प्राचीन शिवस्थान : श्री क्षेत्र हरवळे

0
229

– नारायण विनू नाईक,  मंगेशी
परशूराम भूमीतील पुरातन, निसर्गरम्य आणि जागृत देवस्थान म्हणून गोव्यातील हरवळे येथील श्री क्षेत्र रुद्रेश्‍वर या शिवमंदीराचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. संपूर्ण परशुराम भूमी आणि गोमंतक यामध्ये सर्वांगसुंदर शंकराचे देवस्थान असे या क्षेत्राचे वर्णन केले आहे. पुरातन काळापासून हे जागृत शिवमंदिर आहे. मंदिराजवळच पुरातन पांडवकालिन गुंफा आहेत. या पांडवकालिन गुंफा मोठ्या डोंगरामध्ये कोरण्यात आल्या असून त्या देवस्थानच्या प्राचीनत्वाची साक्ष देत आहेत.या मंदिराचा सुमारे ५०० वर्षांपासूनचा इतिहास ज्ञात आहे, श्रीक्षेत्र रुद्रेश्‍वर हे पुरातन देवस्थान होय. शिवपुराण काळाचा अभ्यास केल्यास शिवाला डोंगर, दर्‍या, नद्या अशा निसर्गाच्या सान्निध्यात राहणे आवडे असे दिसते. हरवळे गावातील हिरवेगार डोंगर, जवळ वाहणारा धबधबा, सभोवतालची हिरवीगार वनराई असा हा निसर्गरम्य परिसर पाहून भगवान शिव म्हणजे श्री रुद्रेश्‍वर येथे वस्तीला आले असे शिलालेखावरून कळून येते. हर म्हणजे शिव आणि वळी म्हणजे स्थळ. याचाच अर्थ शिवाचे स्थळ श्री रुद्रेश्‍वर मंदिराच्या पश्‍चिमेच्या बाजूने असलेल्या पांडवांच्यो व्होवर्‍यो व पूर्वाचारी तसेच पूर्वेकडे असलेली गिरकारी ही या देवस्थानची संलग्न असलेली दैवते होत.
श्री रुद्रेश्‍वर मंदिराच्या स्थापनेविषयी निश्‍चित नोंद सापडत नाही. सध्या जो मंदिराचा परिसर आहे, तिथे पूर्वी खूप दाट झाडेझुडपे होती. रानात गावकर्‍यांना शिवलिंग सापडले. लोकांनी तेथेच धार्मिक विधीनुसार प्राणप्रतिष्ठा करून छोटेसे मंदिर बांधले. नंतर जीर्णोद्धार करून विशाल मंदिर बांधण्यात आले, तसेच भव्य असा सभामंडप बांधण्यात येऊन भाविकांच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधण्यात आल्या आहेत.
श्री रुद्रेश्‍वर देवस्थानची २४ सप्टेंबर १९२४ रोजी नोंदणी करण्यात आली असून देवस्थानची घटना तयार करून घेण्यात आली आहे. या कामी पणजीतील तत्कालिन स्व. बाबलो मसणो नाईक व इतर महाजनांनी फार परिश्रम घेतले. या देवस्थानचे वैशिष्ट्य म्हणजे या देवस्थानचे महाजन हे भंडारी समाजाचे आहेत. पेडण्यापासून काणकोणपर्यंत आणि सत्तरीपासून वास्कोपर्यंत या देवस्थानचे सदस्य आहेत. श्री रुद्रेश्‍वर देवस्थानच्या या पुण्यक्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेषतः अंत्यसंस्कार विधीसाठी गोव्याच्या सर्व भागांतून लोक नित्य या तीर्थस्थळी येत असतात. श्री रुद्रेश्‍वर मंदिराच्या स्थापनेविषयी निश्‍चित नोंद सापडत नाही.
