प्रादेशिक आराखडा २०२१ त्वरीत रद्द करावा

0
233

>> ‘गोंयचो आवाज’च्या सभेत मागणी : ‘त्या’ राजकारण्यांची नावे केली जाहीर

गोवा सरकारने चाळीस आमदारांच्या संगनमताने स्वत:च्या स्वार्थासाठी प्रादेशिक आराखडा २०२१मध्ये शहरी भागांबरोबर ग्रामीण भागांतील कृषी, जंगले, डोंगर, पठारे औद्योगिकरणाच्या नावाने ग्रीन पार्कच्या नावे सेटलमेंट झोन बनविले आहे. तो पूर्णपणे सदोष आहे. तो आराखडा विनाविलंब रद्द करावा, नपेक्षा सर्व गोमंतकीय रस्त्यावर येतील असा इशारा काल लोहिया मैदानावर आयोजित ‘गोंयचो आवाज’च्या जाहीर सभेत वक्त्यांनी दिला. गोव्याच्या जमिनींवर बलात्कार करणार्‍या ४०ही आमदारांना घरी पाठविण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. तसेच बेकायदा जमीन रूपांतरण केलेल्या १५ राजकारण्यांची नावे यावेळी जाहीर केली.

१५ बिगर सरकारी संघटनांनी ‘गोंयचो आवाज’ या नावाखाली ही सभा आयोजित केली होती. गोव्यांतील मोठ्या संख्येने लोक सभेला जमले होते. या सभेत गोव्यांतील मंत्री, आमदार, माजी आमदारांच्या या १५ राजकारण्यांनी नावांवरील जमीनीचे सेटलमेंट झोनमध्ये रूपांतर केल्याचे स्लाईडद्वारा दाखविण्यात आले.
सरकारने बेकायदा जमिनीचे रुपांतर केले असून तसेच बिल्डर, कारखानदार व तारांकीत हॉटेलवाल्यांचे हीत जपण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. ग्रामीण भागांतील जनतेवर फार मोठे संकट कोसळले आहे. सीआरझेड कायद्यात बदल करून पारंपारीक मच्छीमारी समाजाला हुसकावून लावण्याचा व गोवा पोर्टट्रस्टला किनारपट्टी विभाग देण्याचा केंद्र व राज्य सरकारने कारस्थान असल्याचे वक्त्यांनी सांगितले.

गोमंतकीय संस्कृती नष्ट करू पाहणारा प्रादेशिक आराखडा २०२१ रद्द करावा. तसेच पीडीए, ओडीपी सदोष असून ते रद्द करावे. गोव्यांतील जनतेला विश्वासात न घेता राजकारण्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी, बांधकाम ठेकेदार, बड्या उद्योगपतीच्या हीतासाठी तो बनवून गोव्यातील सुपीक जमीन परप्रांतियाना विकण्याचे कारस्थान असल्याची आरोप गोंयचो आवाजचे निमंत्रक व्हिरियेरो फर्नांडिस यानी केले.अभिजीत प्रभु देसाई व स्वप्नील शेरलेकर यांनी २०१२ साली तयार केलेला २०२१ प्रादेशिक आराखडा व गुगल वरील मूळ गोव्यांतील जमीन, डोंगर नद्याच्या आराखडा स्क्रीनवर दाखवून कृषी, डोंगर, जंगले व खान जमिनीचे सेटलमेंट झोन करून लाखो एकर जमीन घरे, बंगले, कारखाने याना विकण्यास मोकळीक दिले आहे त्याची माहिती सादर केली. गोव्यातील प्रत्येक तालुक्यांतील गावांचा आराखडा दाखवून २०२१ आराखडा सदोष असल्याचे दाखवून दिले. ऑलिंसिओ सिमोयश यांनी सांगितले की नद्यांचा गाळ उपसण्याच्या नावे राष्ट्रीयीकरण करून अदानी, जिंदाल, यांचा कोळसा वाहतूक करण्यासाठी गाळ उपसण्याच्या योजना आहे. तसे पाहू गेल्या पाच मिटर गाळ उपसल्यास मच्छीमारी लोकांना मासळी पकडणे सोपे जाते. पण १४ मिटर खोल गाळ काढून मोठी जहाजे, नेण्याची योजना आहे.

