प्रेयसीकडून प्रियकरावर निर्घृण खुनी हल्ला

0
161
पाठीत सुरा खुपसलेल्या स्थितीतच धोंडू कुडव याला बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात आणले त्यावेळी.

बेतोड्यात स्कूटरवर असतानाच सुरा खुपसला
बेतोडा-कोडार रस्त्यावर काल सकाळी प्रेयसीनेच स्वत:च्या प्रियकराच्या पाठीत सुरा खुपसून खुनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. नयबाग-पेडणे येथील धोंडू रमेश कुडव (२५) याच्या पाठीत सुरा खुपसल्यानंतर पळ काढलेल्या बेतोडा येथील सरिता रमाकांत गावकर (२१) हिला नंतर पोलिसांनी अटक केली. तर जखमी धोंडू बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल असून त्याची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार धोंडू रमेश कुडव हा युवक व बेतोडा येथील सरिता रमाकांत गावकर ही दोघे मडकई येथील औद्योगिक वसाहतमधील एका आस्थापनात कामाला असताना दोघेही प्रेमात पडली. एक महिन्यापूर्वीच सरिता वीज खात्यात कामाला लागली. त्यामुळे त्यांचा संपर्क थोडा तुटला. तरी मोबाईलवरून बोलणे चालू होते.
काल तिने धोंडूला फोंडा बसस्थानकावर बोलावले त्यानुसार तो जी.ए ११ बी- ६२९९ क्रमांकाच्या स्कुटरने आला. दोघांमध्ये बोलणी झाल्यावर तिने त्याला आपल्याला शिगणेव्हाळ-निरंकाल येथे पोचवण्यास सांगितले. तो तिला घेऊन जात असताना तिने स्कुटर कोडार रस्त्यावर घेण्यास सांगितले. रस्ता अडगळीचा असल्याने तो स्कुटर सावकाश चालवू लागला. हीच संधी साधून सरिताने पर्समधून चाकू काढला व त्याच्या पाठीवर सपासप वार केले. चाकू पाठीत अडकल्यावर तिने स्कुटरवरून उडी मारली आणि पसार झाली. धोंडू त्याच अवस्थेत फोंडा स्टेशनवर आला. तो दारातच कोसळला. ङ्गमला वाचवा मला वाचवाफ अशी विनवणी केल्यावर फोंडा पोलिसांनी त्याला त्वरित आय.डी. इस्पितळात नेले. पण तिथे सोय होऊ न शकल्याने गोमेकॉत नेले. तिथे शस्त्रक्रिया करून चाकू काढण्यात आला. आता त्याची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. त्यांना प्रेमसंबंध तोडायचे होते असे त्यांच्या बोलण्यातून समजले. उपनिरिक्षक पांडुरंग गावडे यांनी सरिताला अटक केली व भा. द. सं. ३०७ कलमाखाली गुन्हा नोंदवला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी तेच करत आहेत.