भारतीय पॅनोरमाच्या उद्घाटनप्रसंगी मनोज वाजपेयींचे मत
भारतात तयार होणारे प्रादेशिक व अन्य कलात्मक चित्रपट यांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या बाबतीत भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे उद्गार सुप्रसिध्द चित्रपट अभिनेते मनोज वाजपेयी यांनी काल काढले. इफ्फीतील भारतीय पॅनोरमा विभागाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.भारतात तयार होणार्या कलात्मक चित्रपटांना भारतीय पॅनोरमात स्थान मिळत असून या विभागात स्थान मिळणे हे प्रतिष्ठेचे मानले जात असल्याचे ते म्हणाले. पॅनोरमा विभागाचे ज्या ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाने उद्घाटन होत आहे त्या चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी हे एक चांगले दिग्दर्शक असून आपण त्यांचा चाहता असल्याचेही वाजपेयी यांनी यावेळी स्पष्ट केले. तत्पूर्वी चित्रपट महोत्सव संचालनालयाचे संचालक शंकर मोहन म्हणाले की भारतीय पॅनोरमा हा इफ्फीतील एक अत्यंत महत्त्वाचा असा विभाग आहे. या विभागातून यावेळी २६ चित्रपट व २३ लघुपट दाखवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अभिराम भडकमकर, शीला दत्ता, विवेक मोहन, आर्. बुवाना या ज्युरी सदस्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. उद्घाटन सोहळ्यानंतर या विभागातील आरंभीचा लघुपट ‘धी लास्ट एड्यू’ व शुभारंभी चित्रपट ‘एलिझाबेथ एकादशी’ दाखवण्यात आला. ‘धी लास्ट एड्यू’च्या दिग्दर्शक शबनम सुखदेव व ‘एलिझाबेथ एकादशी’चे दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा यावेळी गौरव करण्यात आला.