आराखडा लादला जातोय : प्रभुदेसाई
२०१२ साली तयार केलेला आराखडा सदोष असल्याने तो रद्द करावा अशी मागणी होती. पण त्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारने काहीच केले नाही व आता सत्तेवर आलेल्या सरकारांतील नगरनियोजनमंत्री तोच आराखडा जनतेवर लादून गोमंतकीयावर अन्याय करीत आहे. आराखडा तयार करताना नगरनियोजन खात्याच्या अधिकार्‍यांनी जनतेला विश्‍वासात घेण्याची गरज होती. पण तसे न करता तो लादला जात आहे. आता गोवा नष्ट करू पाहाणारा आराखडा विनाविलंब रद्द करावा व जनतेला विश्‍वासात घेवुन पुन्हा तयार करावा असे आवाहन अभिजीत प्रभूदेसाई यांनी केले.

ठराव संमत
गोवा नष्ट करू शकणारा उपद्रवी प्रादेशिक आराखडा २०२१ रद्द करावा, पीडीए व बाह्य आराखडा बंद करावा व नव्याने तयार करताना जनतेला विश्‍वासांत घेवून बनवावा. नगर नियोजन खात्याने ७३ व ७४ कलमात दुरुस्ती करून लागू करावी. डोंगर, कृषी, खाजन, वन्य जमीन पठाराचे जतन करावे अशा मागण्यांचा ठराव एकमताने समंत केला.

सभेला आजीमाजी
आमदारांसह राजकारणी उपस्थित
या सभेला सासष्टीतील ख्रिश्‍चन धर्मगुरु आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स, फिलीप नेरी रॉड्रीगीस, फ्रांसिस्क डिसा, इजिदोर फर्नांडिस, कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस, टोनी फर्नांडिस, माजी मंत्री मिकी पाशेको, आपचे वाल्मिकी नायक, कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो, दक्षिण जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्षा सावित्री कवळेकर, सिध्दनाथ बुयांव उपस्थित होते.

बेकायदा रूपांतरणात सरदेसाई यांच्यासह १५ राजकारणी
मनोज परब यानी प्रादेशिक आराखड्यात बदल करून बेकायदा जमीन रूपांतर केलेल्या १५ राजकारण्यांच्या नावासहीत सदर जमीनीची माहिती दिली. ही माहिती अशी- दिपक ढवळीकर यांची बेतोडा/फोंडा, देशप्रभू (पेडणे), आमदार लुईझीन फालैरो (केळशी येथील झुग मोबर), ऍलीना साल्ढाना यांच्या नावावरील कासावली, आमदार प्रतापसिंह राणे व आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्या नावावरील पाच लाख चौ.मिटर कारापूर सत्तरी येथील जमीन, नुवेंचे आमदार व्हिल्फ्रेड डिसा यांची नुवे येथील जमीन, कृषीमंत्री विजय सरदेसाई यानी कंपनी करून केळशी येथील जमीन व वेलसांव येथे विजय सरदेसाई व कॅनेडी आलेमांव यांच्या भागीदारीत सीआरझेड जमीन सेटलमेंट झोन केले, आमदार फ्रांसिस्क सिल्वेरा भाटी येथे, वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी गवंडाळीत, आमदार निलेश काब्राल यांनी लोटली येथे, नरेश सावळ यांची मुळगाव येथे, आमदार दिगंबर कामत यांनी आगोंद काणकोण येथे, आमदार ग्लेन टिकलो यांनी सुकूर येथे तसेच केळशी, कुडतरी उत्तर गोव्यात पंचतारांकीत हॉटेलसाठी बेकायदेशीर रूपांतर केल्याचे त्यानी आराखडा दाखवून, सर्वेक्रमांकासहीत दाखवून दिले.