राज्यातील प्राथमिक शाळांच्या इमारतींचे दुरुस्ती काम यापुढे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारत बांधणी विभागाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यापूर्वी हे काम गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाकडे होते.
जीएसआयडीसीने राज्यातील ७०० प्राथमिक शाळांच्या इमारती बांधल्या आहेत. आता केवळ काही शाळांच्या इमारतींचे किरकोळ दुरुस्ती काम तेवढे शिल्लक राहिले आहे. हे काम आता जीएसआयडीसीकडून काढून घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारत बांधणी विभागाकडे सोपवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र, तसे असले तरी ‘केस टू केस’ काही शाळांच्या इमारतींच्या बांधकामांची काम यापुढेही जीएसआयडीसीला मिळू शकते.
कॅग अहवालास मान्यता
मंत्रिमंडळ बैठकीत महालेखापालाच्या १८-१९ या आर्थिक वर्षासाठीच्या अहवालाला मान्यता देण्यात आल्याचे प्रमोद सावंत यानी सांगितले. त्यामुळे हा अहवाल आता विधानसभेपुढे जाण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे त्यानी स्पष्ट केले.
एस्मा व गोवा सहकारी
कायदा दुरुस्तीस मान्यता
मंत्रिमंडळ बैठकीत अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायदा तसेच गोवा सहकारी कायदा या दोन कायद्यांच्या दुरुस्तींस मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहितीही प्रमोद सावंत यानी दिली.
अर्थसंकल्पासंबंधी चर्चा करण्यासाठी आपण सर्व मंत्र्यांबरोबर बैठका घेत असून आता केवळ दोन ते तीन मंत्र्यांबरोबरच बैठका घेणे शिल्लक राहिले आहे. हे काम येत्या एक-दोन दिवसांत पूर्ण होणार असल्याचे ते म्हणाले.
अर्थसंकल्पासाठी लोकांकडून
१५० सूचना प्राप्त
यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत राज्यातील जनतेने सूचना कराव्यात असे जे आवाहन आपण लोकांना केले होते त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागलेला असून एकाच दिवसात १५० सूचना लोकांकडून आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी काल दिली. या सूचनांबाबात आपल्या अध्यक्षतेखालील समिती योग्य काय तो निर्णय घेईल. तसेच या सूचना संबंधित मंत्र्यांकडेही पाठवण्यात येतील, असे सावंत यानी यावेळी सांगितले.
अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांची
चार मंत्र्यांबरोबर चर्चा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, मंत्री विश्वजित राणे, जेनिफर मोन्सेरात, फिलीप नेरी रॉड्रीगीस, मायकल लोबो यांच्याशी अर्थसंकल्पपूर्व बैठक काल घेतली.
उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्याशी शेती, नगरनियोजन. कारखाने आणि बाष्पक खात्यातील आर्थिक बाबीबाबत चर्चा केली आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्याशी आरोग्य, कौशल्यविकास, महिला व बालकल्याण या खात्यातील आर्थिक विषयांवर चर्चा केली. मंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्याशी महसूल, माहिती तंत्रज्ञान, मजूर खात्यातील विषयांबाबत सूचना जाणून घेण्यात आल्या आहेत. मायकल लोबो यांच्याशी विज्ञान तंंंत्रज्ञान, कचरा व्यवस्थापन, बंदर कप्तान या खात्यातील आर्थिक विषयांवर चर्चा केली आहे. माहिती तंत्रज्ञान मंडळाचे अध्यक्ष नीळकंठ हर्ळणकर यांनी बैठकीत सहभाग घेतला. गोवा आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासोबत अर्थसंकल्पाच्या विषयावर चर्चा केली असून सूचना जाणून घेतल्या आहेत.