>> घोडेस्वारीच्या सांघिक प्रकारातही रुपेरी यश
तब्बल ३६ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर भारताच्या फवाद मिर्झाने घोडेस्वारी प्रकारात देशाला वैयक्तिक रौप्यपदक जिंकून दिले. त्यानंतर सांघिक गटातही सांघिक प्रकारातही ‘इक्वेस्ट्रीयन जम्पिंग’मध्ये भारताने रौप्यपदकावर आपले नाव कोरले. यापूर्वी १९८२ च्या दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या सुवर्णसिंगने वैयक्तिक सुवर्णपदक, गुलाम मोहम्मद खानने रौप्य तर प्रल्हादसिंहने कांस्यपदक जिंकले होते. सांघिक गटातही १२ वर्षांनंतर भारताने पदकाला गवसणी घातली आहे.
वैयक्तिक प्रकारात जपानच्या ओयवा ओशियाकी याने २२.७० गुणांसह सुवर्णपदक मिळविले. फवाद मिर्झा व तिसर्या स्थानावरील चीनच्या हुआ तियान आलेक्स यांच्यात प्रचंड चुरस होती. फवादने आपला घोडा सिगनूर मेडिकोटवर स्वार होता २६.४० अशी वेळ नोंदवत रौप्यपदकावर हक्क सांगितला. तर आलेक्सने २७.१० अशी वेळ नोंदविली. दुसरीकडे, भारताने सांघिकमध्ये ‘इक्वेस्ट्रीयन जम्पिंग’प्रकारात दमदार कामगिरी नोंदवली. फवाद मिर्झा, राकेश कुमार, आशिष मलिक आणि जितेंद्र सिंग यांनी केलेल्या १२१.३० गुणांमुळे भारताने रौप्य पदक पटकावले. सांघिक स्पर्धेत सुद्धा जपानचा दबदबा पाहायला मिळाला. जपानने ८२.४० च्या स्कोअरने सुवर्णपदक तर थायलंडने १२६.७० गुण घेत कांस्यपदक पटकावले.