प्रेक्षकांना भावतील अशाच कथांवर चित्रपट बनवावेत : शेखर कपूर

0
65
The Director Shekhar Kapur and Actor Sushant Singh Rajput at the Master Class, during the 48th International Film Festival of India (IFFI-2017), in Panaji, Goa on November 26, 2017.

भारतीय चित्रपट यशस्वी व्हायचे असतील तर चित्रपट उद्योगातील लोकांना जगभरातील लोकांना भावतील अशा कथांवर चित्रपट बनवावे लागतील, असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भारतीय चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांनी काल मास्टर क्लासमधून बोलताना सांगितले.

‘कथा सांगणे’ ह्या विषयावरील आपल्या मास्टर क्लासमधून ते बोलत होते. चित्रपटाच्या कथेत लढा, झुंज असावी लागते. तसेच विरोधाभास असावा लागतो. लढा, झुंज ही कोणत्याही प्रकारची असू शकते असे सांगून ज्या ‘बिग बँग’मुळे ही पृथ्वी उदयास आल्याचे मानले जाते ती बिग बँगसुद्धा एकाप्रकारे झुंजच होती, असे कपूर म्हणाले. संगीतातसुद्धा विरोधाभास असतो, असेही त्यांनी पुढे बोलताना नमूद केले.
प्रामाणिकपणे व मन लावून केलेली कला यशाच्या शिखरावर पोचते, असे एका प्रश्‍नाचे उत्तर देताना ते म्हणाले.

कलाकाराच्या मनात एखादी कल्पना कशी येते हे कुणीही सांगू शकत नाही. मात्र, एक क्षण असतो त्या क्षणी ती कल्पना कलाकाराच्या मतातून उसळी मारून बाहेर येते असते. मात्र, जे कलाकार रियाज करतात त्यांच्यात मनात अफलातून कल्पना जन्म घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चित्रपटाच्या कथेत चूक किंवा बरोबर असे काहीही तरते. चित्रपट बनवताना प्रामाणिकपणा हवा. तो असला की चांगला चित्रपट तयार होतो. चित्रपट तयार करताना एक प्रकारची समाधी लागल्यासारखी स्थिती व्हायला हवी. तुम्ही जे करताना त्यात मग्न होणे फार महत्वाचे असते.

चित्रपट ही कला आहे की, धंदा ह्या प्रश्‍नाचे उत्तर देताना ते म्हणाले की जेव्हा तुम्ही चित्रपटात एखादा मोठ्या स्टार कलाकाराला घेता तेव्हा तो चित्रपट कला राहत नाही तर त्याचे रुपांतर धंद्यात होते. कारण त्यावेळी तुम्ही चित्रपट बनवताना पैशांचा विचार करता, असे कपूर यांनी सांगितले.
विदेशी चित्रपटसृष्टी भारताकडून कोणता धडा घेऊ शकते असे तुम्हाला वाटते असे त्यांना विचारले असता मेलोड्रामाला न घाबरण्याचा धडा त्यांनी भारताकडून घ्यायला हवा. कारण मेलोड्रामा हा मानवी जीवनाचा भाग आहे. जन्म, मृत्यू, फसवणूक यासह मानवी जीवनात घडणार्‍या सर्व गोष्टींत मेलोड्रामा असतो, असे कपूर म्हणाले. चित्रपटात संगीत किती महत्वाचे आहे. या प्रश्‍नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, संगीत हेही फार महत्वाचे आहे. संगीत हे चित्रपटाच्या कथेला वेगळा परिमाण देऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते सुशांत सिंग राजपूत यांनी यावेळी शेखर कपूर यांची मुलाखत घेतली. प्रेक्षकांनीही यावेळी कपूर यांना चित्रपटांविषयी विविध प्रश्‍न विचारले.