>> राष्ट्रपती भवनावरील कॉंग्रेसचा मोर्चा रोखला
नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकर्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी व कायदे मागे घेण्याची मागणी करत काल राहुल गांधी दिल्लीत राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणार होते. मात्र त्याआधीच पोलिसांनी हा मोर्चा रोखला. यामुळे कॉंग्रेस नेत्यांनी १० जनपथ येथे रस्त्यावरच ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. यावेळी प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. पोलिसांनी कारवाई करत ठिय्या आंदोलन करणार्या प्रियांका गांधींसह इतर कॉंग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले.
यावेळी प्रियांका गांधी यांनी या कारवाईबद्दल संताप व्यक्त केला. या सरकारविरोधात असणारे कोणतेही मतभेद दहशतवादाचे घटक असल्याचे सांगितले जात असल्याची टीका त्यांनी केली. राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्याआधी कॉंग्रेस मुख्यालयाबाहेर १४४ कलम लागू करण्यात आले होते. यानंतर राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी फक्त तीन नेत्यांना परवानगी दिली गेली.
राहुल गांधींनी घेतली राष्ट्रपतींची भेट
यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राहुल गांधींसोबत कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींनी नवे कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याचे सांगितले. राष्ट्रपतींच्या भेटीनंतर राहुल यांनी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधानांवर गंभीर आरोप केले.
आज पंतप्रधान संवाद साधणार
आज दि. २५ डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान किसान निधीअंतर्गत ९ कोटी शेतकरी कुटुंबांना १८ हजार कोटी दिले जाणार आहेत. हा निधी थेट शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्यांशी दूरसंचार माध्यमातून संवाद साधणार आहेत.