प्रादेशिक पक्षांना भाजप पुन्हा जवळ करणार

0
7

भाजपने एनडीएची पुनर्स्थापना करण्याचा विचार चालवला आहे. नुकत्याच झालेल्या कर्नाटक निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपने एनडीएमधील मित्रपक्षांना पुन्हा एकदा साद घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा एनडीएला मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप नेतृत्वाने कर्नाटकमधील जनता दल (धर्मनिरपेक्ष), आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील तेलगु देसम पार्टी (टीडीपी) आणि पंजाबमधील शिरोमणी अकाली दलासोबत आघाडीसंबंधी चर्चा सुरू केली आहे. तसेच भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील शिवसेना (शिंदे गट) आणि तामिळनाडूमधील अण्णाद्रमुक पक्षासोबत आघाडीची चर्चा झाली असल्याचे सांगितले. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील छोट्या छोट्या पक्षांसोबत लवकरच चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दिल्लीमध्ये नुकतेच भाजपाच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपापल्या राज्यातील प्रादेशिक पक्षांसोबत संबंध आणखी दृढ करावेत, अशी सूचना केली. टीडीपी, शिवसेना (उबाठा), अकाली दल आणि जेडी(यू) हे पक्ष एनडीएमधून बाहेर पडल्यामुळे भाजप प्रादेशिक पक्षविरोधी असल्याची प्रतिमा निर्माण झाली आहे. ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न पक्षाने चालवला आहे.