मंदिर परिसरातील प्राचीन भीमकुंडातून सदासर्वकळ पाणी वाहत असते. भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळा आहे. देवस्थानचे कार्यालय असून भोजनालय व चहा फराळाचीही सुविधा आहे. विविध धार्मिक कार्यांचे तेथे आयोजन केले जाते. विवाह, दत्तकविधी, नवचंडी, वरदशंकर, सूर्यपूजा, शुद्धीकरण, अभिषेक, एकादशी, लघुरुद्र, महारुद्र, व्रतबंध, रंगपूजा, नारायणबळी, नागबली, कालसर्प शांती, विष्णु शांतव्रत, उद्यापन तसेच अस्थिविसर्जन, श्राद्धे, त्रिपिंडी, होमहवन आदी सर्व सुविधा उपलब्ध करून धार्मिक कार्ये पार पाडली जातात.
दोन नद्यांच्या संगमावरील या स्थानी वल्लभाचार्यांनी स्थापन केलेल्या पादुका आजही पाहावयास मिळतात. येथे डोंगरातून वर्षभर कोसळणारा धबधबा आहे. दोन जलस्त्रोतांच्या संगमावर पुढे ही नदी मांडवी नदीला जाऊन मिळते. भला मोठा धबधबा आणि घाट तसेच दोन नद्यांचा संगम व निसर्गरम्य परिसर हे या देवस्थानचे वैशिष्ट्य होय. त्र्यंबकेश्‍वर-नाशिक आणि नरसोबाचीवाडी येथे जसे समुद्रकिनारी घाट बांधण्यात आलेले आहेत, तसेच श्रीक्षेत्र रुद्रेश्‍वर येथेही घाट आहेत.
मंदिराशेजारून वर्षभर वाहणारा पाण्याचा पाट आहे. मंदिरामागे फुलाफळांनी बहरलेली बागायत आहे. उत्तर दिशेला दगडी महाद्वार आहे. त्यातून मंदिराकडे जाण्यासाठी भाविकजन प्रवेश करतात. येथे पूर्वी रस्ता नव्हता. आता रस्ता असून मंदिरापर्यंत वाहने नेण्याची सोय केली आहे. वर्षभर या देवस्थानात विविध उत्सव होत असतात. महाशिवरात्र हा या देवस्थानचा सर्वांत मोठा उत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे. या दिवशी श्री रुद्रेश्‍वराच्या दर्शनाला इतर राज्यातील भाविकांचीही गर्दी होते, तर श्रावणातील शेवटचा सोमवार मोठ्या थाटात साजरा केला जातो.
या दोन्ही उत्सवांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक शिवभक्ताला गर्भगृहात जाऊन अभिषेक करता येतो. हे दोन प्रमुख सोहळे सोडल्यास रुद्रेश्‍वर लिंगावर जर अभिषेक करावयाचा असेल तर महाजन मंडळी अभिषेक करू शकतात. श्री रुद्रेश्‍वर देवस्थानात अनेक वार्षिक उत्सव साजरे केले जातात.
माघ महिन्यातील महाशिवरात्रौत्सव मोठ्या थाटामाटात उत्साहाने भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. या दिवशी हिंदुधर्मियांना सर्वांनाच स्वहस्ते अभिषेक करता येतो. हजारो भाविक शिवलिंगावर अभिषेक करून श्रद्धाभक्तीचे फल प्राप्त करून समाधानी होत असतात. सर्वांना अल्पोपहार देण्याची सोय केलेली असते. रात्रौ नाटके सादर केली जातात. तसेच पहाटे श्री रुद्रेश्‍वर देवाला महारथात बसवून वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढली जाते. महाजन, भाविक व ग्रामस्थ लोक मिरवणुकीत सहभागी झालेले असतात.
कैलासनाथ श्री रुद्रेश्‍वर सर्व जनाला सुखी-समृद्धी देऊन दीर्घायुष्य देवो अन् ईश्‍वरी भक्तीचा सन्मार्ग दाखवो हीच श्रीचरणी प्रार्थना.