर्ण लसीकरण – अगदी शंभर टक्केच नव्हे, तर त्याहूनही जास्त झालेले असल्याचा दावा सरकार काही दिवसांपूर्वी करीत होते. मग आता हे लस न घेतलेले रुग्ण कुठून बरे उगवत आहेत? सरकारची प्रतिमा सांभाळण्यासाठी चाललेली ही सगळी लपवाछपवीच गोव्याला घातक ठरत आलेली आहे.
कोरोनाचा संसर्ग येत्या दिवसांत बहुतेकांना होऊ शकतो, परंतु नंतर त्याचे पँडेमिक म्हणजे महामारीऐवजी एंडेमिक म्हणजे स्थानिक स्वरुपाच्या आजारात रुपांतर होईल असे जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. त्याच बरोबर ओमिक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा व्हेरियंट नव्हे. असे अजूनही नवे व्हेरियंट कालौघात सापडू शकतात असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. ते किती घातक असतील, नसतील हे आपण आज सांगू शकत नाही. त्यामुळे येणार्या संकटाशी धैर्याने, निकराने झुंज देणे एवढेच आपल्या हाती आहे. त्यामुळे कोरोना सौम्य झाला, संपला अशा भ्रमात न राहता किमान खबरदारीची त्रिसूत्री पाळणे सद्यस्थितीतही अटळ आहे, अपरिहार्य आहे.